Vidhansabha 2019 : चंदगड भाजपमध्ये एका म्यानात अनेक तलवारी

Vidhansabha 2019 : चंदगड भाजपमध्ये एका म्यानात अनेक तलवारी

२००९ च्या पुनर्रचित मतदारसंघातील निवडणुकीनंतर चंदगड मतदारसंघाचे राजकीय संदर्भ बदलले. गडहिंग्लज तालुक्‍याचा मोठा भाग या मतदारसंघाला जोडला. दहा वर्ष मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले. भाजपमध्ये एका म्यानात अनेक तलवारी, शिवसेनेच्या भात्यात बाणच बाण तर राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. इथे अमूक पक्षाचा अमुक उमेदवार, असे निश्‍चितपणे सांगता येत नाही.  राज्य पातळीवर शिवसेना - भाजप असेल किंवा काँग्रेस - राष्ट्रवादी यांच्या युतीची निश्‍चिती किंवा स्वबळावर लढाईचे चित्र स्पष्ट होऊन एका पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर आपोआपच दीर्घकाळ तुंबलेला उमेदवारीच्या नामांकनाचा प्रवाह बांध फोडून वाहताना दिसेल.

गत निवडणुकीत तब्बल १८ उमेदवार रिंगणात होते. मात्र, प्रमुख लढत पाच उमेदवारांत झाली. यात कुपेकर यांनी ८ हजार १९९ मतांनी विजय मिळवला. यावेळीही राष्ट्रवादीकडून त्यांची उमेदवारी निश्‍चित होती. परंतु, कुपेकर यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला असून, त्यांची कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच मतदारसंघातील अनेक दिग्गजांनी भाजपशी घरोबा केला आहे.

गोपाळराव पाटील भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य म्हणून दोन वर्षे कार्यरत आहेत. त्यापाठोपाठ माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांनीही पक्षात प्रवेश केला आहे. उद्योजक रमेश रेडेकर यांनी पाच वर्षे आमदारकी डोळ्यांसमोर ठेवून मतदारसंघ पिंजून काढला आहे. सावर्डे येथील ठाणे स्थित महाराष्ट्र राज्य माथाडी व जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी  भाजपचे भावी उमेदवार म्हणून प्रचार सुरू केला आहे. पूरस्थितीचा काळात त्यांनी गावागावांत जाऊन मदत केली.

जिल्हा परिषद सदस्य ॲड. हेमंत कोलेकर व आजरा कारखान्याचे माजी अध्यक्ष अशोक चराटी यांच्या नावाची याच पक्षातून चर्चा आहे. डॉ. बाभूळकर यांनी उमेदवारीचा शब्द घेऊन पक्षात प्रवेश केल्यास अन्य इच्छुक उमेदवार काय निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्‍याचे आहे. भरमूअण्णा पाटील व गोपाळराव पाटील यांनाही उमेदवारीची आस आहे. शिवाय भाजप - शिवसेना युती झाल्यास शिवसेनेच्या वाट्याच्या या मतदारसंघात कशी तडजोड करणार हेही महत्त्वाचे आहे.

पाच वर्षे शिवसेनेकडून संग्रामसिंह कुपेकर, प्रा. सुनील शिंत्रे, प्रभाकर खांडेकर यांनी मोट बांधली आहे. रियाज शमनजी, अनिरुद्ध रेडेकर इच्छुक आहेत. भाजप व शिवसेनेचे नेते यापैकी एक उमेदवार निश्‍चीत करताना इतरांची कशी समजूत घालणार हे पहावे लागेल. दुसरीकडे डॉ. बाभूळकर यांचा भाजप प्रवेश लांबेल तेवढा तो त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाकडून त्यांना नाराजी ओढवून घ्यावी लागेल. 

राष्ट्रवादी काँग्रेसला प्रथमच उमेदवार शोधावा लागणार आहे. चंदगड तालुका संघाचे अध्यक्ष राजेश पाटील यांना उमेदवारी मिळू शकते. पक्ष किंवा अपक्ष निवडणूक लढवायचीच असा निर्धार त्यांच्या कार्यकर्त्यांनी मेळाव्यात केला आहे.

राजकीय स्थितीचा विचार करता पाटील यांना लाभ होऊ शकतो. स्थानिक उमेदवार म्हणून चंदगड तालुक्‍यातून त्यांना मतांची आघाडी घेणे शक्‍य आहे. त्याशिवाय आजरा हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. गडहिंग्लज विभागात त्यांचे वडील माजी आमदार नरसिंग गुरुनाथ पाटील व सासरे माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांना मानणारा मतदार वर्ग आहे. त्यांचे मेहुणे प्रा . संजय मंडलिक सद्या शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत  ते काय शिष्टाई करणार यावरही बरेचसे अवलंबून आहे .

अप्पी पाटील दौलत कारखाना चालवायला घेऊन अडचणीत आले. तरीही कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव ते निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. जनता दलाचे नेते ॲड श्रीपतराव शिंदे यांची कन्या गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा स्वाती कोरी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्ड्यांनावर, डॉ. प्रकाश शहापूरकर, प्रकाश चव्हाण, गंगाधर व्हसकोटी, विद्याधर गुरबे, नागेश चौगुले रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. वंचित बहुजन आघाडीची चाचपणी सुरू आहे. उमेदवारांची वाढती संख्या कोणाच्या पथ्यावर पडणार हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल. 

२००९ चे मतदान
 बाबासाहेब कुपेकर ( राष्ट्रवादी) - ६४१९४
 गोपाळराव पाटील (जनसुराज्य शक्ती) - ५८८६ 
 भरमू पाटील (अपक्ष ) - २७९१५
 नरसिंग गुरुनाथ पाटील (अपक्ष) - २४७३८ 
 श्रीपतराव शिंदे (जनता दल) - ११८८७

२०१४ चे मतदान
 संध्यादेवी कुपेकर (राष्ट्रवादी) - ५१५९९
 नरसिंग गुरुनाथ पाटील (शिवसेना ) - ४३४००
 अप्पी पाटील (अपक्ष) - २८८४७
 भरमू पाटील (काँग्रेस) - २५९६४
 संग्रामसिंह कुपेकर (जनसुराज्य शक्ती) - २५८४४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com