Vidhansabha 2019 :  भाजपच्या विद्यमान आमदारांना डच्चू नाही - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

सांगली - आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या चाळीस विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार असल्याच्या बातमीत तथ्य नसल्याचे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्या वृत्ताचा इन्कार केला. तसेच कर्नाटक रंगलेल्या राजकीय नाट्याशीही आपला संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. 

सांगली - आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या चाळीस विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार असल्याच्या बातमीत तथ्य नसल्याचे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्या वृत्ताचा इन्कार केला. तसेच कर्नाटक रंगलेल्या राजकीय नाट्याशीही आपला संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. 

नगरोत्थान योजनेतून सांगली महापालिकेस मिळालेल्या शंभर कोटींच्या निधीतील विकास कामांचा प्रारंभ आज मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेची महायुती होणार आहे. त्यामुळे भाजपच्या चाळीस आमदारांना डच्चू देणार असल्याचे वृत्त राज्यात पसरले आहे. त्यामुळे भाजपच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे.

यावर बोलताना मंत्री पाटील म्हणाले, या वृत्तात काही तथ्य नाही. माध्यमांनी आपल्या कल्पनेतून केलेल्या या बातम्या असल्याचे सांगत त्यांनी त्याचा इन्कार केला. तर कर्नाटकमध्ये रंगलेल्या कॉंग्रेस, जेडीयु आमदारांच्या राजीनामा नाट्याशीही आपला संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर्नाटकातील नेते तेथील परिस्थिती हाताळण्यास समर्थ आहेत. माझा संबंध असता तर मी आज इतका निवांत नसतो, असा चिमटाही त्यांनी काढला. 

राज्यातील महामार्गावर खड्‌डे पडल्याच्या विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना ते म्हणाले, राज्यातील महामार्गावर खड्डे पडलेले नाहीत. मुंबई-गोवा मार्गावर कामाचे खड्डे आहेत हे मान्य, मात्र अनेक वर्षे खड्ड्यात असणारा मुंबई सायनमार्ग खड्डेमुक्त केलाय तेही टीव्हीवर दाखवत चला असा चिमटाही त्यांनी माध्यमांना काढला. 

मराठा आरक्षणासाठी देवाला नवस 
मराठा आरक्षणाबद्दल बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, "मराठा समाजाला आरक्षण देणे हे माझे कर्तव्यच होते. कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यावर आमचा भर होता. मुख्यमंत्र्यांचाही तसाच संकल्प होता. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयानेही आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आरक्षणासाठी नवस केला होता. कोल्हापूरची अंबाबाई व सांगलीच्या गणपतीची आध्यात्मिक शक्तीही सरकारच्या मागे होती.'  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha 2019 Chandrakant Patil comment