Vidhansabha 2019 : राष्ट्रवादीला ‘प्लॅन बी’ करावा लागणार

प्रवीण जाधव
Saturday, 27 July 2019

साताऱ्यासह कोरेगाव, कऱ्हाड उत्तरेत परिणाम
दरम्यान, शिवेंद्रसिंहराजेंचे पक्षांतर झाल्यास जिल्ह्यातील राष्ट्रवादीची घडी नक्कीच सैल होणार आहे. त्याचे सातारा, कोरेगाव, कऱ्हाड उत्तर मतदारसंघांवर परिणाम होणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघांतील विधानसभेतील राजकीय नाट्य पाहणे रंगतदार असणार आहे.

सातारा - शिवेंद्रसिंहराजेंच्या संभाव्य पक्षांतराच्या निर्णयामुळे सातारा विधानसभा मतदारसंघात खळबळ उडाली आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजपबरोबरच राष्ट्रवादीसाठीही प्रतिष्ठेची असणार आहे. दोन्ही बाजूकडून पूर्ण ताकद लावली जाणार असल्याने या मतदारसंघातील राजकीय नाट्य कोणत्या वळणावर जाणार, हे पाहणे आैत्सुक्‍याचे ठरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु, त्याचा मुहूर्त ठरल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काल झालेल्या मुलाखतीला मारलेल्या दांडीवरूनही त्यांचा कल दिसून येतो. त्यांचे कार्यकर्तेही भाजपवासी झाल्यासारखेच वावरू लागले आहेत. दुसरीकडे दीपक पवारांना भाजपने राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल केला आहे. या घडामोडींमुळे राष्ट्रवादीही सावध झाली आहे. विद्यमान आमदार जावू नयेत यासाठी पक्षाकडून शेवटचा प्रयत्न होईलही. परंतु, त्याला शिवेंद्रसिंहराजेंकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहावे लागणार आहे. तो नकारात्मक असला तर काय? राष्ट्रवादीला त्यासाठी ‘प्लॅन बी’ तयार करावा लागणार आहे.  

अशा परिस्थितीत सातारा मतदारसंघासाठी सर्वांत आघाडीवर नाव असणार आहे ते कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांचे. त्यांनी सध्याच्या सातारा मतदारसंघामध्ये असलेल्या जावळी तालुक्‍याचे प्रतिनिधित्व यापूर्वी केलेले आहे. जावळीतील प्रत्येक गाव अन्‌ गाव आणि कार्यकर्ता त्यांना माहीत आहे. कोणत्या कार्यकर्त्याला कसे वळवायचे, याची माहिती व कसब त्यांच्याकडे आहे. सातारा शहरातही त्यांचे कार्यकर्त्यांचे चांगले ‘नेटवर्क’ आहे.

राष्ट्रवादीतील एक चांगले व्यक्तिमत्त्व म्हणून येथील लोक त्यांच्याकडे पाहतात. खासदार उदयनराजेंच्या निवडणुकांमध्ये नेहमीच त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे उदयनराजेंचे सातारा शहर व तालुक्‍यातील ‘नेटवर्क’ही त्यांच्या बाजूला भक्कम उभे राहू शकते. या मतदारसंघामध्ये भाजपचे दीपक पवार यांनी आधीपासून तयारी केली आहे. ऐनवेळी उमेदवारी डावलली गेल्यास त्यांचा प्रतिसाद कसा असणार, यावरही त्यांचे मतदार कोणाच्या मागे जाणार, हे ठरणार आहे. त्याचा फायदाही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला होऊ शकतो.

आमदारांच्या जाण्याने होणारी पोकळी भरून काढण्यासाठी भाजपवासी असलेल्या अमित कदम यांचीही राष्ट्रवादीत ‘घरवापसी’ होऊ शकते. इच्छुकांच्या यादीत त्यांचाही समावेश असू शकतो. उदयनराजेंशी त्यांच्या असलेल्या जवळिकीचा दाखला त्यासाठी दिला जात आहे. त्यांच्या जावळीतील ताकदीचा उपयोग राष्ट्रवादी करून घेणार का आणि कसा करून घेणार, हे आगामी काळात समोर येईलच. उदयनराजेंचा या मतदारसंघातील प्रभाव लक्षात घेता आणखीही काही नावे समोर येऊ शकतात. सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. यामध्ये झालेली बंडखोरी व त्याचे परिणाम संपूर्ण राज्यावर प्रभाव टाकणारे असणार आहेत. त्यामुळे बंडखोरांना रोखण्यासाठी राष्ट्रवादीला तेवढ्याच ताकदीने या मतदारसंघात उतरावे लागणार आहे. संपूर्ण राज्यात उदाहरण ‘सेट’ करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जाईल. त्यामुळे पक्षांतर केल्यास शिवेंद्रसिंहराजेंना ताकदीच्या विरोधकाचा सामना करावा लागेल, हे निश्‍चित.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 NCP Shivendrasinhraje Bhosale BJP Politics