फलटणमध्ये वाढतोय विजयसिंहांचा वावर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

लवकरच अनेकांच्या गाठीभेटीचे संकेत
दरम्यान, लवकरच फलटणमधील अनेकांच्या गाठीभेटी होणार असल्याचे संकेतही मिळत आहेत. शेवटी काय तर विजयसिंह मोहिते-पाटील फलटणमध्ये राष्ट्रवादीला अडचण ठरणार की काय, हे येणारा काळच ठरवेल असे जाणकार मंडळी बोलताना दिसतात.

फलटण - राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे भाजप नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे सतत फलटण भागात येणे-जाणे वाढले असल्याने फलटणमधील राष्ट्रवादीला त्रासदायक ठरणार की काय, अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होत आहे.

श्री. मोहिते-पाटील मागील पाच वर्षे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. त्यांच्या माध्यमातून फलटण तालुक्‍यात अनेक कामे मार्गी लागली. बहुतेक प्रत्येक गावात खासदार फंड दिला असल्यामुळे त्यांचा अनेक कार्यकर्त्यांशी थेट संबंध आहे. परंतु, तालुक्‍यातील सत्ताधारी नेत्यांनी श्री. मोहिते-पाटील यांना नेहमी सार्वजनिक कार्यक्रमांपासून गेले दोन वर्षे बाजूला ठेवले होते, हे दस्तुरखुद्द श्री. मोहिते- पाटील हे जाणून होते. परंतु, त्यांनी फलटण तालुक्‍यात राजकीय हस्तक्षेप न करता सार्वजनिक कामांवर भर दिला. त्यानंतर पुलाखालून बरेच राजकीय पाणी वाहून गेले. मोहिते-पाटील भाजप पक्षात गेल्यामुळे त्यांचा फलटणमध्ये मुक्तसंचार सुरू झाला.

पूर्वाश्रमीचे अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी असलेले जवळिकीचे संबंध, गोतावळ्याचे नातेसंबंध, अनेकांचा व्यक्तिगत संबंध या कारणाने मोहिते-पाटील आगामी काळात राष्ट्रवादीला फलटण तालुक्‍यात अडचणीचे ठरू शकतील, अशी चर्चा आहे.

गेल्या आठ दिवसांत श्री. मोहिते-पाटील यांचे फलटणमध्ये दोन दौरे झाले. यावेळी तालुक्‍याच्या पूर्व भागाचे दोन उद्योजक निंबळकचे राम निंबाळकर आणि मठाचीवाडीचे विजय कदम यांची उपस्थिती बरेच काही सांगून जाते. लगेच चार दिवसांत फलटणमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डॉ. विजयराव बोरावके, धनगर समाजाचे नेते भीमदेव बुरुंगले आणि फलटण शुगरचे अध्यक्ष प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या भेटीमुळे श्री. मोहिते-पाटील यांचे नक्की काय चालले आहे? हे कळायला मार्ग नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijaysinh Mohite Patil BJP NCP Politics