#VijaysDiwas जवानांच्या कसरतींना कऱ्हाडकरांची दाद 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 December 2019

बांग्लामुक्ती संग्रामात भारतीय सैन्याने मिळवलेल्या विजयाप्रीत्यर्थ निवृत्त कर्नल संभाजी पाटील यांच्या पुढाकारातून कराड येथे प्रतिवर्षी विजय दिवस समारोहाचे आयोजन केले जाते. यंदाही विजय दिवस उत्साहात साजरा झाला.

कऱ्हाड : छत्रपती शिवाजी महाराज की जय..., वंदे मातरम...भारत माता की जय....यासह अनेक जयघोषांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आज दुमदुमले. निमित्त होते विजय दिवस समारोहाच्या मुख्य कार्यक्रमाचे. सैन्यदलाच्या जवानांनी सादर केलेल्या चित्तथरारक कसरतींमुळे कऱ्हाडवासीयांच्या मनात देशभक्तीची भावना यानिमित्ताने जागृत झाली. सैन्य दलांच्या जवानांनी पॅराग्लायडिंग, मल्लखांबच्या केलेल्या कसरतींना उत्स्फूर्त दाद मिळाली.

 
जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या उपस्थितीत विजय ज्योतीचे आगमन करण्यात आले. तत्पूर्वी स्टेडियमवर उघड्या जीपमध्ये उभे राहात मृणाल कुलकर्णी, सातपुते यांनी हात उंचावत उपस्थितांना अभिवादन केले. या वेळी पाहुण्यांना संचलनाने मानवंदना देण्यात आली. त्यात सैन्य दल, पोलिस, खेळाडू, निर्भया पथक व पोलिसांचे बॅण्ड पथक, एनसीसीचे विद्यार्थी- विद्यार्थिनी, स्केटिंगचे विद्यार्थी आदी सहभागी झाले होते.

Mrunal Kulkarni

त्यानंतर सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थितीत उल्लेखनीय काम करणाऱ्या पुणे येथील बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप सेंटरच्या बॅंड पथकाने धून वाजवून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. शहरातील मी ऍण्ड सी, डी, टू डी च्या बालचिमुकल्यांनी सादर केलेल्या देशभक्तिपर नृत्यास उपस्थितांनी टाळ्यांनी दाद दिली.

हेही वाचा - #VijayDiwas वय 83; पाहा निवृत्त जवान काय करू शकतो!

विमानाची प्रतिकृती हवेत झेपावण्याचे प्रात्यक्षिकांनीही उपस्थित मंत्रमुग्ध झाले. या वेळी बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटच्या जवानांनी अत्यंत चपळाईने मल्लखांबांची प्रात्यक्षिके सादर केली. बाळगोपाळांचा त्यास प्रतिसाद मिळाला. त्यानंतर शहर पोलिस ठाण्याच्या निर्भया पथकातर्फे कराटेचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. पथकाच्या प्रमुख वीर यांच्या पुढाकाराने हे प्रात्यक्षिक सादर झाले.


पॅराग्लायडिंग करणारे सैन्य दलातील दोन जवानांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. काही अंतरावरील हे जवान मैदानावर उतरेपर्यंत उपस्थितांच्या नजरा त्यांच्यावर खिळून होत्या. मैदानात उतरताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचे स्वागत केले.
 
कार्यक्रमास खासदार श्रीनिवास पाटील, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, हुतात्मा उद्योगसमूहाचे वैभव नायकवडी, कोल्हापूरचे शाहू महाराज, सुभेदार मेजर लखविंदर, एनसीसीचे सुभेदार मेजर एस. बी. खत्री, कर्नल दीपक बुर्गे, खडकी पुणे येथील ब्रिगेडियर एम. जे. कुमार, कॅप्टन डॉ. एल. बी. कळंत्री, श्रीमती श्रीदेवी कळंत्री, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजय पाटील आदींसह मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. 

देशभक्तिपर गीतांनी मने जिंकली 

मल्लखांबासह पॅराग्लायडिंगच्या थरारक कसरती करून जवानांनी उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. बेळगाव येथील लोकमान्य ऑर्केस्ट्रा, बॅंड पथकानेही देशभक्तिपर गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. उंब्रज येथील बबन कुंभार यांनी मोटारसायकलची प्रात्यक्षिके सादर केली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijay Diwas Celebreated In Karad