Karad-North-Constituency
Karad-North-Constituency

Vidhansabha 2019 : कऱ्हाड उत्तरवरील दाव्याने युती संभ्रमावस्थेत

कऱ्हाड - विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने सर्वच मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कऱ्हाड उत्तरमध्ये काँग्रेस आघाडीकडून विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील मैदानात आहेत.

भाजपकडून युवा नेते मनोज घोरपडे यांची तयारी सुरू असून, शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे - पाटील यांनी कऱ्हाड उत्तरवर शिवसेनेचा दावा केल्यामुळे युतीचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे युतीच्या जागा वाटपाच्या सूत्र निश्‍चितीनंतरच जिल्ह्यातील मतदारसंघांचे चित्र स्पष्ट होणार आहे.  

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे.

लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही दोन्ही काँग्रेसची आघाडी व शिवसेना- भाजप युतीद्वारे निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

अद्याप जागा वाटपाचा फॉर्म्युला, मतदारसंघ याबाबत अंतिम स्वरूप आलेले नाही. कऱ्हाड उत्तरमध्ये आघाडीचे सूर जुळल्याचे दिसून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांच्या उमेदवारीवर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी रिसवड येथ व दोन दिवसांपूर्वी आमदार आनंदराव पाटील यांनी मसूर येथे झालेल्या कार्यक्रमावेळी कऱ्हाड उत्तरेत आमदार बाळासाहेब पाटील यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन करून भूमिका स्षष्ट केली आहे. लोकसभच्या निमित्ताने आमदार पाटील यांनीही मतदारसंघ पिंजून काढून मशागत केलेली आहे. गेल्या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवारी केलेले मनोज घोरपडे भाजपच्या माध्यमातून मतदारसंघात कार्यरत आहेत.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या माध्यमातून मतदारसंघात विकासकामे करत आहेत. त्यामुळे या वेळी आमदार पाटील व घोरपडे यांच्यात निवडणुकीची रंगत येण्याची शक्‍यता आहे. गेल्या वेळचे काँग्रेसचे उमेदवार वर्धन ॲग्रोचे अध्यक्ष धैर्यशील कदम या वेळी मतदारसंघात फारसे सक्रिय नसल्याची चर्चा आहे. कारखान्याच्या माध्यमातून त्यांचे काम सुरू आहे. त्यामुळे श्री. कदम यांची उमेदवारी असणार का? असल्यास कोणत्या पक्षातून? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच उंब्रज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे उपनेते व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा. बानुगडे - पाटील यांनी कऱ्हाड उत्तर मतदारसंघ शिवसेनेचा असल्याचे सांगून येथे भगवा फडकेल, असा विश्‍वास व्यक्त केला आहे. त्यामुळे युतीच्या कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण असल्याचे दिसून येते. मुळात मतदार संघात शिवसेनेची ताकद किती? मतदार संघ मिळालाच तर लढत देणारा उमेदवार कोण? यांसह अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत. यामुळे युतीच्या कार्यकर्त्यांत निर्माण झालेला संभ्रम युतीच्या जागा वाटप व मतदारसंघाचा फॉर्म्युला ठरल्यावरच स्पष्ट होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com