व्हिंटेज गाड्या आता कॅलेंडरवर 

सुधाकर काशीद :सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

कोल्हापूरची जुनी छायाचित्रे अनेकांकडे आहेत; पण ती अन्य लोकांना पाहायला मिळत नाहीत. मी अनेकांना विनंती करून, घिरट्या घालून ही छायाचित्रे मिळवली आहेत. केवळ ही छायाचित्रे माझ्या पुरतीच न राहता सर्वांपर्यंत जावीत म्हणून कॅलेंडर रूपात प्रकाशित केली आहेत. 
- अभिजित परमाळे 

अभिजित परमाळे यांचा अनोखा उपक्रम : छत्रपती राजाराम महाराजांच्या काळाला उजाळा 

कोल्हापूर : नवे वर्ष म्हटले, की कॅलेंडर आणि कॅलेंडर म्हटले, की त्यावर मॉडेल किंवा निसर्ग. आपले प्रॉडक्‍ट लोकांपर्यंत या कॅलेंडरच्या माध्यमातून पोचावेत, यासाठी असा प्रयत्न होणे यातही काही वावगे नाही; पण कॅलेंडरच्या माध्यमातून कोल्हापूरची संस्कृती, कोल्हापूरचे 70-80 वर्षांपूर्वीचे वेगळेपण नव्या पिढीसमोर आणण्याचा प्रयत्न अभिजित परमाळे यांनी केला आहे.

या पिढीतल्या कोल्हापूरवासीयांना पाहायलाही न मिळालेल्या ऐटदार जुन्या मोटारींना यावर्षीच्या कॅलेंडरवर झळकवले आहे. कोल्हापूर संस्थानातील मर्सिडिस बेंझ,रोल्स राईस फॅन्टुम व डॅमलर या रॉयल कार यानिमित्ताने आपल्या घरातील भिंतीवर लावता येणार आहेत. ग्राहकाने जर काही खरेदी केले, तरच कॅलेंडर भेट, असे या कॅलेंडरचे स्वरूप नसून कोल्हापूरच्या जुन्या संस्कृतीबद्दल कुतूहल, प्रेम असणाऱ्या कोणाही व्यक्तीस हे कॅलेंडर नि:शुल्क भेट मिळणार आहे.

यातील मर्सिडिस बेंझ ही मोटार 1924मधील मॉडेलची आहे. जर्मन बनावटीची ही मोटार त्यावेळी छत्रपती राजाराम महाराज वापरत होते. फुलसाईज चार दरवाजे असलेली ही मोटार म्हणजे ऐट होती. अर्थात महाराज, त्यांचा प्रोटोकॉल या मुळेही या मोटारीची शान वाढत होती. रोजच्या वापरापेक्षा खास समारंभात ही मोटार प्राधान्याने वापरली जात होती. या कॅलेंडरमधील छायाचित्रात ही मर्सिडिस बेंझ तर आहेच;

पण खुद्द छत्रपती राजाराम महाराजसुद्धा या दुर्मिळ छायाचित्रात आहेत. दुसऱ्या छायाचित्रात इंदुमती राणीसाहेब रोल्स रॉईस व डॅमलर या  मोटारीसोबत आहेत. छत्रपती शाहूंच्या सून असलेल्या इंदुमती राणीसाहेब म्हणजे कला व शिक्षणाच्या भोक्‍त्या.  या छायाचित्रात त्या खुद्द रोल्स रॉईस चालवत आहेत. त्यांचे वास्तव्य आताच्या सरकिट हाऊसमध्ये होते. या तिन्हीही मोटारी मेड टू ऑर्डर या प्रकारच्या म्हणजे जशी ऑर्डर तशी रचना केलेल्या अतिशय किमती व फार कमी लोकांकडे असणाऱ्या मोटारी म्हणजे त्या वेळच्या राहणीमानाचे दर्शन घडवत राहिल्या. काळाच्या ओघात या मोटारींचा वापर थांबला; पण अशा मोटारींची पुन्हा नव्याने बांधणी करून व्हिंटेज कार म्हणून समोर येत आहेत. 

कोल्हापूरची जुनी छायाचित्रे अनेकांकडे आहेत; पण ती अन्य लोकांना पाहायला मिळत नाहीत. मी अनेकांना विनंती करून, घिरट्या घालून ही छायाचित्रे मिळवली आहेत. केवळ ही छायाचित्रे माझ्या पुरतीच न राहता सर्वांपर्यंत जावीत म्हणून कॅलेंडर रूपात प्रकाशित केली आहेत. 
- अभिजित परमाळे 

 
 

Web Title: Vintage cars now on the calendar