आम्हालाच भाजपचे वावडे का असावे? 

आम्हालाच भाजपचे वावडे का असावे? 

कोल्हापूर - ‘‘सध्या कोणीही कोणाबरोबर आघाडी करू लागले आहे. भाजपसोबत जर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करत असेल, तर आम्हाला कोणाचे वावडे का असावे? राष्ट्रवादीला पाठिंबा देताना आम्ही काही अपेक्षा ठेवली नव्हती आणि आता भाजपला पाठिंबा देतानाही कोणतीही अट घातलेली नाही. आघाडी कोणाची कोणाबरोबरही होवो, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष मात्र या वेळी भाजप - जनसुराज्य शक्‍ती आघाडीचाच असेल,’’ असा ठाम विश्‍वास जनसुराज्य शक्‍ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री विनय कोरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.

प्रश्‍न : जनसुराज्य शक्‍ती पक्ष स्थापनेपासून राष्ट्रवादीसोबत राहिला आहे. आता मात्र आपण त्यांची साथ सोडली. याबद्दल काय सांगाल?
कोरे : जनसुराज्य शक्‍ती पक्षाच्या स्थापनेपासून आपण राष्ट्रवादीसोबत राहिलो हे खरे आहे. त्यावेळी तालुक्‍यातील किंवा विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेसकडे जाणे शक्‍य नव्हते. त्यामुळे कोणत्या पक्षात जायचे, असा प्रश्‍न पडला होता. शेवटी कोणत्याही पक्षात न जाता जनसुराज्य शक्‍ती पक्षाची स्थापना केली आणि नारळ चिन्हावर निवडणूक लढविली. त्याच दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली होती. निवडणुकीनंतर राष्ट्रवादीसोबत राहण्याचा निर्णय आपण घेतला. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गेल्या निवडणुकीपर्यंत आम्ही राष्ट्रवादीसोबतच होतो. या वेळी मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर विचित्र राजकीय परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आम्हाला भाजपसोबत आघाडी करावी लागली. पूर्वी राज्यात आघाड्या व्हायच्या आणि त्यांची अंमलबजावणी तालुका पातळीपर्यंत व्हायची. आता जिल्हा पातळीवर होणारी आघाडी तालुक्‍यात जाईपर्यंत बिघडू लागली आहे. पक्ष स्थापन केल्यापासून आम्ही राष्ट्रवादीसोबत आघाडी केली होती. या बदल्यात राष्ट्रवादीने आम्हाला काय दिले? आज राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेतेच जर भाजपसोबत जाण्याची भाषा करत असतील तर आम्ही भाजपसोबत गेलो तर काय बिघडले? आम्हाला कोणाचे वावडे का असावे? आज राज्यात सत्तेत भाजप आहे. त्यांच्यासोबत आम्ही राज्य पातळीवर आघाडी केली आहे. सहावा घटक पक्ष म्हणून भाजप आघाडीत आम्ही सहभागी झालो आहोत. भाजपशी आघाडी करत असताना धोरण राबवत असताना जनुराज्यला विश्‍वासात घेतले जाईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे आम्ही भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.’’

 प्रश्‍न : काही सहकारी संस्थांमध्ये आपण व राष्ट्रवादी मिळून अजूनही सत्तेत आहात. त्याठिकाणी भाजपसोबत जाण्याच्या निर्णयाने काही फरक पडणार काय?
कोरे : सहकारी संस्था आणि सार्वत्रिक निवडणुकीचे राजकारण यात खूप फरक आहे. दोन्ही ठिकाणची कार्यपद्धती वेगळी असते. काही सहकारी संस्थांमध्ये आम्ही यापूर्वी राष्ट्रवादीसोबत निवडणुका लढविल्या आहेत. काही ठिकाणी राष्ट्रवादी व जनसुराज्यची सत्ता आहे. ही आघाडी करताना आम्ही पाच वर्षांसाठी आघाडी केली आहे. त्या सहकारी संस्थांचा कारभार पाहताना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपबरोबर केलेल्या आघाडीचा कोणताही परिणाम होणार नाही. 

प्रश्‍न : जागावाटपाबाबत आपण समाधानी आहात काय?
कोरे : आमचा प्रभाव कोणत्या क्षेत्रात आहे याची आम्हास माहिती आहे. त्यामुळे अन्य नेत्यांप्रमाणे अव्वाच्या सव्वा जागांची मागणी आपण केलीच नव्हती. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत जनसुराज्यचा ज्या ठिकाणी प्रभाव आहे, त्याच तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या जागांची आम्ही मागणी केली होती. बहुतांशी त्या जागा आम्हास मिळाल्या आहेत. एक-दोन ठिकाणी आघाडीतील दोन्ही पक्ष जागेसाठी आग्रही राहिल्याने त्याठिकाणी मैत्रीपूर्ण लढण्याचे आम्ही ठरविले आहे.

प्रश्‍न : जिल्हा परिषदेतील सत्तेबाबत काय सांगाल?
कोरे : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप आघाडीला निश्‍चितपणे चांगले यश मिळेल. जनसुराज्य शक्‍ती पक्षाचेही सर्व उमेदवार विजयी होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com