Vidhansabha 2019 : सेनेच्या मतदारसंघांवर भाजपचा डोळा!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जून 2019

भाजपची घुसखोरी चालू देणार नाही... 
दरम्यान, शिवसेनेच्या वाट्याच्या मतदारसंघांत भाजपची घुसखोरी चालू देणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतलेली आहे. त्यामुळे युतीच्या समझोत्यात विधानसभा निवडणुकीसाठी काही बदल झाल्यास भाजपच्या हक्काच्या उमेदवारांना निवडणूक सोपी जाणार आहे. अन्यथा, भाजपच्या इच्छुकांना ‘वेट ॲण्ड वॉच’च्या भूमिकेत राहावे लागणार आहे.

सातारा - विधानसभा निवडणुकीसाठी साताऱ्यात शिवसेनेच्या वाट्यातील मतदारसंघांमध्ये हक्काचे उमेदवार नसल्याने आयात उमेदवारांवर मदार ठेऊन जिल्ह्यातील शिवसेनेला वाटचाल करावी लागणार आहे. पण, ज्या ठिकाणी सक्षम उमेदवार नाही, अशा जागेवर भाजपने डोळा ठेवला आहे.

त्यामुळे लोकसभेत वापरलेला आयात उमेदवाराचा पॅटर्न शिवसेनेला राबवावा लागणार आहे. त्यामुळे भाजपच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

विधानसभा निवडणुकीला तीन महिने उरले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच पक्षांतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. सध्या राष्ट्रवादीअंतर्गत दिग्गज नेत्यांत श्रेयवादावरून संघर्ष पेटला आहे. या संघर्षातून काहीजण भाजपच्या तर काही नेते शिवसेनेच्या वाटेवर जाण्याच्या तयारीत आहेत. सध्या सर्वजण आम्ही आपल्या पक्षासोबत एकनिष्ठ असल्याचे सांगत असले तरी आगामी काळातील आपली राजकीय वाटचाल यशस्वी होण्यासाठी सर्वांनीच हातपाय हलविण्यास सुरवात केली आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे शिवसेनेशी संपर्क ठेऊन असल्याची चर्चा आहे. या पक्षांतराच्या चर्चा त्यांनी चुकीच्या असल्याचे सांगितले आहे. पण, ते शिवसेनेत गेल्यास जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढणार आहे. त्यासोबतच प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील त्यांचे हक्काचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा गटही शिवसेनेत प्रवेश करू शकेल. याचा सर्वात मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसणार आहे. त्यामुळे इतका मोठा धोका राष्ट्रवादी कदापि पत्करणार नाही.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मातोश्रीवर सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. यासाठी जिल्ह्यातील शिवसेनेचे उपनेते व कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील तसेच लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील, खंडाळ्याचे नेते पुरुषोत्तम जाधव हे गेले आहेत. या बैठकीत जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे कोणता निर्णय जाहीर करणार, याची उत्सुकता सर्व कार्यकर्त्यांना आहे. सध्या सातारा जिल्ह्यातील शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या वाई, कोरेगाव, कऱ्हाड उत्तर, फलटण आणि माण मतदारसंघांत हक्काचा उमेदवार नाही. पण, मध्यंतरी भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्यांना आता आपल्याला उमेदवारी मिळावी, ही अपेक्षा आहे. सध्या वाईतून पुरुषोत्तम जाधव हे इच्छुकांत आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश केला. पण, भाजपने नरेंद्र पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी त्यांना शिवसेनेत पाठविले. त्यामुळे पुरुषोत्तम जाधव यांना थांबावे लागले होते. आता ते वाई विधानसभेतून लढणार आहेत. पण, येथून भाजपकडून मदन भोसले इच्छुक आहेत.

दुसरीकडे कोरेगावात शिवसेनेकडून युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले हे इच्छुक आहेत. पण, येथून भाजपचे महेश शिंदे यांनी तयारी सुरू केली आहे. कऱ्हाड उत्तरमध्ये शिवसेनेकडे हक्काचा उमेदवार नाही. पण, येथून भाजपचे मनोज घोरपडे हे इच्छुक आहेत. तर फलटणमधून दिगंबर आगवणे हे शिवसेनेतून इच्छुक आहेत. माणमधून त्यांच्याकडे हक्काचा उमेदवार नाही. पण, भाजपमधून डॉ. दिलीप येळगावकर, अनिल देसाई इच्छुक आहेत. तर जयकुमार गोरेंना भाजपमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू आहे. पण, भाजपअंतर्गत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला आहे. त्यामुळे येथून शिवसेना कोणाला तिकीट देणार, याची उत्सुकता आहे. उरला पाटण मतदारसंघ, येथे त्यांचा हक्काचा आमदार शंभूराज देसाई उमेदवार असल्याने येथे शिवसेनेला कोणतीही अडचण नाही.

या सर्व परिस्थितीत शिवसेनेच्या मतदारसंघांवर भाजपने उमेदवार तयार ठेऊन डोळा ठेवला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 Shivsena Constituency BJP Politics