जर्मन शिकवण्यासाठी खेड्यातील संस्थांनीही पुढे यावे 

जयसिंग कुंभार
सोमवार, 26 मार्च 2018

भारताची आर्थिक प्रगतीची जी काही नवी दालने असतील त्यात जर्मनीचा मोठा सहभाग असेल. भारताची त्यासाठी किमान एक युरोपियन भाषा हे खूप मोठे माध्यम ठरेल. जर्मन भाषा संधीचे प्रवेशद्वार आहे. तुम्ही उद्योजक असा अथवा विद्यार्थी, जर्मन भाषेची जाण तुमच्या प्रगतीसाठी उत्प्रेरकाचे काम करू शकते

सांगली - जर्मन भाषा संधीचे प्रवेशद्वार आहे. शालेय स्तरावर जर्मन अध्यापनाची सोय करण्यासाठी आमचा प्रयत्न असून ग्रामिण भागातील शिक्षण संस्थांनीही त्यासाठी पुढे यावे, असे आवाहन ग्योथे इन्स्टिट्यूटच्या शैक्षणिक सेवा विभागाचे समन्वयक म्हणून काम करणारे दुषमंत चक्र यांनी केले. सांगलीतील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात जर्मन भाषा अभ्यास वर्गाच्या निमित्ताने आले होते. जगभरात जर्मन भाषा आणि संस्कृतीच्या प्रसारासाठी काम करणारी ही संस्था आहे. जर्मन आणि भारत या दोन देशांमधील भाषिक दुवा म्हणता येईल अशा मॅक्‍स म्युलर यांच्या कार्याचा गौरव म्हणून संस्थेच्या भारतातील सर्व इमारतींची ओळख मॅक्‍सम्युलर भवन नावानेच असते. जर्मन भाषा शिकवणारे शिक्षक-संस्था तयार करणे आणि विद्यार्थ्यांसाठी जर्मन भाषा वर्ग घेणे असे संस्थेचे काम चालते. त्यांच्या या कार्याविषयी प्रा. चक्र यांनी "सकाळ'शी संवाद साधला. 

ते म्हणाले,""पुण्यात 104 वर्षांपूर्वी पहिल्यांदा जर्मन भाषा वर्ग सुरू झाले. आजघडीला देशातील सर्वाधिक जर्मनी भाषेचे ज्ञान असलेले पुणे हे शहर असावे. आता आम्ही देवरुख, चिपळूण, रत्नागिरी, गोवा येथेही वर्ग सुरू केले आहेत. सांगलीत वालचंद महाविद्यालयात जर्मन भाषा वर्गाची सोय आहे. मॅनेजमेंट, अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या सहकार्याने वर्ग घेतले जातात. माध्यमिक स्तर शाळांमध्येही जर्मन भाषेची प्राथमिक ओळख करून देणारे वर्ग सुरू केले आहेत. पुण्यात अशा खूप शाळा आहेत. मात्र सांगली- इस्लामपूरसारख्या छोट्या शहरांमधील शिक्षण संस्थांच्या मदतीनेही आम्ही असे वर्ग घेणार आहोत. सांगलीत वालचंदचे संचालक जी. व्ही. पारिषवाड, प्रा. जे. एम. डबीर यांनी स्वतःहून पुढे येत जर्मन वर्ग सुरू केले. इथे खूप चांगला प्रतिसाद आहे. अगदी पाचवीपासून पुढे जर्मन भाषेचे वर्ग सुरू केले जाऊ शकतात. एकूण नऊ कोर्स आहेत ज्यातून प्राथमिक ते तज्ज्ञ जर्मन भाषेचा जाणकार तयार व्हावा असा प्रयत्न आहे. पुण्यात सध्या वर्षाकाठी तीन हजार विद्यार्थी जर्मन शिकून बाहेर पडतात. चार शिफ्टमधील या कोर्सेसाठी सहा महिन्यांची प्रतीक्षा यादी आहे.'' 

ते म्हणाले,""भारताची आर्थिक प्रगतीची जी काही नवी दालने असतील त्यात जर्मनीचा मोठा सहभाग असेल. भारताची त्यासाठी किमान एक युरोपियन भाषा हे खूप मोठे माध्यम ठरेल. जर्मन भाषा संधीचे प्रवेशद्वार आहे. तुम्ही उद्योजक असा अथवा विद्यार्थी, जर्मन भाषेची जाण तुमच्या प्रगतीसाठी उत्प्रेरकाचे काम करू शकते. एकट्या पुण्यात 458 कंपन्यांमध्ये भारत आणि जर्मनीची भागिदारी आहे. 197 कंपन्या फक्त जर्मनीच्या आहेत. ही आकडेवारी फक्त पुणे शहरातील तीन वर्षांपूर्वीची आहे. आता या कंपन्यांमध्ये कोणत्याही पदाची संधी तुम्ही जर्मन जाणता तेव्हा शतपटीने वाढते. भाषा आणि संस्कृती हे जर्मनीचे विकपॉंईट आहेत. त्यांचा त्याबाबतीतील आग्रह टोकाचा असतो. त्यामुळे साठ सत्तर वर्षांपासून त्यांनी जर्मन भाषा आणि संस्कृतीची जगाला ओळख व्हावी या हेतूने भारतासह जगभरातील देशांमध्ये संस्थात्मक जाळे विणले. जर्मनीत पदव्युत्तर शिक्षण, उद्योग, करिअरच्या संधीची अनेक दारे केवळ जर्मनी भाषेच्या अध्ययनामुळे खुली होतात.'' 

Web Title: villages should take an initiative in teaching german language