दोन्ही देशमुखांनी दिला 'दो जिस्म एक जान'चा अनुभव

विजयकुमार सोनवणे
रविवार, 13 मे 2018

बापू (सहकार मंत्री) तुम्ही मला जागा उपलब्ध करून द्या. मी त्या ठिकाणी लगेच एस टी स्थानक बांधून देतो.
- विजय देशमुख, पालकमंत्री

सोलापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याच्या सहकारमंत्र्यांमध्ये मतभेद आहेत हा राज्यभर पसरलेला गैरसमज दुर करण्याचा प्रयत्न या दोन मंत्री महोदयांनी केला. काहीही चर्चा असली तरी आम्ही एकच आहोत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. आमचे विचार एकच आहेत. जणू दो जिस्म एक जान या सारखे (वैचारिक दृष्ट्या) असा उल्लेख करीत विजय देशमुख आणि सुभाष देशमुख यांनी त्यांच्यातील "दुरावा' संपल्याचे संकेत उपस्थितांना दिले. निमित्त होते नगरोत्थान योजनेतून होणाऱ्या विविध विकास कामांच्या भूमीपूजनाचे. 

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत विविध रस्ता सुधारणा कामांचे भूमीपूजन शनिवारी रात्री उशीरा जुळे सोलापूर परिसरात झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात मंत्रीद्वयांनी आपल्या मनोगतातून भावना व्यक्त केल्या. दोन्ही देशमुखांत मतभेदाची चर्चा अजूनही आहे. या पार्श्वभूमीवर सहकारमंत्र्यानी आयोजिलेल्या कार्यक्रमास पालकमंत्री येतात का याबाबत सर्वानाच उत्सुकता होती. पालकमंत्री आले. मतभेदांचे  मुद्दे खोडून काढताना त्यांच्यात जुगलबंदी रंगली. महापौर शोभा बनशेट्टी, उद्योजक ए. जी. पाटील, नगरसेवक राजेश काळे, नगरसेविका संगीता जाधव, राजश्री बिराजदार व अश्‍विनी चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

सहकारमंत्री देशमुख म्हणाले, "आम्ही एकच आहोत. आम्ही दोघांनी मिळून मुख्यमंत्र्यांना भेटून विविध योजना आणल्या. विकासकामे केली. आम्ही रडणारे नाही लढणारे आहोत. आमच्या दुरावा आहे असे पत्रकारांना वाटते, मात्र तसे नाही. मी या कार्यक्रमाला पालकमंत्र्यांना बोलावले नसते तर या मंत्र्यांमुळे विकास खुंटला अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या असत्या. आमचे विचार एकच आहेत, त्यामुळे आता शहराचा सर्वांगिण विकास होणार.'' 

समांतर जलवाहिनीचे काम झाल्यावर शहराला रोज पाणीपुरवठा करणे शक्‍य होईल, असे सांगून पालकमंत्री देशमुख म्हणाले, "कॉंग्रेसने 20 वर्षांनी आणलेल्या उजनीच्या जलवाहिनीवर सत्ता मिळवली. आम्ही मात्र सत्ता आल्यावर पहिल्याच वर्षी समांतर जलवाहिनी आणली. जुळे सोलापुरात जागा उपलब्ध झाल्यावर एसटी स्थानक बांधण्यात येईल. पालकमंत्री व सहकारमंत्र्यांमध्ये काही वर्षांपूर्वी दुरावा होता, मात्र आता नाही. शहर विकासासाठी आम्ही एकत्रितच काम करणार आहोत. '' 

बापू (सहकार मंत्री) तुम्ही मला जागा उपलब्ध करून द्या. मी त्या ठिकाणी लगेच एस टी स्थानक बांधून देतो.
- विजय देशमुख, पालकमंत्री

Web Title: Vijay Deshmukh, Subhash Deshmukh together in Solapur