राजे जिंकले; आमदारांची परीक्षा कायम!

राजेश सोळसकर
शनिवार, 25 मे 2019

उदयनराजे विजयी झाले म्हणून राष्ट्रवादीच्या आमदारांनी नक्कीच मोकळा श्‍वास घेतला असेल. तसा तो घ्यायलाही हरकत नाही; पण आता विधानसभेचे आपले सगळे मार्ग मोकळे झाले, असा भाबडा निःश्‍वास मात्र त्यांना इतक्‍यात सोडता येणार नाही.

उदयनराजे विजयी झाले म्हणून राष्ट्रवादीच्या आमदारांनी नक्कीच मोकळा श्‍वास घेतला असेल. तसा तो घ्यायलाही हरकत नाही; पण आता विधानसभेचे आपले सगळे मार्ग मोकळे झाले, असा भाबडा निःश्‍वास मात्र त्यांना इतक्‍यात सोडता येणार नाही.

ज्या डहाळ्याला पाला जास्त असतो, त्याला शेंगा कमी लागतात... गावाकडच्या साध्या माणसाचं हे तत्त्वज्ञान युतीच्या राज्यस्तरीय नेत्यांना कधी कळलंच नाही. ‘साताऱ्यातून या वेळी उदयनराजे भोसले यांचा पराभव करणारच,’ या त्यांच्या निवडणुकीआधीच्या वल्गना म्हणजे नुसताच पालापाचोळा ठरला. अपेक्षांचे दाणे त्यात भरलेच नाहीत. साताऱ्याच्या कालच्या निकालावरून हेच तर स्पष्ट झालंय.

गेले काही महिने सुरू असलेल्या सर्व चर्चांना बाजूला सारत खासदार उदयनराजे भोसले यांनी तिसऱ्यांदा विजयश्री खेचून आणली आणि आपल्यापुढे कोणतीच लाट तग धरत नाही, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले. खरे तर, उदयनराजे विजयी झाले म्हणून राष्ट्रवादीच्या आमदारांनी नक्कीच मोकळा श्‍वास घेतला असेल. तसा तो घ्यायलाही हरकत नाही; पण आता विधानसभेचे आपले सगळे मार्ग मोकळे झाले, असा भाबडा निःश्‍वास मात्र त्यांना इतक्‍यात सोडता येणार नाही. कारण, ही निवडणूक उदयनराजे या नावाच्या वलयाची होती. एका करिश्‍म्याची होती. राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांनी आपापल्या मतदारसंघांत उदयनराजेंसाठी प्रामाणिकपणे काम केले. त्यांना मताधिक्‍य मिळवून दिले. हे मान्य केले, तरी विजयाचे बहुतांश श्रेय उदयनराजेंच्या करिश्‍म्याला जाते, याचा विसर आमदारांनी पडू देता कामा नये. कारण लोकसभेची ही निवडणूक आगामी काळात महाराष्ट्रात मोठी राजकीय स्थित्यंतरे घडवणारी ठरली आहे. महाराष्ट्राने युतीला सलग दुसऱ्यांदा दिलेला जनादेश आघाडीसाठी पुढचे दिवस खडतर असण्याची जाणीव करून देणारा आहे. म्हणूनच कोणत्याही लाटेपुढे तग धरू शकणारा उदयनराजेंसारखा करिश्‍मा आपल्यामध्ये आहे का, हा प्रत्येकाने स्वतःलाच करावयाचा सवाल आहे. तसा तो नसेल तर जनतेशी असलेली बांधिलकी आणखी घट्ट करण्याशिवाय अन्य विकल्प या आमदारांपुढे असणार नाहीत.

कोणत्याही घटनेचं विश्‍लेषण वेगवेगळ्या पद्धतींनी करता येतं. विश्‍लेषकाच्या विचारधारेचं त्यात प्रतिबिंब पडत असतं. म्हणूनच घटना एकच असली तरी तिची विश्‍लेषणं वेगवेगळी होतात. आता अनेकजण असं म्हणतात, की उदयनराजेंबाबत असलेल्या नाराजीमुळे त्यांचे मताधिक्‍य यावेळी कमी झालं. यात तथ्य असेलही; पण म्हणून विरोधकांनी केलेल्या प्रयत्नांना कमी लेखून कसं चालेल? आणि ज्या पद्धतीने गेल्या पाच वर्षांत भाजपने या जिल्ह्यात आपली ताकद वाढवली आहे, ती नाकारता तरी कशी येईल?

साताऱ्यात पाय रोवायचे हे त्यांचे मनसुबे आजचे नाहीत. पाच वर्षांपूर्वीच ते शिजले गेलेत. शिवसेना साताऱ्याची जागा सोडायला तयार होत नाही म्हटल्यावर अखेरच्या क्षणी नरेंद्र पाटील हा आपला उमेदवार त्या पक्षाला देणाऱ्या भाजपचे इरादे किती तीव्र आहेत, हे आघाडीतील धुरिण लक्षात घेणार की नाही? शिवसेनेच्या तिकिटावर लढलेल्या नरेंद्र पाटलांसाठी सारी यंत्रणा भाजपचीच तर झटत होती. म्हणूनच उदयनराजेंच्या मताधिक्‍याला केवळ आणि केवळ त्यांच्याबाबतच्या कथित नाराजीचं लेबल लावणं योग्य ठरत नाही. ‘विजयासाठी काहीही’ या भाजपच्या धोरणाला साताऱ्यात समोर उदयनराजे होते म्हणूनच तडा गेला. अन्यथा, इथेही वेगळे चित्र दिसले असते. शेवटी ही लोकशाही आहे. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायची मुभा आहे. त्यामुळे या बालेकिल्ल्याला भगदाड पाडायची अपेक्षा भाजपने का करू नये? म्हणूनच भाजपने या वेळी शिवसेनेच्या धनुष्यातून का होईना; पण नरेंद्रास्त्र सोडले. अर्थात ते अपयशी झाले असले, तरी या अस्त्राने मतदानाआधी अनेकांना घायाळ केले.

मोठी निवडणूक लढवण्याचा कमी अनुभव, ऐनवेळी शिवसेनेतून लढावे लागणे, प्रचारासाठी मिळालेला कमी वेळ अशी अनेक कारणे नरेंद्र पाटील यांच्या अपयशासाठी सांगता येतील; पण त्यांनी तयार केलेल्या चुरशीचे कौतुक करावेच लागेल. लोकसभेसाठी तयार झालेले हे वातावरण विधानसभेसाठी अनुकूल ठेवण्याचा प्रयत्न भाजप नक्कीच करेल. कारण पक्ष वाढवणे हा त्यांचा हक्क आहे. तो ते नक्कीच पार पाडण्याचा प्रयत्न करतील. उदयनराजेंच्या विजयामुळे सुटकेचा श्‍वास सोडलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांसाठी पुढे हाच तर धोका आहे. तो टाळायचा असेल, तर जनतेच्या अपेक्षांचे ओझे त्यांना कमी करावे लागेल.

विकासाचं स्वप्न साकार करावे लागेल. शिक्षण, रोजगार या तरुणाईच्या अपेक्षा पूर्ण कराव्याच लागतील. त्यांना जनतेला विकासाच्या प्रवाहात आणावे लागेल. कारण, जो प्रवाहासोबत राहतो, तोच शेवटी सागराला मिळतो. कचरा काठावर फेकला जातो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 NCP MLA Politics