पंचगंगेच्या महापूरामुळे अख्ख्या नृसिंहवाडीचे स्थलांतर

संजय खूळ
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

- नृसिंहवाडीत आतापर्यंत 80% गावकऱ्यांचे स्थलांतर झाले असून उरलेल्यांचे आज होणार.
- गावात पोहोचण्यासाठी आता केवळ शिरोळचा मार्ग उरला आहे.
- पाणी वाढल्यास तोही पाण्याखाली जाण्याची शक्यता.

इचलकरंजी : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील दत्त देवस्थानासाठी प्रसिद्ध असलेले नृसिंहवाडी या गावातील 80 टक्के गावकऱ्यांना स्थलांतरित करण्यात आले आहे. उर्वरित नागरिक आज मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होत आहेत. या गावात जाण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग उरला आहे. आता त्या मार्गावरही दोन फूट पाणी वाढल्यास हाही मार्ग बंद होण्याची शक्यता आहे.

कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर असलेले दत्त देवस्थान येथे आज सकाळी पाण्याची पातळी अडीच फुटांनी वाढली. 2005 मध्ये आलेल्या महापूराची पातळी आता गाठली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील 80 टक्के नागरिक आतापर्यंत स्थलांतरित झाले असून सर्व जनावरेही बाहेर काढण्यात येत आहेत.

येथे असलेल्या गोशाळेतील 15 गाई महापूरात अडकल्या असून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. गावातील सर्व मंगल कार्यालये, हॉटेल त्याचबरोबर मिठाईची दुकाने पाण्याखाली गेली आहेत. नृसिंहवाडीला येण्यासाठी आता फक्त शिरोळचा मार्ग उरला आहे. मात्र, हा मार्गही बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जास्तीत जास्त नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. दत्त देवस्थान समितीच्यावतीने महापूरुग्रस्तांना अन्नदानाची सोय करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Villagers from nrusinhawadi are being safely evacuated from Kolhapur flood