Vidhan Sabha 2019 : कोल्हापुरात 'हॅट्ट्रिक’साठी पाच आमदार सज्ज

Vidhan Sabha 2019 : कोल्हापुरात 'हॅट्ट्रिक’साठी पाच आमदार सज्ज

कोल्हापूर - निवडणूक मग ती ग्रामपंचायतीची असो की विधानसभेची, त्यात एकदा विजय मिळवताना उमेदवारांची दमछाक होते; पण विद्यमान दहा आमदारांपैकी पाच आमदार यावेळी ‘हॅट्‌ट्रिक’साठी सज्ज झाले आहेत. करवीर, कोल्हापूर उत्तर (पूर्वीचा कोल्हापूर शहर), राधानगरी विधानसभा मतदारसंघात अलीकडच्या १५ ते २० वर्षांत सलग तीनवेळा कोणीही निवडून आलेले नाही. त्यामुळे यावेळी या मतदारसंघातील लढतीकडे राजकीय पटलाच्या नजरा लागल्या आहेत.

१९७२ नंतर जिल्ह्यातील माजी खासदार कै. सदाशिवराव मंडलिक, कै. बाबासाहेब कुपेकर, आमदार हसन मुश्रीफ यांनी सलग तीनवेळा, तर माजी आमदार कै. यशवंत एकनाथ पाटील, कै. दिग्विजय खानविलकर, माजी खासदार जयवंतराव आवळे यांनी सलग पाचवेळा एकाच मतदारसंघातून निवडून येण्याचा पराक्रम केला आहे. त्याचबरोबर माजी कृषी राज्यमंत्री कै. श्रीपतराव बोंद्रे यांनी एकवेळा करवीरमधून, तर सलग दोनवेळा सांगरूळ मतदारसंघातून, कै. त्र्यंबक कारखानीस यांनी एकदा शाहूवाडीतून आणि सलग तीनवेळा कोल्हापूर शहरमधून विजय मिळवत ‘हॅट्‌ट्रिक’ साधली आहे. 

सध्या राज्यात विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत. आठवडाभरात निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यात या निवडणुकीसाठी मतदान घेण्याची तयारी प्रशासकीय पातळीवर 
सुरू आहे. 

जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी शिवसेनेचे, तर प्रत्येकी दोन ठिकाणी भाजप व राष्ट्रवादीचे आमदार आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा कोण विजयी होणार, याचे आखाडे बांधले जात असताना विद्यमान आमदारांपैकी चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर, राजेश क्षीरसागर, सुरेश हाळवणकर व श्रीमती संध्यादेवी कुपेकर हे पाच आमदार ‘हॅट्‌ट्रिक’साठी सज्ज झाले आहेत. 

गेल्या तीन निवडणुकींच्या निकालावर नजर टाकल्यास कोल्हापूर शहर, करवीर व राधानगरीतून अजून सलग तीनवेळा कोणीही विजयी झालेले नाही. कोल्हापूर उत्तरमधून माजी आमदार सुरेश साळोखे यांची हॅट्‌ट्रिक २००४ मध्ये माजी आमदार मालोजीराजे यांनी रोखली. करवीरमध्ये माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांचा तिसरा विजय माजी आमदार पी. एन. पाटील यांनी थांबवला, तर राधानगरीत माजी आमदार के. पी. पाटील यांच्या विजयाचा वारू नवख्या प्रकाश आबिटकर यांनी रोखून एकच धक्का दिला.

आमदार सतेज पाटील हे पहिल्यांदा २००४ मध्ये करवीरमधून आमदार झाले, त्यानंतर २००९ ची निवडणूक त्यांनी कोल्हापूर दक्षिणमधून जिंकली; पण २०१४ मध्ये त्यांचीही आमदारकीची हॅट्‌ट्रिक आमदार अमल महाडिक यांनी रोखली. 

दुसऱ्यांदा विधानसभेला निवडून येताना आमदारांना घाम फुटत असताना कै. दिग्विजय खानविलकर, माजी खासदार जयवंतराव आवळे यांनी एकदा-दोनदा नव्हे, तर कामाच्या जोरावर सलग पाचवेळा एकाच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्याचबरोबर आमदार हसन मुश्रीफ यांनी चौथ्यांदा विजय मिळवून कागल मतदारसंघातील कै. सदाशिवराव मंडलिक यांच्या ‘हॅट्‌ट्रिक’लाही मागे टाकले. 

यांच्या नशिबी एकदाच आमदारकी (१९७२ नंतर)
कै. बाबासाहेब खंजिरे (हातकणंगले), नामदेव व्हटकर (वडगाव), कै. कृष्णाजी मोरे, दिनकरराव जाधव, हरिभाऊ कडव, कै. शंकर धोंडी पाटील, नामदेवराव भोईटे (सर्व राधानगरी), प्रा. डॉ. एन. डी. पाटील, कै. रवींद्र सबनीस, कै. दिलीप देसाई, मालोजीराजे छत्रपती (कोल्हापूर शहर), कै. आर. बी. पाटील, पी. एन. पाटील (करवीर), माजी मंत्री भरमू पाटील (चंदगड), कै. विक्रमसिंह घाटगे, माजी आमदार संजय घाटगे (कागल), के. एल. मलाबादे, शिवगोंडा पिरगोंडा पाटील (इचलकरंजी), बाबूराव सातगोंडा पाटील (गडहिंग्लज), राजीव आवळे (हातकणंगले) यांना विधानसभेत एकदाच काम करण्याची संधी मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com