Vidhansabha 2019 : जयंतरावांच्या विरोधात तयारी करणाऱ्या निशिकांत पाटलांना धक्का

संग्रामसिंह पाटील
रविवार, 14 जुलै 2019

"गेल्या ३० वर्षाच्या राजकारणात आम्ही पहिल्यांदाच सर्व विकास आघाडीचे प्रमुख नेते निवडणूक लढण्यासाठी तयार आहोत. यापूर्वी राष्ट्रवादीविरोधात उमेदवार शोधायला लागायचा; परंतु आता राष्ट्रवादीविरोधात मोठी फळी निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा परिवर्तन नक्की होणार."
- भीमराव माने,

समन्वयक, विकास आघाडी.

इस्लामपूर - इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात विकास आघाडीतर्फे तयार करण्यात आलेली समन्वय समिती उमेदवार ठरवेल. त्यामुळे काहींनी उमेदवारी घोषित करण्याची घाई करू नये. वेगवेगळ्या माध्यमातून मीच उमेदवार असल्याचा संभ्रम काहीजण निर्माण करत आहेत, आम्ही तो यशस्वी होऊ देणार नाही. असा इशारा आज येथे समन्वय समितीच्या नेत्यांनी दिला. त्यामुळे जयंत पाटील यांच्या विरोधात विधानसभेसाठी तयारी करणाऱ्या भाजपच्या निशिकांत पाटील यांना हा धक्का मानला जात आहे. 

येथील शासकीय विश्रामगृहात विकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, पंचायत समितीचे विरोधीपक्षनेते राहुल महाडिक, म्हाडाचे उपाध्यक्ष विक्रम पाटील, गौरव नायकवडी, भीमराव माने, सागर खोत हे प्रमुख उपस्थित होते.

बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. सदाभाऊ खोत म्हणाले, "राज्यात निवडणुकीचे वातावरण तयार होत आहे. भाजप घटकपक्ष व शिवसेनेची महायुती होईल. इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादीविरोधी मोठी फळी निर्माण झालीय. अनेक गट राष्ट्रवादीविरोधात काम करत आहेत. विकास आघाडीतर्फे अनेक वर्षे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका लढवल्या आहेत. नानासाहेब महाडिक त्याचे नेतृत्व करत होते. नानासाहेब महाडिक यांच्या निधनानंतर ही आमची पहिलीच निवडणूक होत आहे.'' 

श्री. खोत म्हणाले "आम्ही या मतदारसंघात एक सक्षम उमेदवार देऊन ही निवडणूक ताकतीने लढणार आहोत. या पाच वर्षात आम्ही विकासाला चालना दिली आहे. पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी, दळणवळण, पर्यटनस्थळे, स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास जपण्याचे काम, क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, पांडूमास्तर यांच्या स्मृती जपल्या आहेत. ताकारी-भवानीनगर पाईपलाईनचे काम, महामार्गाला निधी देण्याबरोबर पेठ-सांगली रस्ता चौपदरी करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार आहे. हा रस्ता झाल्यास पुन्हा तीस वर्ष रस्ता करावा लागणार नाही"

श्री. खोत म्हणाले, "येत्या निवडणुकीत एकसंघ आहोत. चिन्ह कोणतेही असो, आमच्या दृष्टीने महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीची सत्ता येणे महत्वाचे आहे. येथील उमेदवार राज्य पातळीवर ठरेल. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेतील. भीमराव माने यांची इस्लामपूर मतदारसंघाचे विकास आघाडीचे समनव्यक म्हणून निवड केली आहे. ते सर्व गटांशी चर्चा करतील. रयत क्रांती संघटना, महाडिक गट, हुतात्मा गट, भाजप, शिवसेना, शिंदे व माने गट अशा प्रत्येक गटातील दहा लोकांना एकत्र करून ७० लोकांची टीम घेऊन प्रत्येक गावात जातील. तेथील कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यानंतर उमेदवाराचा निर्णय होईल."

श्री. खोत म्हणाले,  " सर्वांना बरोबर घेऊन ही निवडणूक जिंकायचीय. सर्वांचा ठाम निर्णय झाला आहे. यंदा परिवर्तन करायचेच आहे. जे आमच्या सोबत नाहीत. त्यांच्याशी भीमराव माने बोलतील. काही लोक वेगवेगळ्या माध्यमातून मीच उमेदवार आहे, असा जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत; परंतु आम्ही तो यशस्वी होऊ देणार नाही. आमच्या तीन तीन पिढ्या जयंत विरोधक म्हणून मातीत गेल्या आहेत."

निशिकांत पाटील अनुपस्थित
मतदारसंघात जयंत पाटील यांच्याविरोधात लढण्याची तयारी करणारे नगराध्यक्ष व जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष निशिकांत पाटील या बैठकीला अनुपस्थित होते. जनतेच्या मनात उमेदवारीविषयी संभ्रम निर्माण केल्याचा आरोप प्रत्यक्ष त्यांचे नाव न घेता आघाडीच्या नेत्यांनी यावेळी केला.

"गेल्या ३० वर्षाच्या राजकारणात आम्ही पहिल्यांदाच सर्व विकास आघाडीचे प्रमुख नेते निवडणूक लढण्यासाठी तयार आहोत. यापूर्वी राष्ट्रवादीविरोधात उमेदवार शोधायला लागायचा; परंतु आता राष्ट्रवादीविरोधात मोठी फळी निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा परिवर्तन नक्की होणार."
- भीमराव माने,

समन्वयक, विकास आघाडी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha 2019 Islampur constituency Candidate issue