Vidhansabha 2019 : पन्हाळा - शाहूवाडी मतदारसंघात कोरेंच्या बैठका

संजय पाटील
शनिवार, 6 जुलै 2019

वारणानगर - जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांनी पन्हाळा - शाहूवाडी मतदारसंघात विधानसभेसाठी बैठका, संपर्क वाढविला आहे. हातकणंगलेतही जनसुराज्यचे माजी आमदार राजीव आवळे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केल्याने कार्यकर्ते रिचार्ज होऊ लागल्याचे चित्र आहे.

वारणानगर - जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांनी पन्हाळा - शाहूवाडी मतदारसंघात विधानसभेसाठी बैठका, संपर्क वाढविला आहे. हातकणंगलेतही जनसुराज्यचे माजी आमदार राजीव आवळे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केल्याने कार्यकर्ते रिचार्ज होऊ लागल्याचे चित्र आहे.

विधानसभा निवडणुका ऑक्‍टोबरमध्ये होण्याची शक्‍यता आहे. गेल्यावेळी डॉ. कोरे, आवळे यांना पराभव स्वीकारावा लागला होता. पाच वर्षांत डॉ. कोरे यांनी भाजपच्या संपर्कात राहून विकास साधण्याचा प्रयत्न केला. गतवेळच्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी कोरे यांनी रणनीती सुरू केली आहे. प्रत्येक गावात जनसुराज्यचा गट आहे. गावातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचे काम सुरू असून, ज्या गावात अडचणी आहेत, तेथे बैठका घेऊन कार्यकर्त्यांत समन्वय साधत आहेत. मताधिक्‍य मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांना रिचार्ज करण्याचे काम करत आहेत.

वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहामुळे जनसुराज्यचे हातकणंगलेतही वर्चस्व आहे. २००४ च्या निवडणुकीत जनसुराज्यच्या स्थापनेलाच तत्कालीन वडगाव (सध्या हातकणंगले) मतदारसंघातून सामाजिक न्याय मंत्री जयवंतराव आवळे यांना पराभूत करून नवखे राजीव आवळे विजयी झाले होते. याचवेळी चंदगडमधून नरसिंग गुरुनाथ पाटील, अमरावती जिल्ह्यातील मोरसीतून हर्षवर्धन देशमुख विजयी झाले होते. त्यानंतर २००९ मध्ये कोरे व मौलाना हे मालेगाव (मुंबई) मधून विजयी झाले होते. 

२०१४ मध्ये आमदार सत्यजित पाटील यांनी कोरे यांचा पराभव केला; तर हातकणंगलेतून २००९ व २०१४ ला राजीव आवळे पराभूत झाले. यंदा पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी डॉ. कोरे यांनी विशेष लक्ष घातले आहे. आवळे यांनी मतदारसंघातील जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या गावातील जनसुराज्यच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन, निवडणुकीचे नियोजन सुरू केले आहे.

हातकणंगलेतून उमेदवारी कोणाला?
शाहूवाडीतून स्वतः कोरे उभे राहणार असून, अद्याप हातकणंगलेची उमेदवारी जाहीर केलेली नाही. आवळे यांच्यासह डॉ. मिलिंद हिरवे, अविनाश सावर्डेकर इच्छुक असून, त्यांनीही संपर्क वाढविला आहे. तिघांनाही उमेदवारीची गॅरंटी असल्याने जनसुराज्यची उमेदवारी हातकणंगलेत कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे जनसुराज्य, शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीसह अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष 
लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha 2019 Vinay Kore, Rajeev Awale in race