राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह विधानसभेसाठी मारक

NCP
NCP

सातारा - अंतर्गत कलहामुळे राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील कार्यकर्ते व पाठीराख्यांत अस्वस्थता पसरत आहे. विनाकारण ओढवला जाणारा हा वाद पक्षाच्या विधानसभेतील कामगिरीला मारक ठरू नये, यासाठी सर्वच नेत्यांनी सबुरीने व एकसंधतेने वागावे, अशी पक्षाच्या मतदारांची अपेक्षा आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात अंतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणावर वाढली होती. खासदार उदयनराजे भोसले यांच्या भूमिकांमुळे दुखावलेले आमदार त्यांच्या विरोधात भूमिका घेत होते. राष्ट्रवादी अंतर्गत अशी परिस्थितीत असताना पक्षाच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपनेही चांगलीच ताकद पणाला लावली होती.

विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत त्यांनी शिवसेनेची जागा असली, तरी निवडणूक स्वत:च्या हातात घेतली. गेल्या चार वर्षांत गावपातळीपर्यंत तयार केलेले कार्यकर्त्यांचे जाळे व उदयनराजेंच्या विरोधात उपस्थित केलेल्या मुद्‌द्यांच्या जोरावर त्यांनी जिल्ह्यामध्ये उदयनराजेंच्या विरोधात चांगलेच वातावरण तापवले होते.

बालेकिल्ल्यात चाललेल्या या घमासानात अंतर्गत कलहामुळे तेव्हाही कार्यकर्त्यांत अस्वस्थता होती; परंतु देशभरात भाजपविरोधात एकसंधपणे लढा दिला जावा, यासाठी प्रयत्न करणारे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यातून मार्ग काढतील, अशी राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील सर्वच पाठीराख्यांची अपेक्षा होती. त्याप्रमाणे पवारांनी जिल्ह्यातील आमदार व उदयनराजेंची बैठक घेत त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्याला सर्वांनीच सकारात्मक प्रतिसाद दिला. उदयनराजेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्व आमदार व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या विजयासाठी कंबर कसली होती. टोकाच्या विरोधाचा सामना करावा लागला असूनही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी पक्षादेश स्वीकारताना 
उदयनराजेंच्या उमेदवारीचे स्वागत केले. फलटण मतदारसंघ सातारा लोकसभेमध्ये नसल्यामुळे व माढ्याची जबाबदारी असल्यामुळे रामराजे प्रत्यक्ष प्रचारात फारशे नव्हते; परंतु उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडताना ते उपस्थित होते. दुसरीकडे शिवेंद्रसिंहराजेंनीही कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या होत्या. अनेक ठिकाणी त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. त्याचप्रमाणे आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील बाळासाहेब पाटील, विक्रमसिंह पाटणकर या पक्षाच्या नेत्यांनी व काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही उदयनराजेंसाठी गावो-गावी बैठका घेतल्या.

तिसरी टर्म असल्यामुळे उदयनराजेंच्या विरोधात ‘ॲण्टीइंकबन्सीचा फॅक्‍टर’ सर्वच मतदारसंघात होता. त्यात त्यांचा कमी झालेला जनसंपर्कही लोकांची नाराजी वाढवणारा ठरला होता. या गोष्टींवर स्वार होत भाजप व नरेंद्र पाटील यांनी मतदारसंघात चांगले वातावरण निर्माण केले होते. त्याचा परिणाम निवडणुकीत दिसला. मताधिक्‍य कमी झाले. मताधिक्‍य कमी होणारच होते.

कारण मागील दोन निवडणुकांमध्ये उदयनराजेंना तसा ठाम विरोधकच नव्हता, तरीही त्या वेळी त्यांच्या विरोधात पडलेल्या मतांची बेरीज केली, तर त्यांना पडलेल्या व विरोधी मतात ७० हजार ते एक लाख मतांचाच फरक होता. विरोधी मतांचे ध्रुवीकरण करण्यात भाजपला यश आल्यामुळे हे घडले; परंतु उदयनराजेंना मिळालेली मते वाढली हेही नाकारता येत नाही.

उदयनराजे व पक्षाच्या एकत्रित प्रयत्नामुळेच हे साध्य झाले. या वेळची निवडणूक सहज नाही हे जसे उदयनराजेंना जाणवले, तसेच ते आमदारांनाही जाणवले होते. त्यामुळेच पक्षाचा उमेदवार निवडून येण्यासाठी सर्व आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते एकदिलाने कामाला लागले होते. बऱ्याच दिवसांनंतर राष्ट्रवादीमध्ये एकसंधता दिसत होती. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. उदयनराजेंनीही आपली कार्यशैली बदलली असे जिल्हाभरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटू लागले होते. त्याचा आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला फायदा होईल, असा विश्‍वास त्यांना आला होता. राज्यात काहीही होवो; परंतु या सर्वांच्या एकत्र येण्यामुळे बालेकिल्ला आणखी भक्कम होईल, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. चार दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरण राष्ट्रवादीच्या अंतर्गत धुसफुशीने पुन्हा ढवळून निघाले आहे. उदयनराजेंनी रामराजे व शिवेंद्रसिंहराजेंवर अप्रत्यक्षपणे टीकेचा राग पुन्हा आळवायला सुरवात केली आहे. त्यामुळे एक महिन्यापूर्वी उदयनराजेंच्या विजयासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांत अस्वस्था वाढली आहे. पक्षाध्यक्षांच्या निर्णयाला मान देत का होईना सर्वांनी मदत केली याची जाणीव उदयनराजेंनी ठेवली पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com