जयंत पाटील विरोधक विधानसभेला स्वतंत्रच लढणार

Islampur-Vidhansabha
Islampur-Vidhansabha

इस्लामपूर - इस्लामपूर विधानसभा  मतदारसंघात जयंत पाटील विरुद्ध राजू शेट्टी वगळून परपंरागत विरोधकांचा लोकसभा निवडणुकीत सामना पाहायला मिळाला. विधानसभेची झलकच पाहायला मिळाली. तरी लोकसभा निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात एकत्र आलेले जयंत पाटील विरोधक विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र बेडक्‍या फुगवण्याच्या मन:स्थितीत दिसले.

त्यामुळे धैर्यशील मानेंसाठी एकत्र आलेले विरोधक पुन्हा विधानसभा निवडणुकीत एकत्र दिसतीलच याबद्दल खात्रीपूर्वक सांगता येत नाही. 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या फुटीनंतर व खासदार  राजू शेट्टींची कारखानदारांशी झालेल्या गळाभेटीनंतर ही पहिलीच लोकसभा निवडणूक. प्रस्थापित विरुद्ध  विस्थापित असा जुनाच संघर्ष पाहायला मिळाला, मात्र स्वतःला विस्थापितांचे नेते समजणारे राजू शेट्टी यावेळी प्रस्थापितांच्या मांडीवर बसलेले दिसले, तर गेल्यावेळी प्रस्थापित म्हणून राष्ट्रवादीच्या बाजूने असणाऱ्या निवेदिता माने यांचे सुपुत्र धैर्यशील माने इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात विस्थापितांसोबत होते. राजांची अदलाबदल झाली तरी वजीर, सेनापती व प्यादी तिथेच होते. जयंत पाटील विरोधक वर्षभरापासून विखुरलेल्या अवस्थेत  होते. ते या निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात एकत्र आले. मात्र विधानसभा निवडणुकीत ते एकत्र राहतीलच याबद्दल अजिबात खात्री नाही. कारण या निवडणुकीत नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचा भाजप, आनंदराव पवार यांची शिवसेना, वैभव शिंदे यांनी जुना विलासराव शिंदे गट, सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना, राहुल महाडिक यांनी महाडिक गट, गौरव नायकवडी यांनी हुतात्मा गट अशी सावध पावले टाकून प्रचार केला. दुसऱ्या बाजूला जयंत पाटील यांनी या सर्व घडामोडीत राष्ट्रवादी पुन्हा एकदा विधानसभेला वाघाच्या शिकारीच्या तयारीने उतरणार असल्याचे संकेत दिले. गेल्या वेळी विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांना वाळवा तालुक्‍यातील परंपरागत विरोधकांत पडलेली फूट पथ्यावर पडली.  तशीच चिन्हे यावेळी दिसत आहेत. 

शिवसेनेच्या सभेदरम्यान प्रत्येक गावातील जयंत पाटील विरोधक आपापल्या नेत्यांच्या स्वतंत्र घोषणा देताना दिसले. या सर्वांना एकत्रित करून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचे आव्हान सदाभाऊ खोत यांच्यावर असणार आहे. जयंत पाटील व हुतात्मा गट हा जुना वाद परत एकदा या निवडणुकीत ठळक झाला.  तरीही जयंत विरोधकांची एकीची वज्रमूठ बांधून विधानसभेला सामोरे जाणे हे आव्हान असणार आहे. यावेळी जयंत पाटील व राजू शेट्टी असा नवीन पैरा झाल्याने तो पैरा फेडण्यासाठी शेट्टी जुन्या सहकाऱ्यांवर प्रहार करतील.’’

‘चार दिवस सासूचे व चार दिवस सुनेचे’ म्हणीप्रमाणे येणाऱ्या विधानसभेत राजू शेट्टी आपली ताकद जयंत विरोधकांना दाखवतील.

विरोधकांचे आपापले घोडे
विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांच्या विरोधात सदाभाऊ खोत, महाडिक गट, भाजपा, शिवसेना, विलासराव शिंदे गट, हुतात्मा गट हे परंपरागत विरोधक असणार आहेत. यातील कोणाच्याही एका नावावर विधानसभा निवडणुकीत शिक्कामोर्तब करून जयंत विरोधकांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. मात्र सद्य:स्थितीत हे सर्व विरोधक एकमेकाला मोठे अथवा सक्षम समजण्याच्या मन:स्थितीत नाहीत.

प्रत्येकजण आपलेच घोडे विधानसभा निवडणुकीत दामटण्याच्या मन:स्थितीत असल्याने यांची एकी करणे मोठे आव्हान असेल. नाही तर गेल्या निवडणुकीसारखे जयंत पाटलांना ही निवडणूक एकतर्फी होईल हे  सांगायला कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज पडणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com