युतीचे इच्छुक विधानसभेसाठी वाढविणार प्राबल्य

Shivsena-BJP
Shivsena-BJP

कोरेगाव - लोकसभा निवडणुकीत विधानसभेच्या कोरेगाव मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी, मित्रपक्षाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना आघाडी मिळाल्याचे आणि त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना, भाजप, मित्रपक्षांचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी या निवडणुकीत लक्षणीय मते घेतल्याचे आकडेवारींवरून स्पष्ट होत आहे. काही मोठी गावे मात्र दोन्ही उमेदवारांसाठी अगदी थोड्या फार फरकाने पुढे मागे म्हणजे काठावर असल्यासारखी दिसत आहेत. त्यामुळे काठावरील गावांमधील सद्यःस्थितीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पूर्वी राष्ट्रवादीला या मतदारसंघात दुरुस्त्यांची मोहीम हाती घ्यावी लागणार आहे. दुसरीकडे लोकसभेसाठी चांगली मेहनत घेतलेल्या शिवसेना, भाजपला विधानसभेचा हा मतदारसंघ खेचून घेण्यासाठी काठावरील गावांसह संपूर्ण मतदारसंघात मेहनत अधिक वाढवावी लागणार आहे.

आघाडीचे उमेदवार उदयनराजेंनी या मतदारसंघात एक लाख ५१६ मते, तर युतीचे उमेदवार पाटील यांनी ६७ हजार ८९ मते मिळवली. त्यावरून उदयनराजे यांनी ३३ हजार ४२७ मतांची आघाडी घेतल्याचे स्पष्ट होत आहे.

मात्र, मतांच्या एकूण आघाडीची तालुकानिहाय विभागणी पाहिल्यास सातारा विभागातून १८ हजार ५०१, कोरेगाव विभागातून १२ हजार ५७०, तर खटाव विभागातून दोन हजार ३५६, असे आकडे समोर आले आहेत. सातारा व कोरेगाव विभागातील अनेक मोठ्या गावांनी, तर खटाव विभागातील काही गावांनीही आघाडीला मोठी साथ दिल्याचे दिसत आहे. उदयनराजेंचा राष्ट्रवादीसह सर्व पक्षीयांतील व सर्व स्तरातील चाहता वर्ग, आमदार शशिकांत शिंदे यांचा सलग दोन टर्ममधील मतदारसंघाशी असलेला सततचा संपर्क व त्याआधारे त्यांनी राबवलेली प्रचार यंत्रणा, तसेच राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेते, कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत केलेल्या एकत्रित कामाचा हा परिणाम आहे. 

दुसरीकडे सातारा, कोरेगाव या विभागांबरोबरच प्रामुख्याने खटाव विभागातील काही प्रमुख गावांनी युतीला साथ केल्याचे चित्र आहे. भाजपच्या माध्यमातून महेश शिंदे यांनी गेली दोन वर्षे स्थानिक प्रश्नांबरोबरच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या, तसेच विविध ग्रामपंचायतींच्या निवडणुकांतील सक्रिय सहभागाद्वारे मतदारसंघात उठवलेले रान व वाढवलेल्या लोकसंपर्कामुळे या पक्षाला गावोगावी मिळालेले कार्यकर्ते, त्याचबरोबर अलीकडच्या काळात शिवसेनेचे रणजित भोसले यांनी महिला, युवकांसाठी राबवलेले उपक्रम या पार्श्वभूमीवर युतीतील या दोन्ही घटक पक्षांनी निर्माण केलेले अस्तित्व आदी कारणांचा हा एकत्रित परिणाम आहे. लोकसभेच्या निवडणुकीत युतीतील दोन्हीही प्रमुख पक्षांनी परस्परांमध्ये योग्य समन्वय राखला असता, तर मतांची संख्या वाढण्यास निश्‍चितपणे मदत झाली असती. दरम्यान, तिन्ही विभागांतील काठावरच्या गावांमध्ये प्रामुख्याने सातारा विभागातील बोरखळ, क्षेत्र माहुली, संगम माहुली, खावली. कोरेगाव विभागातील कोरेगाव शहर, सातारारोड, दुघी, शिरढोण, आसरे, भंडारमाची आणि खटाव विभागातील खटाव, डिस्कळ, विसापूर, मोळ, फडतरवाडी (नेर), गारवडी या काही गावांचा समावेश आहे. 

या पार्श्वभूमीवर आगामी काळात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठीही काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी होईल आणि शिवसेना, भाजपची युती होईल, असे सध्याचे संकेत आहेत. तसे झाल्यास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच असेल आणि विद्यमान आमदार शशिकांत शिंदे हेच उमेदवार असतील, असे सध्या तरी चित्र आहे. 

उदयनराजे पुन्हा खासदार झाले आहेत, ही बाजू आमदार शिंदे यांच्यासाठी जमेची असली, तरी लोकसभेच्या निवडणुकीत काठावर असलेली काही मोठी गावे, राष्ट्रवादीतील अंतर्गत धुसफुसीमुळे कोरेगाव विभागात सक्रिय असलेला नाराजांचा गट, तसेच कोरेगावातील काँग्रेसचे किशोर बाचल, किरण बर्गे यांची आगामी काळातील भूमिका आणि माथाडी नेते नरेंद्र पाटील यांचा संभाव्य उपद्रव या बाबी लक्षात घेता आमदार शिंदे यांना मतदारसंघात आतापासूनच दुरुस्तीची मोहीम हाती घ्यावी लागणार आहे. दुसरीकडे युतीकडून हा मतदारसंघ परंपरेने शिवसेनेकडे राहिला आहे. या वेळी मात्र भाजपच्या माध्यमातून महेश शिंदे जोरदार तयारीत आहेत. शिवसेनेचे रणजित भोसले यांनीही तयारी सुरू केली असून, दत्ताजीराव बर्गेही इच्छुक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com