वस्त्रोद्योगनगरीला स्पेशल इकॉनॉमिक झोनचा दर्जा हवा

वस्त्रोद्योगनगरीला स्पेशल इकॉनॉमिक झोनचा दर्जा हवा

आजोबा कै. विलासराव कोरे, सुधाकरराव कोरे, श्रीमती शोभाताई कोरे, वडील वारणा बॅंकेचे अध्यक्ष निपुणराव कोरे, काका व वारणा समूहाचे प्रमुख डॉ. विनय कोरे, आई स्नेहा कोरे, काकी शुभलक्ष्मी कोरे या सर्वांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल सुरू आहे. युवकांचे संघटन कौशल्य, शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती डोळ्यासमोर ठेवून विकासाभिमुख कार्य सुरू असल्याचे युवा नेते व विलासराव कोरे कला, क्रीडा मंडळाचे अध्यक्ष विश्‍वेश कोरे यांनी ‘सकाळ‘शी बोलताना सांगितले.

सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांनी सन १९५० च्या  दशकात वारणेच्या फोंड्या माळावर सहकाराची मुहुर्त रोवली. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ८० हून अधिक गावांतील कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे आर्थिक स्तर उंचावण्यासाठी वारणा साखर कारखाना सुरू केला. याच कारखान्यांच्या माध्यमातून वारणा दूध संघ, वारणा बॅंक, बझार, शिक्षण समूहासह ३० हून अधिक संस्था नावारूपास आल्या. यामुळे इथल्या शेतकऱ्याला गावपातळीवरच सर्व सुविधा मिळू लागल्या. 

विश्‍वेश कोरे म्हणाले, ‘‘इचलकरंजी वस्त्रोद्योगनगरीला स्पेशल इकॉनॉमिक झोनचा दर्जा मिळायला हवा. इथल्या उद्योगांसाठी वीजदरात सवलत असायला हवी. परिसरात भाजीपाला याला हक्काची बाजारपेठ व हमीभाव मिळायला पाहिजे. शेतकऱ्यांचा उत्पादित माल मुंबईकडे जाण्यासाठी जयसिंगपूर येथे रेल्वेस्थानकावर रेल्वे डब्याची खास सोय होणे गरजेचे आहे. त्यासाठी संसदेत प्रयत्न व्हायला पाहिजेत.’’

शाहूवाडी तालुक्‍यात पर्यावरणाचा ऱ्हास पाहता शासनाने बॉक्साईट प्रकल्प व त्यावर आधारित उद्योग करण्यास चालना दिल्यास स्थानिक लोकांना रोजगार मिळू शकतो. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांकडे वीजनिर्मिती प्रकल्प आहे. ही वीज महावितरणने साखर कारखान्याच्या सभासदांना सवलतीत द्यावी. यामुळे साखर कारखाने निर्मितीसाठी योगदान दिलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल, यासाठी माझा पुढाकार राहील.

ते म्हणाले, ‘‘ हा मतदारसंघ, सहकार, राजकीय व शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर असल्याने इथल्या शेतकऱ्यांना आणखी सक्षम करण्यासाठी उद्योगधंदे वाढण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.  पुढील पाच वर्षांचे विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून त्या दिशेने जायला हवे.’’

युवकांनी इंग्रजीवर प्रभुत्व ठेवून देशासह परदेशात उद्योग करण्याचे स्वप्न पहावे. यासाठी युवकांना संघटित करून त्यांना मार्गदर्शन करत आहे. कै. विलासराव कोरे कला, क्रीडा मंडळ क्षेत्रातील यशवंत खेळाडू, शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित केले जात आहे. डॉ. विनय कोरे यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाची स्थापना केल्यानंतर आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत पोहचले आहेत, तर वारणा समूहाचे नाव ही सातासमुद्रापलीकडे पोहचले आहे. 

निपुणराव कोरे यांनी वारणा बॅंकेच्या शाखांचे जाळे महाराष्ट्रभर पोहचवून सहकारी व बॅंकिंग क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केला आहे. कोल्हापूर जिल्हा नागरी बँक असोसिएशनच्या अध्यक्षपदाची सूत्रेही ते यशस्वीपणे सांभाळत आहेत. 
कोरे कुटुंबीयांनी वारणेच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला घालून दिलेला आदर्श आज सर्वांना प्रेरणादायी ठरत असून याच मार्गाने माझीही वाटचाल सुरू आहे, असे त्यांनी |सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com