श्री संत तुकाराम महाराज संतपीठ अध्यक्षपदी विजय भटकर

अभय जोशी
रविवार, 20 मे 2018

अशी आहे मार्गदर्शक समिती
डॉ.विजय भटकर (अध्यक्ष), अरुणा ढेरे, विवेक घळसासी, डॉ.सदानंद मोरे, गणेश सुर्वे, शंकर अभ्यंकर , यशवंत पाठक, डॉ.सुभाष लोहे, अरविंदराव देशमुख, शांताराम बुटे, विद्याधर ताठे. डॉ. एल.के.मोहरीर, ज्ञानेश्‍वर महाराज देशमुख, रामचंद्र देखणे, चैतन्य महाराज देगलूरकर

पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीच्या प्रस्तावित संत तुकाराम महाराज संतपीठासाठी प्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ.विजय भटकर यांच्या अध्यक्षतेखाली 15 जणांची मार्गदर्शक समिती स्थापन करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतः मंजूरी दिली आहे. ही समिती संतपीठाचा बृहत आराखडा, अभ्यासक्रम, अस्थापनेची रचना, वर्गपध्दती व इतर अनुषंगीक कामांच्या विषयी मार्गदर्शन करणार आहे अशी माहिती श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांनी दिली. 

पंढरपूर मंदिरे अधिनियमा मध्ये संत तुकाराम महाराज संतपीठ स्थापन करण्या विषयीची तरतूद आहे. तथापी अनेक मंदिर समित्या होऊन गेल्या परंतु संतपीठ अस्तित्वात आले नव्हते. मागील वर्षी डॉ.भोसले यांनी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर त्यांनी पंढरपूर मंदिर अधिनियमातील तरतूदी नुसार आपण संतपीठाची निर्मिती करण्याला प्राधान्य देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार 7 सप्टेंबर रोजी झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत ""संत तुकाराम महाराज संतपीठ ""या नावाने परिसंस्था स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली होती. 

डॉ.भोसले म्हणाले, श्री विठ्ठल रुक्‍मिणीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना संत वाडःमय व भागवत धर्माची शिकवण देण्यासाठी हे संतपीठ उभारणे आवश्‍यक आहे. संतपीठाची लवकरात लवकर उभारणी व्हावी अशी मागणी वारकऱ्यांमधून सातत्याने होत होती. मानवतावाद व सामाजिक समता या विषयी उपदेश केलेल्या सर्व संतांच्या शिकवणीतील भावार्थ, सिध्दांत व तत्वज्ञान या संबंधीचे ज्ञान देण्यासाठी, ते आचरणात आणण्यासाठी , शिक्षण देण्यासाठी तसेच त्याचा प्रचार करण्यासाठी संतपीठाची उभारणी करण्यात येणार आहे. या महत्वाकांक्षी संत तुकाराम महाराज संतपीठाचा बृहत आराखडा , अभ्यासक्रम, अस्थापनेची रचना , वर्ग पध्दती व इतर अनुषंगीक कामासाठी मार्गदर्शक समितीची गरज होती. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी पुढील नामवंत व्यक्तींची मार्गदर्शक समिती नियुक्त करण्यास तत्वतः मान्यता दिली आहे. 

अशी आहे मार्गदर्शक समिती
डॉ.विजय भटकर (अध्यक्ष), अरुणा ढेरे, विवेक घळसासी, डॉ.सदानंद मोरे, गणेश सुर्वे, शंकर अभ्यंकर , यशवंत पाठक, डॉ.सुभाष लोहे, अरविंदराव देशमुख, शांताराम बुटे, विद्याधर ताठे. डॉ. एल.के.मोहरीर, ज्ञानेश्‍वर महाराज देशमुख, रामचंद्र देखणे, चैतन्य महाराज देगलूरकर

 

Web Title: Vijay Bhatkar elected president of Sant Tukaram Maharaj santpeeth