Vidhansabha 2019 : जनता दल वंचित आघाडीसोबत

Vidhansabha 2019  : जनता दल वंचित आघाडीसोबत

गडहिंग्लज -  आगामी विधानसभा निवडणुकीत जनता दल आणि वंचित आघाडी एकत्र लढणार आहे. या आघाडीत शेकाप, लाल निशाण आणि इतर डाव्यांना सोबत घेणार आहे. याबाबतच्या चर्चेसाठी ३१ जुलैला बैठक होणार आहे, अशी माहिती पक्षाचे नेते माजी आमदार ॲड. श्रीपतराव शिंदे यांनी आज दिली. काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबरही चर्चा करणार असल्याचेही ते या वेळी म्हणाले. 

संकेश्‍वर रोडवरील पक्ष कार्यालयात विधानसभा निवडणूक व विविध प्रश्‍नांवरील आंदोलनाची चर्चा करण्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली.

ॲड. शिंदे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, नगराध्यक्षा स्वाती कोरी, माजी सभापती सुभाष देसाई, सिद्धाण्णा देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत महावितरणने स्थिर आकार रद्द करावा, झोपडपट्टीधारकांना घरकुल उभारावे, गायरानातील जागा गरजूंना द्याव्यात, इंधन दरवाढ मागे घ्यावी, हिडकल डॅमचे पाणी पूर्वभागाला द्यावे, वाढीव हद्द विकासासाठी शासनाने ५० कोटींचा निधी द्यावा आदी ठराव मंजूर करण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षणातील उल्लेखनिय कामगिरीबद्दल पदाधिकाऱ्यांचा पक्षातर्फे सत्कार झाला.

ॲड. शिंदे म्हणाले, ‘‘जनता दल हे एक कुटुंब आहे. एकेका कार्यकर्त्यांची तिसरी पिढी पक्षात कार्यरत आहे. म्हणूनच जनता दल आजही अभेद्य आहे. या विभागातील सर्व पाणी योजनांचा पाठपुरावा जनता दलाने केला आहे. मी व तत्कालीन अध्यक्ष बी. टी. पाटील दोघेही उपोषण केल्याने चित्रीला टोकन निधी मंजूर झाला. भूमिपूजनही माझ्याच कालावधीत झाले. आता कोणी तरी त्याचे श्रेय घेत असले तरी चित्रीसाठी दुसऱ्या कोणाचीही पुण्याई नाही. उपलब्ध पाणी गडहिंग्लज तालुक्‍याला पुरत नाही. त्यासाठी सर्फनाला, आंबेओहोळ, उचंगी पूर्ण होणे आवश्‍यक आहे. हिरण्यकेशी नदीवर आधारित प्रकल्प उभारण्याचीही आमची मागणी कायम आहे.’’

नगराध्यक्षा कोरी म्हणाल्या, ‘‘विधानसभा निवडणुकीत शिंदेसाहेब निर्णय घेतील, त्याच्याशी सर्वांनी ठाम रहायचे आहे. हद्दवाढीनंतर वाढीव वसाहतीमध्ये सुविधा देणे चिंतेची बाब असली तरी शहराप्रमाणेच वाढीव हद्दीतील नागरिकांचेही समाधान होईल असे काम करू. शासनाकडून निधी मिळवण्यासाठी पक्षातर्फे पाठपुरावा करणार आहे.’’

नाईक म्हणाले, ‘‘गतवर्षी दुष्काळसदृश गावाच्या यादीत ३२ गावे पूर्वभागातील होती. परंतु त्यांना कोणत्याच सुविधा दिल्या नाहीत. कागल, चंदगड व राधानगरी मतदारसंघात पक्षातर्फे निवडणूक लढविण्याचे ठरले आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी एकीची मूठ बांधावी.’’

माजी नगराध्यक्ष बापू म्हेत्री, सागर पाटील, अजित शिंदे यांची भाषणे झाली. उपनगराध्यक्ष सुनीता पाटील यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, प्रकाश तेलवेकर, उदय कदम, बाळकृष्ण परीट, शशिकांत चोथे, रमेश मगदूम, शिवलीला संती, बाळासाहेब मोकाशी, मोहन भैसकर, रामगोंडा पाटील, रमेश पाटील, काशिनाथ बेळगुद्री, विश्‍वास खोत आदी उपस्थित होते.

आयकर छापा क्‍लेषकारक
ॲड. शिंदे म्हणाले, ‘‘कागल मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाने टाकलेला छापा हा क्‍लेषकारक आहे. विरोधकावर हल्ला कारण्याचे षडयंत्र सत्ताधारी पक्षाने रचले आहे. अशा गोष्टींचा प्रतिकार करण्याचा निर्धार जनता दलाचा आहे.’’

‘ती’ चूक पुन्हा नाही
ॲड. शिंदे म्हणाले, ‘‘राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या आग्रहास्तव १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत माघार घेऊन स्व. बाबा कुपेकरांना पुढे चाल दिली. ती चूक आता पुन्हा करणार नसून जमल्यास वंचित आघाडीसोबत, अन्यथा एकट्याने लढण्याचा पक्षाचा निर्धार आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com