Vidhansabha 2019 : कोल्हापुरातील दहा मतदारसंघात भाजपकडून 70 जण इच्छुक

Vidhansabha 2019 : कोल्हापुरातील दहा मतदारसंघात भाजपकडून 70 जण इच्छुक

कोल्हापूर - राज्यभरात भाजपमध्ये इनकमिंग जोरात असताना जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघांतून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची आज मांदियाळी झाली. दहापैकी सहा मतदारसंघ शिवसेनेकडे असताना या दहाही ठिकाणी भाजपकडून लढण्यास इच्छुकांनी पसंती दाखविली आहे. सुमारे ७० जणांनी मुलाखती दिल्या.

प्रमुख नेत्यांत माजी राज्यमंत्री भरमू सुबराव पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, समरजितसिंह घाटगे, आमदार अमल महाडिक, महेश जाधव, चंद्रकांत जाधव, राजवर्धन नाईक- निंबाळकर, अनिल यादव, गोपाळराव पाटील, राहुल देसाई यांचा समावेश होता.

माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या उपस्थितीत या मुलाखती झाल्या. तत्पूर्वी सकाळी पक्षाच्या ग्रामीण व शहरच्या कोअर कमिटीची बैठक झाली. प्रदेश उपाध्यक्ष मकरंद देशपांडे व प्रदेश सरचिटणीस आमदार सुरेश हाळवणकर यांनी पक्षातर्फे सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला तसेच आगामी काळात सदस्य नोंदणी, पदवीधर नोंदणी, बूथ रचना पूर्ण करण्याबाबत मंडल व बूथ स्तरावर प्रयत्न व्हावेत, असे नमूद केले.

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, आमदार अमल महाडिक, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष  हिंदूराव शेळके, संघटन सरचिटणीस बाबा देसाई, अशोक देसाई आदी उपस्थित होते. हॉटेल पॅव्हेलियन येथे दिवसभर मुलाखती पार पडल्या. जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके, बाबा देसाई, अशोक देसाई, शिवाजी बुवा आदी प्रमुख पदाधिकारी दिवसभर कार्यरत होते.

युती न झाल्यास तयारी काय?
मुलाखतीवेळी पक्षीय पातळीवरील कामाची विचारणा करतानाचा भाजप शिवसेना युती न झाल्यास तुमची तयारी काय असा प्रश्‍न मुलाखतीवेळी विचारला गेल्याचे समजते. विधानसभा मतदारसंघातील काम, पक्षाची ताकद आणि स्वबळावर लढल्यास व्यक्तीगत तयारी काय अशी विचारण झाली. 

आलेल्यांना प्राधान्य द्यावे 
आजरा चंदगडमधून डॉ. नंदा बाभूळकर यांच्या भाजपकडून तिकीट मिळेल अशी चर्चा असताना या मतदारसंघातून ज्यांनी मुलाखती दिल्या. त्यांनी येथे जे उपस्थित आहेत त्यांचा प्राधान्याने विचार करावी, अशी मागणी केली. आजरा-चंदगडमधून  इच्छुकांची संख्या अधिक आहे.

रेडेकर, पाटील यांच्यात वादावादी
चंदगड आजरा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून मुलाखतीसाठी आलेल्या रमेश रेडेकर तसेच शिवाजी पाटील यांच्यात वैयक्तीक कारणावरून आज जोरदार शाब्दिक चकमक झाली. दोघांचेही सुरक्षा रक्षक एकमेकाच्या अंगावर धाऊन गेल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. भाजपतर्फे हॉटेल पॅव्हेलियन येथे मुलाखती झाल्या. रमेश रेडेकर व शिवाजी पाटील यांच्यात देण्याघेण्यावरून दोघात वाद झाला. रेडेकर यांचे बंधू शिवाजी पाटील यांच्या दिशेने धावले. माजी मंत्री भरमू सुबराव पाटील दोघांच्या दिशेने पळत गेले. आमदार सुरेश हाळवणकर, राहूल चिक्कोडे पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला.

यांनी दिल्या मुलाखती -

  • कोल्हापूर उत्तर : महेश जाधव, आर. डी. पाटील, चंद्रकांत जाधव.
  •  कोल्हापूर दक्षिण : अमल महाडिक, राहुल चिकोडे, सुभाष रामुगडे.
  •  इचलकरंजी : आमदार सुरेश हाळवणकर. 
  •  राधानगरी-भुदरगड :  बाबा देसाई, नाथाजी पाटील, अलकेश कांदळकर, राहुल देसाई, दीपक शिरगावकर.
  •  हातकणंगले : अशोकराव माने, तानाजी ढाले, देवानंद कांबळे यांच्यासह अन्य सात जण.
  •  पन्हाळा-शाहूवाडी : राजाराम शिपुगडे, प्रवीण प्रभावळकर, अजितसिंह काटकर व अन्य एक. 
  •  करवीर मतदारसंघ :  के. एस. चौगले, पी. जी. शिंदे, संभाजी पाटील, हंबीरराव पाटील आदी. 
  •  चंदगड मतदारसंघ :  गोपाळराव पाटील, हेमंत कोलेकर, माजी राज्यमंत्री भरमू सुबराव पाटील, अशोक चराटी यांच्यासह अन्य तिघे. 
  •  कागल : समरजितसिंह घाटगे, परशुराम तावरे.
  •  शिरोळ : राजवर्धन नाईक-निंबाळकर, अनिल यादव, रामचंद्र डांगे, विजय भोजे व अन्य तिघे.
     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com