Vidhansabha 2019 : भाजपचे आता मिशन विधानसभा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मे 2019

लोकसभा निवडणुकीपूर्वीच भारतीय जनता पक्षाने जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी केली आहे. त्याचा फायदा शिवसेनेच्या उमेदवाराला झाला. आता विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघात बांधणी करून जिल्ह्यात परिवर्तन घडविण्यासाठी भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते  सक्रिय राहतील.
- विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष, भाजप, सातारा

सातारा - लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारासाठी झटलेल्या भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात इच्छुक असलेल्यांनी संपर्क मोहिमेचे नियोजन केले आहे. सर्वसामान्य शेतकरी व जनतेसाठी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी राबविलेल्या विविध योजना तळागाळापर्यंत पोचविण्याचे काम यानिमित्ताने होणार आहे. लोकसभेच्या रणधुमाळीत आमदारकीसाठी इच्छुक असलेल्यांनी संपर्काची पहिली फेरी पूर्ण केली आहे. आता प्रत्यक्ष निवडणुकीसाठी भाजपच्या नेत्यांनी रणनीती आखायला सुरवात केली आहे.

जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचा एकही आमदार नसताना केवळ संघटनात्मक बांधणीच्या जोरावर जिल्हा परिषदेचे सात सदस्य निवडून आणले आहेत. पण, गेल्या पाच वर्षांच्या कालखंडात केंद्रातील नरेंद्र मोदी व महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असूनही भाजपच्या सर्व मंत्र्यांनी साताऱ्यावर लक्ष केंद्रित केले आहे. यातूनच अतुल भोसले, शेखर चरेगावकर यांना पदे देऊन राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला. तसेच प्रत्येक मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी नवीन उमेदवार तयार केला आहे.

त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी सातारा जिल्ह्यात लक्ष घालून पक्षाची बांधणी करताना बेरजेचे राजकारणही केले. सध्या भाजपमधून साताऱ्यातून दीपक पवार, कोरेगावातून महेश शिंदे, कऱ्हाड उत्तरमधून मनोज घोरपडे, कऱ्हाड दक्षिणेतून अतुल भोसले, माणमधून अनिल देसाई, डॉ. दिलीप येळगावकर, वाईतून मदन भोसले तसेच शिवसेनेचे पाटणमध्ये विद्यमान आमदार शंभूराज देसाई हे रिंगणात असणार आहेत. त्यासोबतच फलटणमधून दिगंबर आगवणे यांचा समावेश आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार अस्तित्वात आले आहे. त्यामुळे आगामी काळात सातारा जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांना आणखी ताकद आणि विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळणार आहे. 

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपने विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन यापूर्वी केलेली विकासकामे आणि प्रलंबित असलेली कामे पूर्णत्वास नेण्यासाठी निधी उपलब्ध करणे यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. मात्र, सध्या शिवसेना व भाजपची युती आहे. मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या वाट्याला वाई, पाटण, कोरेगाव, कऱ्हाड उत्तर आणि फलटण पाच विधानसभा मतदारसंघ होते. पण, आता यामध्ये आगामी निवडणुकीसाठी फेरबदल होणार आहेत. सक्षम उमेदवार असलेल्या ठिकाणी भाजप दावा करणार आहे. त्यामुळे आठपैकी किती मतदारसंघ भाजप आपल्याकडे घेणार, याची उत्सुकता आहे. सध्यातरी कऱ्हाड दक्षिण, कऱ्हाड उत्तर, कोरेगाव, सातारा, माण या पाच ठिकाणी भाजपमधील इच्छुकांनी लोकसभा निवडणुकीपासूनच संपर्क मोहीम राबविली आहे. त्यामुळे लोकसभेच्या रणधुमाळीत त्यांनी मतदारांपर्यंत पोचण्याची पहिली फेरी पूर्ण केल्याचे चित्र आहे. 

आता प्रत्यक्ष निवडणुकीसाठी भाजपच्या नेत्यांनी रणनीती आखली आहे. त्यानुसार युतीच्या जागा वाटपात भाजपला अनुकूल असलेल्या मतदारसंघावरच भाजप दावा करणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र पाटील यांना भाजपमधून शिवसेनेत पाठवून उमेदवारी दिली होती. त्यांना मिळालेल्या साडेचार लाख मतांमध्ये भाजप, शिवसेना व मित्रपक्षांना मानणाऱ्या मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे भाजपच्या वाट्याची नेमकी मते किती, हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. त्यावरच आगामी निवडणुकीत भाजपला किती जागांवर यश मिळेल, याचे गणित ठरणार आहे.

सध्यातरी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपमधील इच्छुकांनी संपर्क मोहीम सुरू करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे केंद्रात भाजपची सत्ता स्थापन होत असताना सातारा जिल्ह्यात भाजपचे मिशन विधानसभा सुरू झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 BJP Mission Vidhansabha Politics