विजय सगरे यांचे निधन

विजय सगरे यांचे निधन

कवठेमहांकाळ - श्री महांकाली उद्योग समूहाचे अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते विजय सगरे (वय 54) यांचे पुण्यात रुबी हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने आज सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कवठेमहांकाळ शहरासह तालुक्‍यात शोककळा पसरली. सायंकाळी सातच्या सुमारास त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी युवावाणी चौकातील घरात ठेवण्यात आले. नंतर शहरातून अंत्ययात्रा काढून महांकाली कारखाना कार्यस्थळावर पार्थिव नेण्यात आले.

"महांकाली'चे अध्यक्ष विजय सगरे यांना दोन नोव्हेंबरला आजारामुळे पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. आठवड्यापूर्वी त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत होती; मात्र रविवारी (ता. 20) त्यांची प्रकृती अचानक गंभीर झाल्यामुळे अतिदक्षता विभागात हलवले होते. आज सकाळी सुमारे दहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच नागरिकांनी तसेच कार्यकर्त्यांनी महांकाली कारखाना येथील "नाना भवन'कडे धाव घेतली. विजयअण्णा गेल्याचे दु:ख पचवणे कार्यकर्त्यांना अवघड झाले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. शहरातील दुकाने बंद ठेवून सगरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सायंकाळी सातच्या सुमारास अण्णांचे पार्थिव पुण्याहून कवठेमहांकाळ येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. त्या वेळी मोठ्या संख्येने नागरिक अंत्यदर्शनासाठी जमले होते.

विजयअण्णांच्या पार्थिवासमवेत त्यांचे बंधू गणपती सगरे, पुत्र शंतनू तसेच कुटुंबीय होते. निवासस्थानाहून शहरातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. निवासस्थानी आमदार जयंत पाटील, खासदार संजय पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, आमदार सुमन पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, प्रा. शरद पाटील, जयसिंग शेंडगे, जिल्हा बॅंकेचे संचालक सुरेश पाटील, स्मिता पाटील, दिनकर पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवरांनी दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. आमदार सुमन पाटील यांनी अण्णांच्या मातोश्री सिंधूताई सगरे व कुटुंबीयांचे सांत्वन केले.

त्यांची अचानक एक्‍झिट मनाला चटका देणारी असून आपला भला माणूस हरपल्याची भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे. तर सहकारातील एक शिल्प हरपले, असा संदेश सोशल मीडियातून फिरत होता. सोशल मीडियावर देवा तुला शोधू कुठं, आपला भला मोठा माणूस यासह विविध संदेश फिरत होते. अण्णांच्या निधनामुळे सहकारात पोकळी निर्माण झाली असून ती भरून न निघण्यासारखी असल्याची भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त होत होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com