Vidhansabha 2019 : वंचित आघाडीचे बळ प्रभावी ठरणार

निखिल पंडितराव
शनिवार, 18 मे 2019

असा असेल राजकीय पट

  • इचलकरंजीत प्रचार कशावर होणार, यावर सत्ता अवलंबून
  • हातकणंगलेमध्ये महाडिक गटाची रसद कोणाला?
  • शिराळ्यात सम्राट महाडिकांमुळे तिरंगी लढत
  • वंचित आघाडीच्या उमेदवारांवर हलणार सत्तेचा लंबक
  • इस्लामपूरमध्ये जयंत पाटलांविरुद्ध आव्हान उभे करण्याचे प्रयत्न

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात युती, आघाडीबरोबरच वंचित आघाडी किती प्रभाव टाकते, यावरच विधानसभेचा सारा पट अवलंबून असेल. वंचित आघाडी कुठे आणि किती मते घेते, यानुसारच विधानसभेसाठी गणिते आखली जातील. 

हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील चार आणि सांगली जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ येतात. यंदाच्या लोकसभेसाठी खासदार शेट्टी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी केल्याने प्रत्येक मतदारसंघातील त्यांची मते आघाडीकडे वळतील आणि शिवसेना-भाजपला फटका बसेल, असे वाटत होते. परंतु या मतदारसंघात वंचित आघाडी हा आणखी प्रभावी घटक असेल. लोकसभेच्या निकालानंतर वंचित आघाडीसाठी सत्तेच्या पटावर डाव टाकले जातील.

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर विरुद्ध काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्येच लढत असेल. भाजप-शिवसेना याबरोबर व्यापारीवर्गातील मते निर्णायक ठरतील. शेट्टी या वेळी आवाडेंच्या बरोबरीने उतरल्याने निवडणूक पक्षावर की जातीवर जाते, हा उत्सुकतेचा विषय असेल.

शेट्टींचा बालेकिल्ला शिरोळमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते गणपतराव पाटील व राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची मोठी साथ असेल. तरीही शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांचाही मतदारसंघावर प्रभाव आहे. भाजपने येथे आपली ताकद निर्माण केली आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र  पाटील-यड्रावकर, स्वाभिमानीचे सावकार मादनाईक आणि शिवसेनेचे उल्हास पाटील यांच्यात लढत होती. फुटीचा फायदा घेत उल्हास पाटील यांनी बाजी मारली. या वेळी एकास एक लढतीने चुरस होईल.

हातकणंगलेमध्ये शिवसेनेचे आमदार सुजित मिणचेकर हॅट्ट्रिकच्या तयारीत आहेत, परंतु त्यांच्याविषयी सुप्त नाराजी जाणवते. त्यावर ते कशी मात करतात, यावरच भवितव्य अवलंबून आहे. वंचित आघाडी निर्णायक भूमिका बजावू शकते. येथे चौरंगी लढतीची शक्‍यता आहे. 

शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील यांचा मतदारसंघ शाहूवाडीमध्ये जनसुराज्यचे विनय कोरे प्रमुख विरोधक असतील. काँग्रेसचे करणसिंह गायकवाड आणि मानसिंग गायकवाड हेदेखील रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. कोरे जर युतीबरोबर गेले, तर मतदारसंघात त्यांची कोंडी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे त्यांनी लोकसभेमध्ये अलिप्तपणाची भूमिका घेऊन कार्यकर्त्यांना सोयीची भूमिका घेण्यास सांगितले.

इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विरुद्ध निशिकांत पाटील यांच्यात लढतीची शक्‍यता आहे. निशिकांत पाटील यांच्या मागे राज्यमंत्री सदाभाऊ खोत, वैभव नायकवडी यांची मोठी ताकद असेल. निशिकांत पाटील भाजपमधून रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. जयंत पाटील यांच्याबरोबर या वेळी शेट्टी यांची रसद असेल.

शिराळा विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र असेल. भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार मानसिंगराव नाईक असतील. ही लढत तिरंगी करणारे तिसरे उमेदवार सम्राट नानासाहेब महाडिक असतील.

Web Title: Vidhansabha Election 2019 Hatkanangale Constituency Vanchit Aghadi Power Politics