विजयसिंह मोहिते पाटलांनी वाढवला जनसंपर्क; 'या' मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अडचणी वाढल्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे माळशिरसचे भाजपचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचा अलिकडच्या काळात फलटण विधानसभा मतदारसंघात संपर्क वाढला आहे. 

फलटण : माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे माळशिरसचे भाजपचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचा अलिकडच्या काळात फलटण विधानसभा मतदारसंघात संपर्क वाढला आहे. भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीतून त्यांनी चांगलाच संपर्क वाढविला आहे. मोहिते-पाटलांचा हा जनसंपर्क राष्ट्रवादीला आगामी काळात त्रासदायक ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादीला धक्का देणार का, अशी भिती ही कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे. 

विजयसिंह मोहिते-पाटील मागील पाच वर्षे माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे खासदार होते. त्यांच्या माध्यमातून फलटण तालुक्‍यात अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत. बहुतेक प्रत्येक गावात त्यांनी खासदार फंड दिला असल्यामुळे त्यांचा अनेक कार्यकर्त्याशी थेट संबंध आहे. परंतु, फलटण तालुक्‍यातील सत्ताधारी नेत्यांनी मोहिते-पाटील यांना नेहमी सार्वजनिक कार्यक्रमांपासून गेले दोन वर्षे बाजूला ठेवले होते. हे दस्तुरखुद्द मोहिते- पाटील ही जाणुन होते. परंतु, त्यांनी फलटण तालुक्‍यात राजकीय हस्तक्षेप न करता सार्वजनिक कामांवर भर दिला. त्यानंतर पुलाखालुन बरेच पाणी वाहुन गेले. 

या वेळेस लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान, विजयसिंह मोहिते-पाटील भाजपमध्ये गेले. त्यामुळे त्यांचा फलटणमध्ये मुक्त संचार सुरु झाला. पूर्वाश्रमिचे अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी असलेले जवळीकीचे संबंध, गोतावळ्याचे नातेसंबंध, अनेकांचा व्यक्तिगत संबंध या कारणाने मोहिते-पाटील आगामी काळात राष्ट्रवादीला फलटण तालुक्‍यात अडचणीचे ठरु शकतील अशी चर्चा आहे. गेल्या आठ दिवसांत मोहिते- पाटील यांचे फलटणमध्ये दोन दौरे झाले. यावेळी तालुक्‍याच्या पूर्व भागाचे दोन उद्योजक निंबळकचे राम निंबाळकर आणि मठाचीवाडीचे विजय कदम यांची उपस्थिती बरेच काही सांगून जाते. 

लगेच चार दिवसांत फलटणमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डॉ. विजयराव बोरावके, धनगर समाजाचे नेते भिमदेव बुरुंगले आणि फलटण शुगरचे अध्यक्ष प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या भेटीमुळे मोहिते-पाटील यांचे नक्की काय चालले आहे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. फलटणमधील अनेकांच्या गाठीभेटी ते घेणार असल्याचे संकेतही मिळत असल्याने विजयसिंह मोहिते- पाटील फलटणमध्ये राष्ट्रवादीला अडचण ठरणार का, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vijaysinh mohites in phaltan may ncp facing trouble