Vidhansabha 2019 : खानापूर-आटपाडीत वंचित आघाडीची भूमिका ठरवणार पुढील दिशा

सदाशिव पुकळे
शुक्रवार, 26 जुलै 2019

सांगली - लोकसभा निवडणुका संपल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना खानापूर - आटपाडी विधानसभा मतदारसंघात भावी उमेदवारांकडून राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे.

सांगली - लोकसभा निवडणुका संपल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना खानापूर - आटपाडी विधानसभा मतदारसंघात भावी उमेदवारांकडून राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे.  कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी करण्यासाठी आमदारकीसाठी इच्छुक असणाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. वंचित आघाडीने विधानसभा ही सर्वत्र ताकतीने लढणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केल्यानंतर या मतदारसंघात चुरस वाढली असून  येथे तिरंगी लढत पाहण्यासाठी मिळणार आहे.

काही महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भाजप उमेदवार खासदार संजय पाटील हे दुसऱ्यांदा निवडून आले. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून मताधिक्‍य मिळाल्याने भाजप-शिवसेना वगळता इतर राजकीय पक्षांची सत्तांतर करण्यासाठी मोठी दमछाक होणार हे लोकसभा निकालातून स्पष्ट झाले  आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या विधानसभा मतदारसंघातून शिवसेना सत्ताधाऱ्यांच्या विरोधात काँग्रेसकडून सदाशिव पाटील यांनी रणशिंग फुंकले आहे.

तसेच नव्याने राजकीय  क्षेत्रात आगमन झालेल्या वंचित बहुजन आघाडीचा आगामी निवडणुकीत मोठा बोलबाला राहणार हे मात्र निश्‍चित असल्याने आगामी निवडणूक तिरंगी लढत  होणार असल्याची राजकीय चर्चा मतदारसंघात रंगत  आहे. खानापूर-आटपाडी मतदारसंघात भाजप शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग असल्याने काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना या मतदारसंघात मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

विद्यमान आमदार अनिल बाबर यांच्याकडे विकासाचा पॅटर्न आहे, खासदार संजय पाटील यांनी बाबर यांना विजयी करणारच अशी घोषणा केली आहे. तर माझी आमदार सदाशिव पाटील यांनी सर्व विरोधकांची मोळी बांधण्याचे काम सुरू केले आहे. वंचित आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर स्वतः लढणार की उमेदवार देणार याचा निर्णय अजून गुलदस्त्यात आहे. शिवसेना, काँग्रेस, वंचित आघाडीच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची जुळवाजुळव वेगात सुरू झाली आहे. 

कार्यकर्ते सवाध भूमिकेत 
खासदारकीच्या निवडणुकीनंतर राजकारणाच्या  पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. बरेच कार्यकर्ते सावध भूमिकेत असून विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईपर्यंत आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवण्यातच स्थानिक नेत्यांचे प्राधान्य दिसते. दिग्गज नेतेही सावध भूमिकेत असल्याने स्थानिक नेत्यांचीही मोठी पंचाईत झाल्याचे दिसत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha 2019 Khanapur Atapadi assembly election