Vidhansabha 2019 : शिवेंद्रसिंहराजेंचा अर्जच नाही

उमेश बांबरे
गुरुवार, 25 जुलै 2019

मतदारसंघनिहाय पक्षाकडे अर्ज आलेल्यांची नावे 
सातारा : अर्ज नाही.
वाई : आमदार मकरंद पाटील.
कोरेगाव : आमदार शशिकांत शिंदे.
फलटण : आमदार दीपक चव्हाण, प्रा. शिवकुमार शिंदे, प्रा. डॉ. अनिल जगताप, अशोक माने.
माण : प्रभाकर देशमुख, प्रा. कविता म्हेत्रे, नंदकुमार मोरे, संदीप मांडवे, सूर्यकांत राऊत, सुहास पिंगळे.
कऱ्हाड उत्तर : आमदार बाळासाहेब पाटील.
कऱ्हाड दक्षिण : ॲड. राजाभाऊ उंडाळकर, अनिल पाटील.
पाटण : सत्यजितसिंह पाटणकर.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आज मुलाखती; माण, फलटणमध्ये सर्वाधिक इच्छुक
सातारा - विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाकडे इच्छुकांचे अर्ज मागविले होते. त्यानुसार सातारा जिल्ह्यातून विद्यमान आमदारांसह माण, फलटण तालुक्‍यांतून इच्छुकांचे सर्वाधिक अर्ज आले आहेत. या इच्छुकांच्या मुलाखती उद्या (गुरुवारी) माजी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: उपस्थित राहून घेणार आहेत. 

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या वाटणीमध्ये माण काँग्रेसकडे असूनही तेथून राष्ट्रवादीतून इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे माणच्या जागेवर राष्ट्रवादीकडून दावा सांगितला जाऊ शकतो. तर सातारा-जावळीतून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासोबत इतर कोणाही इच्छुकांचा अर्ज आलेला नाही. त्यामुळे ते उद्या (गुरुवारी) होणाऱ्या मुलाखतीला उपस्थित राहणार का, याबाबत उत्सुकता आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळेस इच्छुकांचे पक्षाकडेच उमेदवारी अर्ज मागवून घेतले आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात तिकीट न मिळाल्यास पक्ष सोडणाऱ्यांची संख्या वाढू शकते. त्यातच काही ठिकाणी राष्ट्रवादीतील नाराजांवर भाजपच्या नेत्यांचा डोळा आहे.

यामुळे राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत पक्षाची होणारी गळती रोखण्याचे आव्हान पेलावे लागण्याची शक्‍यता लक्षात घेऊन प्रदेश राष्ट्रवादीने यावेळेस आमदारकी-साठी पक्षाची निवडणूक प्रक्रिया राबविली आहे. यामध्ये राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघां-तील इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत. हे अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन पध्दतीने घेतलेले आहेत. पक्षाकडे सातारा जिल्ह्यातून सर्व विधानसभा मतदारसंघांतून एकूण १६ इच्छुकांनी साताऱ्यातील राष्ट्रवादी भवनात तर उर्वरित प्रदेश कार्यालयात ऑनलाइन पध्दतीने अर्ज भरले आहेत. त्यांचा आकडा अद्यापही गुलदस्त्यात आहे.

सातारा विधानसभा मतदारसंघातून मात्र विद्यमान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा अर्ज पक्षाकडे आलेला नाही. त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही पदाधिकारी वा कार्यकर्त्याने सातारा-जावळीतून इच्छुक म्हणून पक्षाकडे अर्ज केलेला नाही. त्यामुळे उद्या होणाऱ्या मुलाखतीला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित राहणार का, याबाबत प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबतचा वाद पक्षश्रेष्ठींनी मिटविण्याची भूमिका घेतल्याशिवाय शिवेंद्रसिंहराजे भोसले पक्षाकडे अर्ज दाखल करणार नाहीत. विधानसभा निवडणुकीत उदयनराजे हे आमदारांचे काम करणार का, याबाबत शिवेंद्रसिंहराजेंना साशंकता असल्यानेच आमदारांनी अशी भूमिका घेतल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 NCP Interview shivendra raje bhosale Form Politics