Vidhansabha 2019 : ‘वंचित’ दाखविणार उपद्रवमूल्य

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीकडून जिल्ह्यात काही ताकदवर चेहरेही मैदानामध्ये उतरताना दिसतील.
- चंद्रकांत खंडाईत, जिल्हा निमंत्रक, वंचित बहुजन आघाडी

सातारा - लोकसभा निवडणुकांप्रमाणेच विधानसभेच्या सर्व जागा लढविण्याचा निर्धार केलेल्या वंचित बहुजन आघाडीने सातारा जिल्ह्यासाठीही नुकतीच चाचपणी केली आहे. विधानसभेच्या आठही जागांसाठी झालेल्या मुलाखतींमध्ये जिल्ह्यातील १५ जणांनी आपली लढण्याची इच्छा व्यक्‍त केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व जागांवर वंचितचे उमेदवार उभे राहण्याचा प्राथमिक मार्ग सुकर झाला आहे. 

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये सामील होण्याच्या चर्चा करत अखेरीस ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीत स्वतंत्र लढण्याचा मार्ग पत्करला. या मार्गावर जाताना ‘वंचित’ला वैयक्तिक उमेदवार निवडून येण्याच्या दृष्टीने लाभ झाला नाही. परंतु, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतविभाजन घडवून आणण्यात यश मिळविले. त्यामुळे आघाडीचे आठ ते दहा ठिकाणचे उमेदवार पडले. अन्य काही मतदारसंघांतही ‘वंचित’च्या उमेदवारांना चांगली मते मिळाली. त्यामुळे वंचित ही भाजपची बी टीम असल्याच्या चर्चांना आणखी बळ मिळाले. परंतु, त्याची पर्वा न करता विधानसभेलाही ‘एकला चलो’ची भूमिका वंचित आघाडीकडून घेतली जाईल, असे चित्र आहे. आघाडीसंदर्भात ‘वंचित’च्या नेत्यांची विधाने पाहता विधानसभेलाही त्यांची जुळण्याची चिन्हे दिसत नाहीत. तसेच ‘वंचित’ने स्वबळावर निवडणुका लढण्याच्या अनुषंगाने जिल्हानिहाय काम सुरू केल्यावरूनही ते स्पष्ट होत आहे. नुकतेच वंचित आघाडीने राज्यातील सर्व जिल्ह्यांतील मतदारसंघनिहाय उमेदवारांची प्रक्रिया राबविली. सातारा जिल्ह्यासाठी ही प्रक्रिया पुणे येथे पार पडली.

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे, पार्लमेंट्री बोर्डाचे सदस्य अण्णाराव पाटील, किसन चव्हाण तसेच महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये सातारा जिल्ह्यासाठीची मुलाखतीची प्रक्रिया पार पडली. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांतून इच्छुक मुलाखतीसाठी हजर होते. फलटण मतदारसंघातून अरविंद आढाव व ॲड. जीवन पवार, वाईतून रामदास महानवर, कोरेगावातून विशाल भोसले व सुरेश बोतालजी, माणमधून आजिनाथ केवटे, योगेश घोलप व डॉ. प्रमोद गावडे, कऱ्हाड उत्तरमधून ॲड. संभाजीराव मोहिते, महेश कचरे, कऱ्हाड दक्षिणमधून अनिल सावंत, बाळकृष्ण देसाई, पाटणमधून अशोकराव देवकांत तर, सातारा मतदारसंघातून अशोक दीक्षित व चंद्रकांत खंडाईत यांनी मुलाखती दिल्या आहेत. राज्य कार्यकारिणी व पार्लमेंट्री बोर्डाच्या बैठकांमध्ये उमेदवारीबाबत अंतिम निर्णय होणार आहे. ‘वंचित’चे हे उमेदवार कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला अडचणीत आणणार, हे आगामी काळात समोर येईलच.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 Vanchit Bahujan Aghadi Interested Candidate Politics