झेडपीच्या सत्तेत आम्ही निर्णायकच

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

इस्लामपूर - झेडपीच्या सत्ता स्थापनेसाठी रयत विकास आघाडी निर्णायक आहे आणि निर्णायकच राहील. मात्र, सत्तेसाठी कोणाला पाठिंबा द्यायचा, हा निर्णय निवडून आलेल्या सदस्यांना विचारात घेऊन एकत्रित बसून घेऊ, अशी माहिती खासदार राजू शेट्टी, आमदार शिवाजीराव नाईक, वनश्री नानासाहेब महाडिक, सी. बी. पाटील, निशिकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मात्र नैसर्गिक शत्रूबरोबर जाणार नाही, असा सूचक इशाराही त्यांनी राष्ट्रवादीचा नामोल्लेख टाळून केला.

पेठ (ता. वाळवा) येथे वनश्री नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालयात "रयत' आघाडी, स्वाभिमानीकडून निवडून आलेल्या झेडपी, पंचायत समिती सदस्यांचा आज छोटेखानी सत्कार झाला.

यानंतर पत्रकार परिषद झाली. खासदार शेट्टी म्हणाले, 'इस्लामपूर नगरपालिकेत विकास आघाडी करून विरोधकांना नामोहरम केले. तीच आघाडी पुढे ठेवली. आमच्याकडून लोकांच्या अपेक्षा असल्यानेच आमचे उमेदवार निवडून आले. निवडून आलेल्या सदस्यांशी चर्चा करूनच झेडपीतील पाठिंब्याबाबत मते जाणून घेतली जातील. आम्ही सर्वजण एकत्रित बसून अंतिम पाठिंब्याबाबत निर्णय घोषित करू.'' आमच्यात मतभेद नाहीत. पाठिंब्याचा निर्णय नेते घोषित करतील. असेही शेट्टींनी वारंवार सांगितले.

सदाभाऊ खोत यांच्याशी वादाबद्दल खासदार शेट्टींना छेडले असता ते म्हणाले, 'सदाभाऊ मुलाच्या पराभवाने थोडे भावनिक झाले आहेत. आमच्यात कोणताही वाद नाही. जरी असला तरी ती संघटनात्मक अंतर्गत बाब आहे. मी कोल्हापूर जिल्हा सांभाळायचा व सदाभाऊंनी सांगली जिल्हा असे ठरले होते. आम्ही चळवळीतील लोक आहोत. आम्हा दोघांनाही इतर राजकारण्यांच्याप्रमाणे ओठात एक व पोटात एक बोलणे जमत नाही.''

यावेळी नूतन झेडपी सदस्या सुरेखा जाधव, निजाम मुलाणी, जगन्नाथ माळी, स्वाभिमानीच्या कवठेपिरानच्या सदस्या सुरेखा आडमुठे, पंचायत समिती सदस्य राहुल महाडिक, वसुधा दाभोळे, मनीषा गावडे, सविता पाटील, वैशाली जाधव, आशिष काळे, मारुती खोत यांचा सत्कार झाला.

ऊस दराबाबत असमाधानी- शेट्टी
संघटना ऊस दराच्या मुद्दयावरून बाजूला गेली काय? या बाबत विचारले असता ते म्हणाले, ""लोकांच्या अपेक्षा व वस्तुस्थिती पाहुन आम्हाला तारेवरची कसरत करावी लागते. मिळालेल्या 2700 च्या उचलीवर आम्ही समाधानी नाही. आम्ही अजून जादा दर मागितला आहे. या वर्षी मिळालेला जादा दर संघटनेच्या या पूर्वीच्या आंदोलनाचा परिणाम आहे.''

भाजप जिल्हाध्यक्षांची उपस्थिती योग की झेडपीची जुळवाजुळव?
रयत विकास आघाडीची बैठक सुरू असताना भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख महाडिक कॉलेजवरील दुसऱ्या खोलीत उपस्थित होते. पत्रकार बैठकीनंतर त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, ""मी साताऱ्याला निघालो होतो. या दरम्यान नानासाहेब महाडिक यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी चहा घेतल्याशिवाय जायचे नाही, असा आग्रह केल्याने मी या ठिकाणी आलो आहे. माझा या बैठकीशी कोणताही संबंध नाही; किंवा मी पाठिंबा मागण्यासाठीही आलो नाही. पाहुणचारासाठीच मी येथे आलो आहे.''

Web Title: vikas aghadi decission