जयंत पाटील यांच्याविरुद्ध लढण्याची 'यांना' भाजपची खुली ऑफर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

सांगली - भाजपचा एक मुख्य नेता मला फोन करतो. नुसतं एकदा मुख्यमंत्र्यांना भेटा, तुमचा योग्य कार्यक्रम लावतो म्हणतोय. मला खुली ऑफर आहे. इस्लामपूर विधानसभा मतदार संघातून जयंत पाटील यांच्याविरुद्ध लढण्याची, असा गौप्यस्फोट जयंतरावांचे कट्टर समर्थक आणि जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी आज येथे केला. 

सांगली - भाजपचा एक मुख्य नेता मला फोन करतो. नुसतं एकदा मुख्यमंत्र्यांना भेटा, तुमचा योग्य कार्यक्रम लावतो म्हणतोय. मला खुली ऑफर आहे. इस्लामपूर विधानसभा मतदार संघातून जयंत पाटील यांच्याविरुद्ध लढण्याची, असा गौप्यस्फोट जयंतरावांचे कट्टर समर्थक आणि जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी आज येथे केला. 

लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ येथील विष्णूदास भावे नाट्यमंदीरमध्ये झाला. त्यावेळी दिलीप पाटील बोलत होते. राजारामबापूंनी कॉलेज युवकाला कारखान्याचा संचालक करून सन्मान केला, मी मरेपर्यंत राजारामबापूंच्या विचारांचा, त्यांच्या कुटुंबाचा पाठीराखा राहीन. मला काही मिळाले नाही तरी चालेल, मात्र मी प्रतारणा करणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी भाजपची ऑफर नाकारल्याचे सुतोवाच केले.

विशेष म्हणजे, एकेकाळी जयंतरावांचे शिलेदार राहिलेल्या व सध्या भाजपमध्ये असलेल्या  माजी मंत्री अजितराव घोरपडे, आमदार विलासराव जगताप, आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यासमोर श्री. पाटील यांनी "मी खाल्ल्या मिठाला जागणारा आहे', असा उल्लेख करत पक्षांतर करत उड्या मारणाऱ्यांना टोला हाणला. 

सध्या भाजपमध्ये "मेगा भरती' सुरू असून इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांना घेरण्यासाठीची नियोजन लावले जात आहे. त्यात दिलीप पाटील यांचाही विचार भाजपने केल्याचे आजच्या दिलीप पाटील यांच्या गौप्यस्फोटानंतर स्पष्ट झाले.

श्री. पाटील म्हणाले, ""मला काय आमिष नाही काय? मलाही आमदार व्हावे वाटते, खासदार व्हावे वाटते. भाजपचा एक मुख्य नेता फोन करतोय, एकदा मुख्यमंत्र्यांना भेटा म्हणतोय. पण, मी खाल्ल्या अन्नाला जागणारा माणूस आहे. माझा उल्लेख बापूंचा मानसपूत्र असा केला जातो, हीच माझी सगळ्यात मोठी पदवी आहे. बापूंच्या ऋणातून उतराई होण्यासाठी माझे आयुष्य आहे आणि ते मी जयंतरावांचा पाठीराखा म्हणून खर्ची करतोय.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha 2019 Dilip Patil gets offer form BJP to fight against Jayant Patil