युतीची भाषा करत उमेदवारांची घोषणा!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

कऱ्हाड - येत्या विधानसभेला राज्यात भाजप- शिवसेना एकत्र लढणार असल्याचा भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने दावा होत आहे. मात्र, युती व जागा वाटपाचा ‘फॉर्म्यु’ला निश्‍चित होण्यापूर्वीच कऱ्हाड दक्षिणेतून अतुल भोसले व कऱ्हाड उत्तरमधून मनोज घोरपडे यांच्या उमेदवारीवर महसूलमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे युतीचा ‘फॉम्यु’ला निश्‍चित होण्यापूर्वीच जिल्ह्यातील अनेक मतदारसंघांवर दावा सांगून उमेदवारांना तयारी करायला सांगितल्यामुळे शिवसेनेला किती व कोणते मतदारसंघ मिळणार? याची उत्सुकता आहे.  

कऱ्हाड - येत्या विधानसभेला राज्यात भाजप- शिवसेना एकत्र लढणार असल्याचा भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने दावा होत आहे. मात्र, युती व जागा वाटपाचा ‘फॉर्म्यु’ला निश्‍चित होण्यापूर्वीच कऱ्हाड दक्षिणेतून अतुल भोसले व कऱ्हाड उत्तरमधून मनोज घोरपडे यांच्या उमेदवारीवर महसूलमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे युतीचा ‘फॉम्यु’ला निश्‍चित होण्यापूर्वीच जिल्ह्यातील अनेक मतदारसंघांवर दावा सांगून उमेदवारांना तयारी करायला सांगितल्यामुळे शिवसेनेला किती व कोणते मतदारसंघ मिळणार? याची उत्सुकता आहे.  

विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची आघाडी व भाजप- शिवसेनेच्या युतीला सुरुंग लागून अखेर स्वबळावर लढले. त्यामध्ये जिल्ह्यात पाटणमध्ये शिवसेनेचे शंभूराज देसाई वगळता भाजप- सेनेला यश मिळाले नाही. मात्र, युतीचा जागा वाटपाचा पूर्वीचा ‘फॉर्म्यु’ला पाहता कऱ्हाड दक्षिण व सातारा वगळता उर्वरित बहुतेक मतदार संघ हे शिवसेनेकडे होते. २०१४ च्या निवडणुकीनंतर एकत्र आलेल्या भाजप - शिवसेनेचे सख्य राज्याला परिचित आहे. सत्तेत असूनही त्याची धुसफूस सातत्याने चर्चेची ठरली आहे. २०१९ च्या निवडणुकीसाठी शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला असला, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते युती होईल यावर ठाम आहेत. त्यातच नुकत्याच पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल पाहता राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील सत्तांतर भाजपच्या जिव्हरी लागणारे आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेला सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच स्वबळाचा नारा दिला आहे.

त्यानुसार शिवसेना उपलब्ध मनुष्यबळावर कामालाही लागल्याचे सांगण्यात येते. एकीकडे भाजप व शिवसेना एकत्र लढणार असल्याचा भाजपचे नेते दावा करत असताना जिल्ह्यात संभाव्य उमेदवारांच्या नावांच्या घोषणा आतापासून करू लागले आहेत. कऱ्हाड उत्तरमध्ये यापूर्वीच्या दौऱ्यात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तरेत मनोज घोरपडे उमेदवार असतील असे सांगून त्यांना बळ दिले आहे. पंढरपूर येथे काल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्‍मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांची कऱ्हाड दक्षिणमधून उमेदवारी जाहीर करून रणशिंग फुंकले आहे. अतुल भोसले यांच्या कामाचे कौतुक करून कऱ्हाड दक्षिणमधून त्यांनी निवडणुकीसाठी तयारी सुरू करावी, असे जाहीर सांगितले. त्यामुळे युतीचा भाषा करणारे भाजपचे नेते मतदरसंघांतील उमेदवारांची घोषणा करू लागल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. जिल्ह्यात अन्य मतदारसंघातही भाजपच्या संभाव्य उमेदवारांची तयारी सुरू आहे. त्यामुळे युती करायची झाल्यास जागा वाटपाचा ‘फॉर्म्यु’ला ठरण्यापूर्वी भाजप थेट उमेदवारांच्या नवांची घोषणा करू लागल्याने शिवसेनेच्या पदरात नेमक्‍या किती जागा व कोणते मतदारसंघात टाकणार याबाबत उत्सुकता आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे. त्यानुसार जिल्ह्यात शिवसेनेने बूथनिहाय काम सुरू केलेले आहे. त्यामुळे युतीत शिवसेनेला कोणत्या जागा मिळणार याचा विषयच येत नाही.
 - हर्षद कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख

Web Title: Vidhansabha Election Yuti Shivsena BJP Politics