जिहे- कठापूर डिसेंबरअखेर पूर्ण होणार - शिवतारे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

सातारा - शासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आणि शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ लावल्यामुळे वांग- मराठवाडी प्रकल्पाचे काम दहा वर्षे रखडले; परिणामी योजनेचा खर्च वाढून ती चारशे कोटींवर गेला. यास जबाबदार तत्कालीन जिल्हाधिकारी व पुनर्वसन अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. येत्या डिसेंबरअखेर जिहे-कठापूर योजनेचे काम पूर्ण होऊन त्यात पाणीसाठा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

वांग-मराठवाडी प्रकल्प केवळ अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे दहा वर्षे रखडला आहे. येत्या दोन वर्षांत आम्ही मराठवाडी धरणात पाणी अडविणार आहोत. निव्वळ काही तांत्रिक मुद्‌द्यांचा आधार घेत तत्कालीन जिल्हाधिकारी व पुनर्वसन अधिकारी यांनी या योजनेचे काम रखडविले. शासन निर्णयात स्पष्टपणे काम करण्याचा उल्लेख असताना त्याचा अर्थ काढत बसून शासनाला स्पष्टीकरण मागवत बसले. त्यामुळे या योजनेचा खर्च 400 कोटींवर गेला. याचा फटका योजनेला बसला. यास जबाबदार जिल्हाधिकारी व जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. 

मी ज्या जलसंपदा खात्याचा मंत्री आहे, त्या खात्याचे काम जिल्ह्यात एक नंबरचे असून, जलसंधारण खात्याचे काम दुसऱ्या क्रमांकाचे झाले आहे. यातून अनेक गावांना बक्षिसेही मिळाली आहेत, असेही शिवतारेंनी स्पष्ट केले. 

ते म्हणाले, ""सुधारित प्रशासकीय मान्यता नसताना जिहे-कठापूर योजनेसाठी उपलब्ध 62 कोटींचा निधी वापराची परवानगी आम्ही आणली. यातून या योजनेचे काम पूर्ण झाले असून, सध्या गेटचे काम सुरू आहे. डिसेंबरअखेर या योजनेत पाणी अडविले जाईल. स्वीचचे काम पूर्ण करून खटाव तालुक्‍यातील नेर तलावात लोकसभा निवडणुकीपूर्वी या योजनेचे पाणी नेण्याचा संकल्प आम्ही केला आहे. डिसेंबर 2018 मध्ये सर्व काम पूर्ण होऊन आंधळी बोगद्यातून माण तालुक्‍यातील 27 हजार 500 हेक्‍टर ओलिताखाली आणण्याचा आमचा निर्धार आहे.'' 

ते म्हणाले, ""जिल्ह्यात शेतीपंपाची दहा हजार कनेक्‍शन प्रलंबित असून, त्यासाठी 102 कोटी रुपयांचा निधी आवश्‍यक आहे. शेती पंपाची 190 कोटींची उधारी आहे. ती वसूल करून तेच पैसे नवीन कनेक्‍शनसाठी वापरले जातील.'' 

पालकमंत्री कोण... माझे कामच सांगेल 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पालकमंत्री कोण असा प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यांना मी केलेले कामच सांगेल, की पालकमंत्री कोण आहे, असे प्रत्युत्तर श्री. शिवतारे यांनी या वेळी दिले.

Web Title: Vijay Shivtare Press conference