ठिकठिकाणी विरंगुळा केंद्रांची गरज - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

वाई - गावोगावचे ज्येष्ठ नागरिक संघ प्रभावी झाले पाहिजेत. ज्येष्ठांना आनंदी जीवन सामुदायिकपणे जगता यावे म्हणून ठिकठिकाणी डे केअर सेंटर (विरंगुळा केंद्र) उभे करण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.   

येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी संघातर्फे वाई अर्बन बॅंकेचे अध्यक्ष, सनदी लेखापाल सी. व्ही. काळे यांना ‘वाई भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, उपाध्यक्ष अनिल सावंत, डॉ. विनय जोगळेकर व सुवर्णा काळे उपस्थित होते. 

श्री. पाटील म्हणाले, ‘‘ज्येष्ठांचे जीवन आनंदी करण्यासाठी नवीन कल्पना राबविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठीची वयोमर्यादा ६५ वरून ६० वर्षांवर आणली असून त्यांना एसटी व रेल्वे प्रवास मोफत केला आहे. सामाजिक न्याय विभागाने ज्येष्ठांना ५० टक्के दरात औषधे उपलब्ध करून देण्यासाठी योजना तयार केली आहे.’’ आई-वडिलांचे संस्कार, अर्बन परिवार, वाईकरांची साथ व प्रेमामुळेच आज आपण पुरस्कारास पात्र ठरलो. या पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी पाठीवरून फिरविलेला शबासकी व कौतुकाचा हात समाजासाठी अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा व ऊर्जा देईल, असे श्री. काळे यांनी नमूद केले. संघाचे अध्यक्ष यशवंत सपकाळ यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष आनंदराव लोळे, सचिव महादेव भोसले यांनी स्वागत केले. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले. मधुकर साळवेकर यांनी आभार मानले.

Web Title: virangula center chandrakant patil