Vidhan Sabha 2019 : मिरजेत खाडेंविरुद्ध आश्‍वासक चेहरा कोणाचा?

प्रमोद जेरे
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

जिल्ह्यातील एकमेव मंत्री, सलग दोन वेळा मोठे मताधिक्‍य, कमकुवत विरोधक या आमदार सुरेश खाडे यांच्या जमेच्या बाजू आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका या निवडणुकांत रिझल्ट दाखवून, गट बांधून, भाजपची मुळे विस्तारून त्यांनी पक्षाला ‘मी दंगलीचा आमदार नाही’ हे सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्यासमोर आता आश्‍वासक चेहरा कोण, हेच मोठे प्रश्‍नचिन्ह आहे. 

जिल्ह्यातील एकमेव मंत्री, सलग दोन वेळा मोठे मताधिक्‍य, कमकुवत विरोधक या आमदार सुरेश खाडे यांच्या जमेच्या बाजू आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका या निवडणुकांत रिझल्ट दाखवून, गट बांधून, भाजपची मुळे विस्तारून त्यांनी पक्षाला ‘मी दंगलीचा आमदार नाही’ हे सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्यासमोर आता आश्‍वासक चेहरा कोण, हेच मोठे प्रश्‍नचिन्ह आहे. 

भाजपची उमेदवारी सुरेश खाडे यांना पक्की आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि वंचितकडून अद्याप एकमत नाही. किंबहुना काँग्रेस - राष्ट्रवादीचा उमेदवार मी ठरवलेला असेल, असे आमदार खाडे नेहमीच सांगत आले आहेत. येथे संपूर्ण महापालिका क्षेत्राचे वाटोळे केलेला ‘मिरज पॅटर्न’ विधानसभेलाही जोरात चालतो. सुरेश खाडे यांनी या पॅटर्नचा वेळोवेळी सदुपयोग करून घेतला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक आतून श्री. खाडे यांना मदत करत असल्याने आश्‍वासक ठरेल, असा विरोधकच समोर येत नाही, ही मिरज मतदारसंघाची स्थिती आहे. 

२००९ च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. एका दशकासाठी जनता दलाचे आमदार होते. २००९ च्या दंगलीनंतर गेल्या दहा वर्षांत भाजपने या मतदारसंघात ताकद नव्याने निर्माण केली. २००९ च्या निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर सुरेश खाडे यांच्यावर ‘दंगलीचा आमदार’ म्हणूनही टीका झाली. विविध विकासकामांबाबत त्यांची कुचंबणा करण्यात आली. परंतु, २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी सर्व विरोधकांना झटका देत ६४ हजार मतांनी मिळवलेला विजय प्रभावी ठरला. त्यानंतर सुरेश खाडे यांनी आतापर्यंत २२०० कोटी रुपयांचा विकास निधी मतदारसंघात आणल्याचा दावा करण्यात आला आहे. मध्यंतरी याबाबत पंचायत समितीमधील सदस्यांनी आणि पारंपरिक विरोधकांनी घडवून आणलेली चर्चा वगळता जाब विचारण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी अथवा अन्य विरोधी पक्षातील एकही नेता पुढे आला नाही. 

साहजिकच यामुळे खाडे यांचा आत्मविश्वास वाढला आहे. आता त्यांनी थेट काँग्रेस - राष्ट्रवादीचा उमेदवार मी ठरवलेला असेल, असे पुन्हा एकदा जाहीरपणे सांगायला सुरवात केली आहे. मध्यंतरी खाडे यांनी काँग्रेस - राष्ट्रवादीला डिवचताना ‘जरा ताकदीचा उमेदवार द्या, पालापाचोळ्यासारखे उमेदवार देऊन हसे करून घेऊ नका’, असा टोला हाणला होता. तो किती गांभीर्याने घेतला जातो, हे यथावकाश कळेलच. काँग्रेस इच्छुक उमेदवारांना एका बैठकीत ‘आर्थिक क्षमता असेल तरच निवडणुकीत उतरा’, असा सल्ला काँग्रेस नेत्यांनी दिला होता. त्यामुळे काँग्रेसचे इच्छुकही हातचे राखूनच वाटचाल करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी पक्षातर्फे बाळासाहेब मोरे आणि नगरसेवक योगेंद्र थोरात, काँग्रेसकडून सदाशिव खाडे, सिद्धार्थ जाधव, प्रतीक्षा सोनावणे, शिवसेनेकडून तानाजी सातपुते आदींनी शड्डू ठोकला आहे. वंचित आघाडीचे नाना वाघमारे हा नवीन चेहराही मैदानात असेल. 

आमदार खाडे शहरातील भाजी मंडई, शिवाजी क्रीडांगणाची दुरुस्ती, म्हैसाळ योजनेसाठी मंजूर केलेला निधी, वीज बिलाचा सोडवलेला गुंता याचे ते मार्केटिंग करत आहेत. अर्जुनवाड रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपूल, शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग, गुंठेवारीतील रस्त्यांची कामे, शहरातील सिग्नल व्यवस्था यासह अनेक विकासकामे बाकी आहेत. 

या मुद्द्यांवर विरोधकांना टीकेची संधी आहे, मात्र विरोधक एकत्र नाहीत. नुकत्याच झालेल्या  लोकसभा निवडणुकीत मिरज शहरातील मताधिक्‍य घटले आहे. ते भाजपसाठी चिंतेचा विषय असेल. खाडे यांना शहराची या निवडणुकीत बरीच बांधबंदिस्ती करावी लागणार आहे. ‘मिरज पॅटर्न’ ही दुधारी तलवार आहे. 

उमेदवारीसाठी इच्छुक....  

  • भाजप - सुरेश खाडे 
  • काँग्रेस - आनंदा डावरे, डॉ. नामदेव कस्तुरे, प्रतीक्षा सोनवणे,सदाशिव खाडे, सिद्धार्थ जाधव. 
  • राष्ट्रवादी - बाळासाहेब होनमोरे,योगेंद्र थोरात 
  • शिवसेना- तानाजी सातपुते
  • बहुजन वंचित विकास आघाडी - नाना वाघमारे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha 2019 Miraj Assembly Constituency special report