तनिष्कांनी प्रचारासाठी साधला विजयादशमीचा मुहूर्त

तनिष्कांनी प्रचारासाठी साधला विजयादशमीचा मुहूर्त

सांगली - निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या तनिष्का उमेदवारांनी विजयादशमीचा मुहूर्त साधला. ‘सोनं घ्या आणि तनिष्का निवडणुकीत मतदान करा’ असाच प्रचार जिल्ह्यातील तनिष्का उमेदवारांनी केला. दुर्गामाता मंदिर, नवरात्र मंडळे तसेच हळदीकुंकू आदी कार्यक्रमांतून महिलांशी संवाद साधत उमेदवारांनी तनिष्का निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच व्हॉटस्‌ॲप ग्रुपवरून मैत्रिणींना आवाहन करत मतदानासाठी दिलेल्या मोबाइल नंबरवर मिस कॉल देण्याचेही 
आवाहन केले.

सकाळ माध्यम समूहाच्या तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियानांतर्गत महिलांना नेतृत्वासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्याचा एक भाग म्हणून ही निवडणूक होत आहे. जिल्ह्यातील ३१ मतदारसंघांत १०७ उमेदवारांमध्ये निवडणुकीची चुरस सुरू आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, उद्योजक महिलाही यामध्ये उमेदवार म्हणून उतरल्या आहेत. त्यांना या निमित्ताने नेतृत्वाची संधी मिळाली आहे. सांगली, मिरज, इस्लामपूर, विटा, तासगाव अशा शहरांतील उमेदवार दसऱ्याची संधी साधून महिलांच्या भेटी घेत आहेत.

प्रत्येक उमेदवाराला मोबाइल क्रमांक ‘सकाळ’ने दिला असून त्यावर मिस कॉल देऊनही मतदान केले जाणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष किंवा मिस कॉल करून मतदान करायचे असल्याने रंगत वाढली आहे. सांगली शहरातील गणपती मंदिर, माधवनगर रोडवरील दुर्गामाता मंदिर अशा ठिकाणी तनिष्का उमेदवारांनी महिलांची भेट घेतली. तसेच परिसरातही सुटीची संधी साधून जास्तीत जास्त महिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न उमेदवारांनी केला. शिवाय दसऱ्याचे सोनं वाटून शुभेच्छा देतानाही मतदानाचे आवाहन करण्यास तनिष्का उमेदवार विसरल्या नाहीत. महापालिका क्षेत्रातील विश्रामबाग, कुपवाड आणि सांगली शहर मतदारसंघातील उमेदवार हिरीरीने प्रचाराला लागल्या आहेत. आता केवळ तीनच दिवस बाकी असल्याने जास्त मतदारांपर्यंत पोचण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

जतमध्ये फुटला प्रचाराचा नारळ
जतमध्ये विजयादशमीचे निमित्त साधत येथील तनिष्का सदस्यांनी निवडणुकीच्या प्रचाराचा मुर्हूत साधला. चिनगीबाबाला नारळ फोडून उमेदवार दिप्ती सावंत यांच्या प्रचाराचा प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधायला सुरवात केली आहे. येत्या रविवारी होणाऱ्या तनिष्का निवडणुकीसाठी जास्तीतजास्ती महिलांनी मतदानासाठी यावे, असे आवाहन केले. तसेच निवडणुकीचे ठिकाण, वेळ, मोबाइलवरुन मिस कॉलव्दारेही करता येणाऱ्या मतदान प्रक्रियेची माहिती दिली. शहरातील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या निवडणुकीतील उमेदवार दिप्ती सावंत, अनुराधा संकपाळ, विजया बिज्जरगी, पार्वती निडोणी, मिनाक्षी अंकलगी, सुरेखा बाबर, प्राची जोशी, संगीता सावंत, निशा गडीकर, विजया वाघमोडे, अनिता संकपाळ, नयना सोनवणे, रुक्‍मिणी जाधव यांनी प्रचार केला. येथील जिल्हा परिषद मराठी शाळा नंबर तीन, शिवानुभव मंडपसमोर येथे रविवारी मतदान होणार आहे.

विट्यात प्रचार शिगेला
विटा : तनिष्का गटाच्या विटा मतदारसंघासह खानापूर, भाळवणी, लेंगरे या मतदारसंघातील उमेदवारांनी महिला मतदारांच्या भेटीगाठी आणि संपर्कावर भर दिला आहे. त्यामुळे प्रथमच होत असलेल्या तनिष्का निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे. प्रत्येक महिलेचे मत महत्त्वाचे असल्याने आणि प्रचाराचा कालावधी कमी राहिला असल्याने जास्तीतजास्त महिला मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करण्यासाठी उमेदवार मॅरेथॉन दौरे करताना दिसत आहेत.

नवरात्रोत्सवाचे निमित्त साधत तनिष्का गटाच्या विटा मतदारसंघातील उमेदवार कविता घाडगे, सविता जाधव आणि मनीषा शितोळे यांनी शहरातील विविध नवरात्रोत्सव मंडळे, महिला मंडळे, बचतगट, कॉलेज, गारमेंटमधील प्रत्येक महिला, युवतींशी वैयक्तिक संपर्क साधून बैठका घेऊन प्रचाराला गती दिली आहे. प्रत्येक मतदाराला निवडणुकीचे ठिकाण, वेळ, मोबाइलवरून मिस्ड कॉलव्दारे करता येणाऱ्या मतदान प्रक्रियेची माहिती दिली जात आहे. तसेच प्रचारासाठी व्हॉटस्‌ ॲप, फेसबुकसारख्या सोशल मीडियाचाही पुरेपूर वापर करत मतदानाचे आवाहन केले जात आहे. विटा मतदारसंघासाठी नगर परिषद शाळा नं २ येथील मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.

मतदारसंघ असे -
सांगली शहर, विश्रामबाग, मिरज, कुपवाड, जत, माडग्याळ, उमदी, कवठेमहांकाळ, घाटनांद्रे, शिरढोण, तासगाव, सावळज, सलगरे, तुंग, ढालगाव, आटपाडी, दिघंची, खरसुंडी, पलूस, भिलवडी, कोकरूड, इस्लामपूर, आष्टा, खानापूर, विटा, भाळवणी, लेंगरे, कडेगाव, देवराष्ट्रे, वांगी, खेराडे वांगी.

निवडणूक कार्यक्रम असा -
निवडणूक दिनांक - १६ ऑक्‍टोबर 
वेळ - सकाळी ८ ते दुपारी २ 
मतदान प्रक्रिया - प्रत्यक्ष केंद्रावर किंवा मोबाइल मिसकॉलद्वारे 
उमेदवारांसाठी स्वतंत्र 
‘मतदान मोबाइल क्रमांक’ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com