व्हीआयपी दर्शन सेवा बिनदिक्कत सुरू

व्हीआयपी दर्शन सेवा बिनदिक्कत सुरू

कोल्हापूर - एकीकडे सर्वसामान्य भक्तांना नियोजनशून्य कारभाराचा फटका सहन करावा लागत असतानाच दुसरीकडे न्यायालयाने दिलेले आदेश धाब्यावर बसवत सर्रास व्हीआयपी भक्तांना दर्शनाचा दरवाजा खुला करण्यात आला आहे. पोलिस आणि पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सुरक्षारक्षकांनी बिनधास्तपणे आज दिवसभर व्हीआयपींची सेवा केली. शनी मंदिराजवळील गेट आणि सटवाई मंदिराजवळी दरवाजा या दोन ठिकांणाहून ही सेवा सुरू होती.

पोलिसांकडे कोणी आले, की ते साध्या वेशातील पोलिस या व्हीआयपी भक्तांना घेऊन दरवाजांजवळ येते होते आणि कुलूप काढून सेवा देण्यात येत होती. मंदिरातील व्हीआयपी दर्शन बंद आहे. पूजक, पोलिस किंवा देवस्थान समिती यांपैकी कोणालाही भीड घालू नये, असे फलक मंदिराच्या आवारात उभे केले आहेत, तरीही व्हीआयपी सेवा सुरू होती. शनी मंदिराजवळ तर सूचना फलकाच्या खालूनच हे व्हीआयपी भक्त थेट आत जात होते. महालक्ष्मी मंदिरातील नवरात्रोत्सवातील व्हीआयपी दर्शन हा नेहमीच वादग्रस्त मुद्दा राहिला आहे. याविषयी येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश यांच्या न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी न्यायालयाने व्हीआयपी प्रवेशावर पूर्णपणे बंदी घातली, परंतु यानंतरही मंदिरात व्हीआयपी दर्शन सेवा सुरू आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आम्हाला काही देणे घेणेच नाही, अशा मानसिकतेत प्रशासन असल्याचे दिसत आहे. दर्शन देण्यासाठी पोलिस आणि देवस्थान समिती यांच्यात वर्चस्ववाद आहे, तोच याला कारणीभूत आहे. कारण या दोन्ही यंत्रणेला अनेकांना सांभाळायचे असते.  

अशी आहे नवी साखळी
व्हीआयपी दर्शनाची सेवा ही केवळ कोणाच्यातरी ओळखीमुळेच नाही, तर मंदिर परिसरात असलेल्या दुकानांतूनही सुरू झाली आहे. विशिष्ट दुकानदारांच्या दुकानातून ओटीचे साहित्य नेणारी एक यंत्रणा तयार झाली आहे. भक्तांना तेथे घेऊन जाते. तिथून मग सुरक्षा रक्षकांशी किंवा समितीतील कोणाशी तरी संपर्क असतो. त्याचा वापर करून थेट दर्शन दिले जाते. यासाठी आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होते.

मुख्य दर्शनमंडपात नियोजनशून्य व्यवस्था
कोल्हापूर - सर्वसामान्य भाविकांच्या सोईसाठी असलेल्या मुख्य दर्शनरांगेच्या नियोजनशून्य कारभारामुळे भाविकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुख्य दर्शनरांगेच्या मंडपातच किमान दीड ते दोन तास थांबून राहावे लागल्याने आज पुरुष भक्तांनी सोडण्यासाठी गोंधळही केला. 

वास्तविक पुरुष व महिला यांची दर्शनरांग एकाच वेळी कायमस्वरूपी सुरू राहू शकते. उजवीकडून महिला व डावीकडून पुरुषांची रांग सतत सोडण्याची व्यवस्था केल्यास अडथळा न येता आतपर्यंत दर्शन होऊ शकते. जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे परगावांवरून आलेल्या भाविकांनी याविषयी प्रचंड नाराजी व्यक्त केली. एक तर कुटुंबाबरोबर दर्शनासाठी यायचे आणि नंतर महिला व पुरुष रांग स्वतंत्र असल्याचे सांगून विभागणी करायची आणि विचारल्यावर, ‘‘काय घरात भेटत नाहीस का..’’ अशी उत्तरे ऐकून घ्यायची, अशी स्थिती आज पाहावयास मिळाली.  

सरष्लकर भवन येथून मुख्य दर्शन मंडपाची रांग करण्यात आली आहे. या ठिकाणी पुरुष व महिला भक्तांसाठी स्वतंत्र रांग आहे; परंतु या ठिकाणी आत सोडण्याचे नियोजन ढिसाळ असल्याचे दिसत होते. पुरुष भक्तांना पाऊण ते एक तास जागेवर थांबवून ठेवून केवळ ५ मिनिटे सोडले जायचे आणि नंतर महिला भक्तांना सुमारे ३० ते ४५ मिनिटे सोडले जायचे. यामुळे पुरुष भक्तांना रांगेतून पुढे जाण्यासाठी मंडपातच दीड ते दोन तास घालवावे लागत होते. 

वास्तविक या रांगेपासूनच दोन स्वतंत्र रांगा करण्यात आल्या आहेत. महिला सोडतानाही त्यांनी दोनची जोडी आणि पुरुष सोडताना दोनची जोडी करून सोडत होते. गतवर्षीचा गर्दीचा आकडा पाहता २४ तासांत १ लाख ८५ हजार भाविक दर्शनाला येतात. यापैकी ५ तास मंदिर बंद असते. यामुळे १९ तासांत भाविकांना दर्शन घेता येणे आवश्‍यक आहे. त्यातून आरती, पालखी यासाठी रांग थांबवली जाते. या सगळ्याचा विचार नियोजन करणाऱ्या यंत्रणेने करणे आवश्‍यक आहे. 
 

दोन्ही रांगा एकत्र सोडा
पुरुष व महिला या दोन्ही रांगा सतत सुरू राहू शकतात. मुख्य दर्शनरांगेतून उजव्या बाजूने महिला व डाव्या बाजूने पुरुषांची रांग सुरू ठेवल्यास ती तशीच महाकाली चौक, सूर्यनारायण येथून पुन्हा डाव्या बाजूने पुरुष, पितळी उंबरा येथून आत गेल्यावरही तसेच जाऊन दर्शन करून पुढे जाऊ शकतात. तसेच पुरुषांकडे ओटी किंवा तेल नसते, यामुळे त्यांना दर्शनासाठी वेळही लागत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांना दर्शनाचा लाभ प्रशासन देऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com