Vidhan Sabha 2019 : सांगलीत विद्यमान चार आमदारांना भाजपची पुन्हा उमेदवारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

सांगली - भारतीय जनता पक्षाने जिल्ह्यातील चारही विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. जाहीर झालेल्या पहिल्या यादीत सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक आणि विलासराव जगताप या चौघांचाही समावेश आहे.

सांगली - भारतीय जनता पक्षाने जिल्ह्यातील चारही विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. जाहीर झालेल्या पहिल्या यादीत सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक आणि विलासराव जगताप या चौघांचाही समावेश आहे. युतीच्या फॉर्म्युल्यात दोन्ही पक्षांनी फिफ्टी-फिफ्टी जागा घेतल्याने भाजपने इतर इच्छुकांचा फारसा विचार न करता पहिल्याच यादीत विद्यमान चौघांनाही उमेदवारी देऊन प्रश्‍न मिटविला आहे. मात्र, त्याचवेळी सोडलेल्या मतदारसंघांवरून नाराजी पसरली आहे.

जिल्ह्यातील आठ मतदारसंघातील सांगली, मिरज, जत आणि शिराळा भाजपच्या वाट्याला आले आहेत. या सर्व जागांवर भाजपने विद्यमान आमदारांनाच उमेदवारी दिली. सांगलीतून माजी आमदार दिनकर पाटील, नीता केळकर, शिवाजी डोंगरे इच्छुक होते. जतमधूनही तम्मनगौडा रवी, डॉ. रवींद्र आरळी इच्छुक होते.

येथे आमदार गाडगीळ, तर जतमध्ये विलासराव जगताप गुरुवारी (ता. ३) आपला अर्ज दाखल करतील. आज सकाळीच उमेदवारांना एबी फॉर्म देत असल्याचे निरोप भाजपकडून आले. त्यापाठोपाठ दुपारी पहिली यादी जाहीर झाली.

जिल्ह्यातील आठही जागा जिंकण्याची तयारी केलेल्या भाजपला चार महत्त्वाच्या जागा सोडाव्या लागल्याने या मतदारसंघातील भाजपचे इच्छुक आणि कार्यकर्ते नाराज झाले आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या महाजनादेश यात्रेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इस्लामपूरमध्ये निशिकांत पाटील, पलूस-कडेगावमध्ये संग्रामसिंह देशमुख आणि तासगाव-कवठेमहांकाळमध्ये अजितराव घोरपडे यांच्यासाठी नागरिकांकडून आशीर्वाद मागितला होता. त्यामुळे हे तिन्ही उमेदवार जोमाने कामाला लागले होते. कार्यकर्त्यांच्या बैठका, मेळावे सुरू होते. मात्र, आज अचानक आपल्या जागा शिवसेनेला सोडल्याचे स्पष्ट झाल्याने हे इच्छुक नाराज झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha 2019 BJP re-nominates four MLAs in Sangli