Vidhansabha 2019 : मोर्चेबांधणीत ‘वंचित’मुळे चुरस

Solapur-Vidhansabha
Solapur-Vidhansabha

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून कोणत्याही पक्षाचा प्रतिनिधी निवडून आला, तरीही विधानसभेवेळी चित्र मात्र बदललेलेच असते, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. २०१४ मधील मोदी लाटेत जरी भाजपचे ॲड. शरद बनसोडे विजयी झाले; तरी विधानसभेच्या सहापैकी दोनच मतदारसंघांत भाजपचे, तर उर्वरित चारपैकी तीन ठिकाणी काँग्रेस, एका जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, शहर उत्तर सोलापूर, शहर मध्य सोलापूर, मोहोळ, पंढरपूर-मंगळवेढा या सहाही विधानसभा मतदारसंघांतून मोदी लाटेत ॲड. बनसोडे दीड लाखाच्या मताधिक्‍याने विजयी झाले, तरीही विधानसभा निवडणुकीत चित्र बदलले. या वेळी वंचित बहुजन आघाडीमुळे सोलापुरातील लढतीत रस्सीखेच झाली. त्यांच्या भूमिकेवरच विधानसभेची आकडेमोड होणार, हे निश्‍चित!

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात २००९ चा अपवाद वगळता काँग्रेसच्या सिद्धाराम म्हेत्रेंनी आमदारकीचा किल्ला राखलाय. या मतदारसंघात भाजपने आपली ताकद वाढविली आहे. तरीही, ऐनवेळच्या खेळीने दिग्गजांनाही आकाश दाखविण्याचे म्हेत्रेंचे कसब वाखाणण्याजोगे आहे.

मोहोळ मतदारसंघातील आमदार रमेश कदम हे अण्णा भाऊ साठे महामंडळातील गैरव्यवहार प्रकरणात जामीन न मिळाल्याने सध्या तुरुंगात आहेत. परंतु, त्यांनी अल्पावधीत केलेल्या कामांची चुणूक मतदारांवर प्रभाव टाकून गेली. युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने त्यांच्या विरोधात नगरसेवक मनोज शेजवाल पुन्हा इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून सोलापूर शहर-जिल्ह्याचे माजी अध्यक्ष सुधीर खरटमल यांची वर्णी लागण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर उद्योगपती अर्जुनराव वाघमारेंचीही तयारी आहे. शहर मध्य मतदारसंघापेक्षा ‘सेफ’ म्हणून प्रणिती शिंदे यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. ऐनवेळी राष्ट्रवादीकडूनही बनसोडेंच्या उमेदवारीची शक्‍यता नाकारता येत नाही. सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून उमेदवारीवरून ‘वंचित’मध्ये मोठ्या कोंडीची शक्‍यता आहे. ‘माकप’चे न. ना. आडम मास्तर आणि ‘एमआयएम’चे शहराध्यक्ष तौफीक शेख यांच्यात चुरस राहील. सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून भाजपकडून हॅट्ट्रिक साधलेल्या पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना दरवेळेप्रमाणे यंदाही विरोध होणारच. परंतु, त्यांच्या विरोधात विरोधकांची एकजूट अशक्‍य असल्याने आणि तगडा उमेदवारच मिळत नसल्याने सामना एकतर्फीच होतो. 

सोलापूर शहर दक्षिण मतदारसंघातून सहकारमंत्री भाजपचे सुभाष देशमुख यांच्या विरोधात पुन्हा काँग्रेसकडून दिलीप माने यांच्याशी लढत होईल. युती न झाल्यास जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील यांचीही तयारी आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी आमदार भारत भालकेंनी जुळवणी चालवली आहे. शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या शैला 
गोडसे यांनी मतदारसंघाची बांधणी सुरू  केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com