इतिहासप्रेमींना खुणावताहेत दगडी वस्तू...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

कोळ्यातील चंद्रकांत मुळे कुटुंबीयांकडे आजही पुरातन वस्तूंचे संवर्धन

कोळ्यातील चंद्रकांत मुळे कुटुंबीयांकडे आजही पुरातन वस्तूंचे संवर्धन

विंग - यापूर्वी दगडी ऐतिहासिक वस्तूंचा ठेवा अलीकडे दुर्मिळ होत चालला आहे. तो कालबाह्य व नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, क्वचित ठिकाणी तो आजही दृष्टीस पडत आहे. ठिकठिकाणी तो जतन केल्याचे पाहून मनात मात्र त्याच्या वापराविषयीचे कुतूहल निर्माण होते. कोळे (ता. कऱ्हाड) येथील चंद्रकांत मुळे यांनी आजही केलेल्या अशा वस्तूंच्या संवर्धनातून पूर्वजांचे जीवन किती कष्टप्रद असावे, याचा प्रत्यय निश्‍चितच येतो. 
लाकडी आडसरी, गाड्याचे चाक, पाण्याचा डोण (हौद), सात फुटी उंबरा, २५ किलोचा वरवंटा, उखळ आदी दगडात घडवलेल्या या वस्तू आहेत. यापूर्वी दळणवळणाची साधनसामग्री कमी होती. दगडापासून घडवलेल्या व मातीपासून बनवलेल्या जास्तीत जास्तू वस्तू दररोजच्या वापरात होत्या. रस्त्याची मोठी गैरसोय होती. त्यामुळे अवजड वाहतुकीसाठी दगडी चाकाचा गाडा होता. तो ओढण्यासाठी रेडा वा बैलांचा वापर होत असे. 

बांधकामातील चुना घोटण्यासाठी व तेल घाण्यासाठीही त्याचा वापर करत होते. जनावरांना पाणी देण्यासाठी दगडी डोण (हौद), मसाला व चटणी कुटण्यासाठी उखळ (व्हाण) तसेच पुरण लाटण्याठी व मिरच्याचा ठेच्यासाठी पाटा-वरवंट्याचा वापर त्याकाळी प्रचलित होता. धान्य मोजण्यासाठी लाकडी आडसरी, मापटे, चिपटे, कोळवं आदी वस्तू त्यावेळी वापरात होत्या. दळण्यासाठी दगडी जातं होत. आज लग्नविधीला पूजनासाठी ते शोधावे लागते. 

अलीकडे यांत्रिकीकरणाच्या युगात या वस्तू कालबाह्य झाल्या आहेत. क्वचित ठिकाणी परड्यात, चांदवीला, अंगणात या दगडाच्या आकारात घडवलेल्या वस्तू दृष्टीस पडतात, तेव्हा मनात कुतूहल निर्माण करणाऱ्या वाटतात. अनेकांनी औत्सुक्‍याने अशा वस्तू जतन केल्या आहेत. कोळे (ता. कऱ्हाड) येथील चंद्रकांत मुळे कुटुंबीयांकडे लाकडी आडसरी आजही वापरात आहे. अनेकजण ती पाहण्यासाठी तिकडे धाव घेतात. पाणी साठवण्यासाठी डोण (हौद) आजही वापरात आहे. 

अलीकडे या वस्तू अन्यत्र हलवायच्या झाल्यास सध्याच्या माणसांची अक्षरश: दमछाक होते. यावरून त्याकाळच्या माणसांची शरीरयष्टी किती मजबूत असावी, याचा अंदाज येतो. मात्र, अलीकडे या दुर्मिळ वस्तूंचा ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ऐतिहासिक आठवण म्हणून त्या जतन करण्याची खरी गरज आहे.

Web Title: ving satara news Historians are marking the stone goods