Vidhansabha 2019 : माणमध्ये लोकसभेचा वचपा विधानसभेत?

Jaykumar-Gore
Jaykumar-Gore

सातारा - लोकसभा निवडणुकीत आघाडी धर्म न पाळता काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी उघडपणे भाजपला मदत केली. आगामी काळात घडणाऱ्या राजकीय घडामोडींवर नजर ठेवत आमदार गोरे यांच्याविरोधात उमेदवार उभा करून या दगाफटक्‍याचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अंतर्गत बांधणी सुरू झाली आहे.

मागील विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीतील आघाडी तुटली. त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसला. यातून बोध घेत या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. भाजपला कोणत्याही परिस्थितीत सत्तेपासून रोखण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी एकत्रित काम करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यानुसार राज्यात बहुतांश ठिकाणी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी काम केले. काही ठिकाणी अंतर्गत कुरघोडीचे प्रयत्न झाले. मात्र, काँग्रेसचा आमदार असताना भाजपच्या उमेवाराचे काम नगर व सातारा जिल्ह्यात झाले. नगरमध्ये आमदार व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मुलगा डॉ. सुजयने भाजपकडून खासदारकीची निवडणूक लढवली. तशाच पद्धतीने माढ्यामध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्या पाठबळावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष (बाहेर पडून) रणजितसिंह नाईक-निंबाळकर भाजपचे उमेदवार झाले.

भाजपला सत्तेपासून दूर रोखणे, हे दोन्ही काँग्रेसच्या पुढील भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असताना आमदार गोरे यांनी आघाडी धर्म पाळला नाही. रणजितसिंहांना भाजपत पाठविण्याची छुपी खेळी करूनच ते थांबले नाहीत. सातारा मतदारसंघात आघाडी धर्म आणि माढ्यात आमचा आम्ही निर्णय घेऊ, अशी उघड भूमिका त्यांनी मांडली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना आपल्या व्यासपीठावर घेऊन उघड पाठिंबा दिला. भाजपने माढा मतदारसंघात चांगली ताकद लावली होती.

विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांना आपल्या गोटात ओढले. त्यानंतर आमदार गोरे यांची भूमिका यामुळे माढा मतदारसंघातील विरोधकांपेक्षा स्वकीयांच्या भूमिकेमुळेच चुरशीची झाली. राष्ट्रवादीला या मतदारसंघात खूप झुंजावे लागले. तर, या मतदारसंघात मागे असलेला भाजप विजयाचा दावा करू लागली आहे. 

आमदार गोरे यांच्या या भूमिकेमुळे अद्याप काँग्रेसने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. परंतु, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते भाजपमध्ये जातील, या चर्चांनाही उधाण आले आहे. ते भाजपत गेले तर, त्यांच्याशी थेट लढत करण्याची संधी राष्ट्रवादीला मिळण्याची शक्‍यता आहे. त्या दृष्टीनेही व्यूहरचना आखली जावू शकते. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या निकालांचा रोख पाहून तसेच पक्षाकडून कारवाई न झाल्यास आमदार गोरे काँग्रेसमधूनच लढले तरीही त्यांना चितपट करण्यासाठी राष्ट्रवादीने आतापासून बांधणी सुरू केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com