‘मदन’बाण राष्ट्रवादीला घायाळ करणार?

Madan-Bhosale
Madan-Bhosale

सातारा - वाई मतदारसंघात भाजपला मदन भोसलेंच्या माध्यमातून सक्षम नेतृत्व मिळाले आहे. हा ‘मदन’बाण आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला घायाळ करण्याच्या इराद्यानेच भाजपने सोडला आहे. पण, त्यासोबतच लोकसभा निवडणुकीसाठीही राष्ट्रवादीला अडचणीचा ठरणार आहे. मदन भोसलेंच्या भाजप प्रवेशाने वाई मतदारसंघातील काँग्रेस पोरकी झाली असून, येथे सक्षम नेतृत्व तयार करण्यासाठी काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांना शिकस्त करावी लागणार आहे.  

भारतीय जनता पक्षाने पश्‍चिम महाराष्ट्रात पाय रोवण्याच्या दृष्टीने सुरू केलेल्या हालचालींतून वाईचे माजी आमदार मदन भोसले यांचा भाजप प्रवेश घेतला गेला. सहकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील सक्षम व उमदे व्यक्तिमत्त्व मदनदादांच्या रूपाने भाजपला मिळाले आहे. मदन भोसले 
यांची राजकारणाची सुरवात युवक काँग्रेसच्या माध्यमातून झाली. ते प्रदेश सदस्य होते. त्यावेळी वडील प्रतापराव भोसले आमदार होते. त्यांना मदत करण्यासाठी कोणीतरी पाहिजे, यासाठी मदन भोसले फर्ग्युसन कॉलेज सोडून वाई कॉलेजला आले. वाईत त्यांनी पोलिटिकल सायन्समधून शिक्षण पूर्ण करून सुरवातीला प्रायोगिक शेती केली. मुळात मदनदादा हे सैनिक स्कूलचे विद्यार्थी असल्याने शिस्तीत वाढले. प्रभावी व्यक्तिमत्त्व, संभाषण कौशल्य या गुणांमुळे त्यांची छाप पडते. सुरवातीला ते प्रतापराव भोसले यांच्या सक्रिय पीएच्या भूमिकेत वावरले. यानिमित्ताने त्यांचा विविध नेत्यांशी तसेच प्रशासनाशी जवळचा संबंध आला. प्रशासनावर प्रतापराव भाऊंची असलेली पकड त्यांनी आत्मसात केली. काँग्रेस पक्षाने त्यांना हाताच्या पंजावर चार वेळा उमेदवारी दिली. पण, ते निवडून येऊ शकले नाहीत. मदन भोसलेंनी १९९५ मध्ये पहिल्यांदा काँग्रेसमधून वाईतून निवडणूक लढली.

१९९५, १९९९ ला मदनराव पिसाळ यांच्या विरोधात तर २००४, २००९, २०१४ ला राष्ट्रवादीचे मकरंद पाटील यांच्या विरोधात लढले. तर २००४ मध्ये ते अपक्ष म्हणून राष्ट्रवादीचे मकरंद पाटील यांच्याविरोधात लढले व प्रथम आमदार झाले. त्यांनी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले. त्यामुळे प्रतापराव भोसले यांच्यानंतर वाई तालुक्‍यात काँग्रेसला नेतृत्व मिळाले. त्यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्षपदही भूषविले. यानंतर त्यांनी किसन वीर कारखान्यात लक्ष घातले. राजकारणातील संपर्क कमी करून त्यांनी किसन वीर कारखान्याच्या माध्यमातून दमदार वाटचाल सुरू ठेवली. किसन वीर कारखान्यानंतर खंडाळा कारखाना, प्रतापगड हे तीन कारखाने एकाच वेळी त्यांनी चालविण्याची कसरत केली. यातूनच ते आर्थिक गर्तेत अडकले. या कारखान्यांसाठी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांना मदत झाली. पण, २०१४ ला आघाडीची सत्ता जाऊन युतीची सत्ता आली.

त्यामुळे आर्थिक गर्तेत अडकलेल्या किसन वीर व खंडाळा कारखान्यांना वाचविण्यासाठी मदन भोसलेंपुढे एकच पर्याय होता, सत्ताधारी भाजपकडून मदत घेणे. याच दरम्यान, भाजपने पश्‍चिम महाराष्ट्रात आपले वर्चस्व वाढविण्यासाठी बेरजेचे राजकारण सुरू केले होते. कारखान्यांच्या माध्यमातून अडचणीत आलेले मदन भोसले त्यांना अलगद सापडले. गेल्या वर्षभरापासून मुख्यमंत्र्यांसह सहकारमंत्री, महसूलमंत्री मदन भोसलेंचे मन वळविण्याचा प्रयत्न करत होते. वाई मतदारसंघात भाजपला सक्षम नेतृत्व हवे होते. ते त्यांनी मदन भोसलेंमध्ये पाहिले. श्री. भोसलेंना कारखान्यासाठी आर्थिक मदत केली. त्यानंतर भोसलेंवर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी भाजप प्रवेशासाठी सातत्याने तगादा लावला होता. अखेर मदन भोसलेंनी काल किसन वीर कारखान्यावर झालेल्या कार्यक्रमात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे भाजपला पश्‍चिम महाराष्ट्रात सहकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील सक्षम, उमदे नेतृत्व मिळाले आहे. तसेच वाई विधानसभा मतदारसंघासाठी सक्षम उमेदवारही मिळाला आहे. पण, काँग्रेसच्या मुशीत वाढलेल्या मदन भोसलेंना भाजपमध्ये वावरताना थोडी घुसमट होणार आहे.

केवळ विधानसभा निवडणुकीसाठी सक्षम उमेदवार म्हणून त्यांचा वापर होऊ नये, याची काळजीही मदनदादांनी घेणे गरजेचे आहे. श्री. भोसलेंसोबत त्यांच्या दोन कारखान्यांचे सभासद भाजपमध्ये गेल्यामुळे वाई तालुक्‍यातील काँग्रेस नेतृत्वाविना पोरकी झाली आहे. येथील जुन्या जाणत्या काँग्रेस कार्यकर्त्यांना आधार देण्यासाठी व एकसंघ ठेवण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना शिकस्त करावी लागणार आहे. दुसरीकडे मकरंद पाटील यांनी यापूर्वी अनेक ठिकाणी यश मिळविले, त्यासाठी त्यांना तेथील भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांची मदत झाली. पण, आता वाईतील भाजपला मदन भोसलेंचे नेतृत्व मिळाल्याने आगामी विधानसभा निवडणूक मकरंद पाटील यांना सोपी राहिली आहे, असेही म्हणता येणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com