शरद पवार यांना माढ्याचे निमंत्रण माझेच : विजयसिंह

Sharad Pawar
Sharad Pawar

नातेपुते : विजयसिंह मोहिते- पाटील यांनीच लोकसभेची निवडणूक लढवावी अन्यथा पक्ष सोडावा, अशी जोरदार मागणी माळशिरस तालुक्‍यातील कार्यकर्त्यांनी केली. त्यावर शरद पवार यांना या मतदार संघात उभे राहण्याचे निमंत्रण दिले आहे. आपण सर्वांनी शरद पवार यांना निवडून आणायचे आहे, असे सांगून खासदार विजयसिंह मोहिते- पाटील यांनी कार्यकर्त्यांना शांत केले. 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील सहकारमहर्षी शंकरराव मोहिते- पाटील शॉपिंग सेंटरमधील 39 गाळ्यांचे उद्‌घाटन खासदार विजयसिंह मोहिते -पाटील यांच्या हस्ते आज सायंकाळी झाले. अध्यक्षस्थानी मार्केट कमिटीचे सभापती मदनसिंह मोहिते- पाटील होते. मंचावर पंचायत समिती सभापती वैष्णवीदेवी मोहिते- पाटील, उपसभापती किशोर सूळ, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, "शिवामृत'चे अध्यक्ष धैर्यशील मोहिते- पाटील, अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते- पाटील, मार्केट कमिटीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, श्री शंकर कारखान्याचे उपाध्यक्ष मिलिंद कुलकर्णी आदी मान्यवर होते. मदनसिंह मोहिते पाटील यांनी प्रास्ताविक केले. 

बाबाराजे देशमुख म्हणाले, "केंद्र व राज्यात पक्षाची सत्ता नसताना विजयदादांनी अनेक मोठी प्रलंबित कामे मंजूर करून आणली आहेत. लोकसभेला विजयसिंह उभे हवेत.'' सभापती वैष्णवीदेवी मोहिते- पाटील म्हणाल्या, ""पंचायत समितीने दोन वर्षांत 170 कोटींची कामे केली आहेत. न्यायालयाच्या इमारतीसाठी विजयसिंहानी 54 कोटी मंजूर करून आणले आहेत.'' 

तुम्हीच निवडणूक लढवा किंवा पक्ष सोडा. अपक्ष लढा. त्यांना स्वतःचा बारामती मतदार संघ आहे. तेथे उभे रहावे. त्यांनी मतदार संघासाठी काय केले? अशा प्रकारचे वाद - विवाद कार्यकर्त्यांनी विजयसिंहाबरोबर घातले. त्यावर संयमी विजयसिंह म्हणाले, ""आवडत्या माणसांवरच आपण हक्क सांगतो. तसा मी पवार साहेबांचा आवडता आहे. कोणीही वेगळा विचार करायचा नाही. पवार साहेबांना निवडून द्यायचे आहे. मी स्वतः व जयंत पाटील, छगन भुजबळ यांनी मिळून शरद पवार यांना या मतदार संघात उभे राहण्याचे निमंत्रण दिले आहे. केंद्रात कोणत्याच पक्षाचे स्पष्ट बहुमत होणार नाही. त्याठिकाणी पवार साहेब असणे गरजेचे आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com