प्रशासनाच्या बोटीत एकही नागरिक बसेना; पंचगंगेच्या पूराचा अनोखा पेच

संजय खूळ
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

2005 मध्ये संपूर्ण पूराने गावाला वेढलेले असताना बोटीतून जाणारे 14 जण बुडाले होते. त्याची धास्ती आजही या भागातील नागरिकांना आहे. गावाला पाण्याचा वेढा असताना प्रशासनाने पाठवलेल्या बोटीमध्ये एक ही नागरिक बसायला तयार नाही. त्यामुळे प्रशासनासमोरही मोठा पेच निर्माण झाला आहे.

इचलकंजी : शिरोळ तालुक्यातील राजापूर गाव हे पुन्हा एकदा भयभीत झाले आहे. 2005 मध्ये संपूर्ण पूराने गावाला वेढलेले असताना बोटीतून जाणारे 14 जण बुडाले होते. त्याची धास्ती आजही या भागातील नागरिकांना आहे. गावाला पाण्याचा वेढा असताना प्रशासनाने पाठवलेल्या बोटीमध्ये एक ही नागरिक बसायला तयार नाही. त्यामुळे प्रशासनासमोरही मोठा पेच निर्माण झाला आहे.

2005मध्ये शिरोळ तालुक्यात महापूराने प्रचंड हाहाकार उडवला होता. अनेक गावे पाण्याखाली गेली होती. देश पातळीवरून या ठिकाणी मदतीसाठी प्रशासन धावून आले होते. राजापूर गाव संपूर्ण पाण्याखाली वेढले होते. या भागातील नागरिकांना बोटीद्वारे हलवले जात होते. मात्र एका मार्गावर झाडी झुडपे असताना नागरिकांनी केलेल्या गोंधळामुळे बोट उलटली आणि त्यात 14 लोक बुडाले होते. 

पंचगंगेच्या महापूरामुळे अख्ख्या नृसिंहवाडीचे स्थलांतर

आज 2005 सारखीच परिस्थिती या गावात निर्माण झाली आहे. त्यामुळे गावातील नागरिक, जनावरे मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होत आहेत. सर्व मार्गांवर पाणी आल्यामुळे नागरिकांच्यात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने आज सकाळी येथील नागरिकांसाठी बोट पाठवली. मात्र, एकही नागरिक या बोटीमध्ये बसायला तयार नाही. आम्ही जसे आहोत तसे इथेच राहतो अशीच भूमिका त्यांनी घेतली आहे. विशेषता ज्येष्ठ नागरिकांनी गाव न सोडण्याची भूमिका घेतली आहे त्यामुळे मोठा पेचप्रसंग निर्माण होत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Villagers from Rajapur denies to take help from administration in Kolhapur Flood