Vidhansabha 2019 : आठपैकी सहा जागांवर भाजप सांगणार हक्क

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील आठपैकी सहा जागांवर आमचा दावा असेल. त्यापैकी किमान चार आमदार निवडून आणण्याची रणनीती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तयार केली आहे. त्यामुळे युतीच्या जागा वाटपात साताऱ्यातील काही जागांमध्ये बदल होण्याची शक्‍यता आहे. ज्या ठिकाणी आम्ही सक्षम आहोत, तेथे आम्ही उमेदवार देणार आहोत.
- विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष, भाजप

सातारा - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे आल्यानंतर सातारा जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात किमान चार आमदार निवडून आणण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी मिशन २०१९ अंतर्गत सातारा जिल्ह्यात बांधणी केली आहे. पाटण आणि फलटण वगळता उर्वरित सहा मतदारसंघांवर भाजपने दावा केला आहे.

विधानसभा निवडणुकीत युती कायम राहणार असल्यामुळे साताऱ्यात नेमकी काय परिस्थिती राहणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. गेल्या पाच वर्षांत युतीच्या सत्ता काळात भाजपने जिल्ह्यात ‘मायक्रो प्लॅनिंग’ करून पक्षसंघटना वाढविली आहे. मागील जिल्हा परिषद निवडणुकीत सात सदस्य निवडून आणले आहेत. आता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत चार आमदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’च्या बालेकिल्ल्यात ‘कमळ’ फुलविण्याचा प्रयत्न यशस्वी करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. त्यातच आता महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपचे प्रदेशाध्यक्षपद आल्याने आता साताऱ्यातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ते पश्‍चिम महाराष्ट्रात अधिक ताकदीने उतरून ‘राष्ट्रवादी’चा बालेकिल्ला संपविण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी त्यांनी सातारा जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार युतीच्या जागा वाटपात भाजप जिल्ह्यातील पाटण व फलटण विधानसभा मतदारसंघ वगळता उर्वरित सहा मतदारसंघांची मागणी करणार आहे. कारण या सहाही ठिकाणी भाजपकडे सक्षम उमेदवार आहेत. तसेच यावेळेस फलटण मतदारसंघ मित्रपक्षांना सोडण्याची तयारी केली आहे.

पण, नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी जर फलटण मतदारसंघाची मागणी केल्यास तोही भाजपकडे घेतला जाईल. त्या बदल्यात इतर मतदारसंघाची अदलाबदल केली जाणार आहे. त्यामुळे शिवसेनेने जरी पाच विधानसभा मतदारसंघांवर दावा केला असला तरी भाजपकडे सहाही मतदारसंघांत सक्षम उमेदवार आहेत. परिणामी प्रदेशाध्यक्ष झाल्यामुळे चंद्रकांत पाटील सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारसंघ भाजपकडे घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. यास शिवसेना कितपत साथ देणार, त्यावर आगामी निवडणुकीची गणिते अवलंबून आहेत. शिवसेनेकडे असलेल्या कोरेगाव, कऱ्हाड उत्तर, वाई या मतदारसंघांत भाजपकडे सक्षम उमेदवार असून, तेच ‘राष्ट्रवादी’च्या उमेदवाराशी चांगल्या प्रकारे लढत देऊ शकणार आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील साताऱ्यासाठी कोणती चाल खेळणार? यावर जिल्ह्यातील युतीची गणिते अवलंबून आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 Satara District BJP Seats Politics