चंदगडमधून उपसभापती गुरबे मागणार विधानसभेची उमेदवारी

चंदगडमधून उपसभापती गुरबे मागणार विधानसभेची उमेदवारी

गडहिंग्लज - पंचायत समितीचे उपसभापती, युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व गोडसाखर कारखान्याचे संचालक विद्याधर गुरबे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारी मागणीचा अर्ज घेतला आहे. सहा जून रोजी मुंबईत चंदगड मतदारसंघातून इच्छूक म्हणून अर्ज सादर करणार असल्याचे श्री. गुरबे यांनी सांगितले. 

शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्याकडून त्यांनी उमेदवारी मागणीचा अर्ज घेतला आहे. जिल्हा सरचिटणीस एस. के. माळी, किशोर खानविलकर, संपतराव पाटील, महमदशरीफ शेख आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. गुरबे हे आमदार सतेज पाटील यांचे खंदे समर्थक आहेत. काँग्रेस पक्षात सक्रीय झाल्यापासून आमदार पाटील यांचेच नेतृत्व मानून ते कार्यरत आहेत. यापूर्वी जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस, उपाध्यक्ष आणि अध्यक्षपदावर त्यांनी काम केले आहे. 2012 मध्ये नेसरी पंचायत समिती मतदारसंघातून निवडणूक लढवून ते विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखणाऱ्या नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघातील दोन्ही पंचायत समितीच्या जागा काँग्रेसकडे खेचण्यात ते यशस्वी झाले. 

युवक काँग्रेसच्या विविध पदांच्या माध्यमातून चंदगड विधानसभा मतदारसंघात पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. आजरा नगरपंचायत निवडणुकीत आमदार पाटील यांच्या मार्गदर्शनाने काँग्रेसच्या प्रचारात ते अग्रेसर होते. याशिवाय आमदार व स्व. सदाशिवराव मंडलिक यांच्या खासदार फंडातून चंदगड मतदारसंघात विकासकामेही खेचून आणली आहेत. तसेच त्यांनी मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमही राबविले आहेत. त्या जोरावरच गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून त्यांच्या नावाची चर्चा सुरू होती. परंतु, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी धर्मात चंदगड मतदारसंघ राष्ट्रवादीच्या कोट्यात असल्याने त्यांनी माघार घेतली. यंदाची राजकीय परिस्थिती अजून निश्‍चित नसल्याने आमदार पाटील यांच्या सुचनेनुसार गुरबे यांनी पक्षाकडून अर्ज घेतला आहे.

दरम्यान, कोल्हापुरात उद्या (ता. 3) जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांची काँग्रेस पक्ष कार्यालयात बैठक होणार असल्याचेही सांगण्यात येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com