ग्रामस्थांनी आजाेबांसह नातींना वाचविले...पण

राजेश पाटील
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

आज (गुरुवार) सकाळी साडेआठच्या सुमारास मोरेवाडी (कुठरे,ता. पाटण) जवळ वांगनदीतील वाघोडोह नावाच्या धोकादायक ठिकाणच्या धबधब्याजवळ ही घटना घडली.
 

ढेबेवाडी (जिल्हा सातारा) : नातेवाईकांच्या गावातून घरी परतताना तीन नातींसह आजोबा नदीतून वाहून गेले, यातील तिघांना ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून वाचवले मात्र एक मुलगी बेपत्ताच आहे.

सणबुर येथील शंकर रामचंद्र साठे (वय ७३) हे काल (बुधवार) दुपारी स्वरांजली आनंदा
साठे (वय १०), श्रावणी शिवाजी साठे (वय १० ), क्षितिजा शिवाजी साठे (वय १२) यांच्या समवेत कुठरे (ता.पाटण) येथील आपल्या मुलीकडे मुक्कामी गेले होते.

आज (गुरुवार) सकाळी तेथून गावी परतण्यासाठी तिन्ही नातीसोबत मोरेवाडी (कुठरे, ता.पाटण) जवळ वांगनदीचे पात्र ओलांडत असताना पाण्याच्या लोटाबरोबर ते चौघेही वाहून गेले. नदीपात्रात मुलींचा आरडा ओरडा ऐकून सुमारे दोनशे मीटर अंतरावर वाकळा धुणाऱ्या ग्रामस्थांनी धडाधड पाण्यात उड्या टाकून तिघांना पकडून पाण्याबाहेर काढले. परंतु त्यांना क्षितिजा हे मात्र सापडू शकली नाही.

ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तमराव भजनावळे व त्यांचे
सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून नदीपात्रात ग्रामस्थांच्या मदतीने
शोधकार्य सुरू आहे. 

चिमुकल्या मयूर नामदेला दुचाकीने ठोकरले

म्हसवड  : दुकानातून खाऊ घेऊन परत येताना दुचाकीने ठोकरल्याने येथे चिमुकल्याचा मृत्यू झाला. मयूर नामदे (वय 7) असे त्याचे नाव आहे. येथील बेघर वस्तीवरून दुकानातून खाऊ घेऊन सायकलवरून घरी जाताना भरधाव दुचाकीने मयूरला ठोकरले. या अपघातात दुचाकीस्वारही जखमी झाला आहे.
 
येथील नामदेवस्ती येथे महेश गुलाब नामदे हे पत्नी स्वाती व एकुलता एक मुलगा मयूरसोबत राहत आहेत. काल (ता. 12) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तो घराशेजारील परिसरात सायकल खेळत होता. त्यानंतर आजोबाकडून पैसे घेऊन बेघर वसाहतीवरील एका दुकानातून खाऊ घेऊन सायकलीवरून घरी निघाला असताना समोरून नंदकुमार होळ हे मोटारसायकलवरून जात होते.

त्यांच्या दुचाकीने मयूरच्या सायकलला जोरदार धडक दिली. अपघातात मयूर हा रस्त्याच्या बाजूला फेकला गेला. त्यात त्याच्या डोक्‍याला मोठी इजा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरून पडल्याने महेशही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
 
या अपघाताची नोंद सुरेश नामदे यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात दिली. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करणारा कर्मचारी उपलब्ध नसल्याने रात्री उशिरा मयूरच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. रात्री उशिरा मयूरवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Villagers Saved Granddaughters along with Grandfather... But