शुभेच्छा नको, मात्र परवानगी द्या ! ; शिक्षकदिनी व्यथा

धर्मवीर पाटील
Saturday, 5 September 2020

वेदना शासन विचारात घेणार का ? हा प्रश्न आहे. 

इस्लामपूर (सांगली) : "शुभेच्छा नाही दिल्या तरी चालतील, मात्र परवानगी द्या!" असे म्हणत आता आम्हाला तोंड लपविण्याची वेळ आली आहे. आमचा आवाज कुणी ऐकेल का? अशी आर्त साद क्लासचालक शिक्षकांनी मुख्यमंत्र्यांना घातली आहे. आजच्या शिक्षकदिनी या शिक्षकांच्या व्यथा, वेदना शासन विचारात घेणार का ? हा प्रश्न आहे. 

हेही वाचा - ......नाहीतर इच्छामरणास परवानगी द्या

क्लासचालकांच्या सांगली जिल्हा आणि राज्यस्तरीय संघटनेच्या कार्यकारिणीत सक्रिय असलेल्या इस्लामपूर येथील हर्ष अकॅडमीचे संचालक रवी बावडेकर यांनी आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपल्या व्यथा मांडणारा एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्यात त्यांनी सध्या कोरोना विषाणू संसर्गामुळे निर्माण झालेली क्लासचालकांची अवस्था पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. समाज बिघवडणाऱ्या दारूच्या दुकानांना परवानगी आहे, पण समाज घडवणारे कोचिंग क्लास बंद आहेत, हा कुठला न्याय? परीक्षेच्या ऐन तोंडावर क्लासेस बंद, घरी अभ्यासाचे वातावरण नाही त्यामुळे विद्यार्थी तणावात आहेत. 

विद्यार्थी सैरभैर आणि शिक्षकांवर उपासमारीची वेळ आलीय, ही अवस्था आहे. सहा महिने झाले क्लासेस बंद आहेत. खर्च कसा चालवायचा हा प्रश्न आहे. इमारतींची भाडी, कर्जाचे हप्ते, वीज बिल कुठून भरायचे? सरकारने आता परवानगी दिली नाही तर शिक्षकांवर डोके आपटून घेऊन जीव देण्याव्यतिरिक्त पर्यायच राहिलेला नाही, असे त्यांनी त्यात म्हटले आहे. 

हेही वाचा - कोल्हापूरात रणरागिणी झाल्या आक्रमक ; कंगना राणावतवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

जिथे शिक्षक तणावात तिथे समाजही धोक्यात हा इशारा देताना ऑनलाइन शिक्षण हे एक तंत्र आहे, साधन आहे, खऱ्या अर्थाने शिक्षक ही काळाची गरज आहे, असेही त्यांनी त्यातून सांगितले आहे. देणेकरी, विद्यार्थी, बायको मुलांच्यापासून आमच्यावरच आता तोंड लपवण्याची वेळ आली आहे. क्लासेस, विद्यार्थी, अभ्यास, परीक्षा आणि गरज विचारात घेऊन शासनाने तात्काळ परवानगी द्यावी, अशी साद त्या व्हिडीओ घातली आहे. संबंधित निर्णय घेणाऱ्या व्यवस्थेपर्यंत ही हाक पोचणार का? हा सवाल आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the viral video of teacher occasion for teachers day in sangli