ड्रोनद्वारे होणार गावठाणनिश्‍चिती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

हे होतील फायदे

  • ड्रोन छायाचित्रांसह डिजिटल नकाशा तयार होणार 
  • विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत होणार 
  • बॅंक कर्ज घेणे, मिळकत तारण ठेवणे, जामीनदार राहण्यासाठी मदत होणार
  • बांधकाम परवानगीसाठी मिळकत पत्रिका, नकाशा अधिकृत पुरावा राहणार
  • खासगी मिळकतींचे मालकी हक्क, हद्दींचे वाद मिटविण्यास मदत होणार

सातारा - गावठाणाची हद्द ही ग्रामीण भागातील समस्या बनली आहे. विस्तारलेल्या गावांचा विकास साधण्यासाठी गावठाणाची हद्द निश्‍चित होणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने जमाबंदी आयुक्त आणि भूमिअभिलेख विभागाने गावांची ‘ड्रोन’च्या मदतीने मोजणी करून गावठाणाचे डिजिटल नकाशे तयार करण्याचे काम सुरू केले आहे. जिल्ह्यातील खटाव, माणमध्ये ही मोजणी सुरू असून, ती एक हजार ६९६ गावांत केली जाणार आहे.

‘ड्रोन’द्वारे मोजणी केल्याने पारंपरिक मोजणी पद्धतीपेक्षा कमी वेळेत, कमी श्रमात व कमी मनुष्यबळाचा वापर करून मोजणी होणार आहे. डिजिटल स्वरूपात अभिलेख निर्मिती केली जाणार आहे. गावातील सार्वजनिक रस्ते, शासनाच्या सर्व जागा, ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा, नाल्यांच्या सीमा निश्‍चित होऊन या मिळकतींचे अभिलेख तयार होतील. गावठाणातील मिळकतींचा मालकी हक्कांचा पुरावा तयार होणार आहे. 

ज्या गावठाणांमध्ये अद्यापही सर्व्हे झालेले नाहीत तिथे ड्रोनद्वारे गावठाण भूमापन केले जाईल. स्थळ निश्‍चितीसाठी जीपीएस निर्देशांकाचे संदर्भ ड्रोनला देणे आवश्‍यक आहे. सर्व्हे नंबरच्या अभिलेख्यांद्वारे गावठाणच्या सीमा निश्‍चित करून पिलर लावण्यात येतील. मिळकतीच्या हद्दी चुन्याच्या साह्याने दर्शविण्यात येतील. त्यानंतर गावठाणांचे ड्रोन छायाचित्र घेण्यात येईल. जीपीएस रीडिंग आणि ड्रोन इमेजची प्रक्रिया सर्व्हे ऑफ इंडियाच्या माध्यमातून करण्यात येईल. ड्रोन छायाचित्रांसह डिजिटल नकाशा तयार होईल. ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यावर जाहीर नोटीस देऊन सूचना व हरकती मागविण्यात येतील व अंतिमत: गावठाण नकाशा अंतिम करण्यात येणार आहे.

ग्रामसेवकांना ग्रामसभा घेऊन गावठाण भूमापनाचे महत्त्व व फायदे नागरिकांना पटवून देऊन त्यांच्यात जनजागृती करावी लागणार आहे, तसेच लोकांकडून त्यांचे वैयक्तिक मिळकतींचे चुना पावडरच्या साह्याने सिमांकन करून घ्यावे लागेल. लोकांची ड्रोन सर्व्हेबाबत ड्रोन स्वयंसेवक मंडळ स्थापन करावे लागणार आहे. गावठाण हद्द निश्‍चितीवेळी कायम खुणांवर विशिष्ट दगड, लोखंडी खुट्या ठोकून घेणे व त्याचे जतन करण्याची जबाबदारी ग्रामसेवकांवर राहणार आहे. 

मिळकतीचा नकाशा बनणार 
या मोजणीमुळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व मिळकतींच्या मालमत्ता कराची आकारणी व आकारणीचे नियोजन करता येईल, त्यामुळे ग्रामपंचायत महसुलात वाढ होईल. ग्रामपंचायतीकडील मालमत्ता कर निर्धारण पत्रक आठ अ नोंदवही अद्ययावत होईल. कर आकारणी करणे सोपे होणार आहे. गावठाणाचा हद्दीतील प्रत्येक मिळकतीचा नकाशा तयार होईल व प्रत्येक मिळकतीच्या सीमा निश्‍चित होतील. गावठाणातील प्रत्येक मिळकतीचे नेमके क्षेत्र माहीत होईल, तसेच मालकी हक्काचे अभिलेख मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) तयार होईल. विकास आराखडा तयार करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Village Border Done by the drone